काळू-बाळू जोडीतील बाळू उर्फ श्रीकांत खाडे यांनी आपले बंधू काळू यांच्यासह “जहरी प्याला” या वगनाट्यात बाळू नावाच्या पोलिस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले.सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर हे खाडे यांचे मूळगांव होते. कुठला काळू व कुठला बाळू हे ओळखणे अवघड असायचे. त्याचप्रमाणे वास्तवातही त्यांना ओळखणे अवघड असायचे.पण श्रीकांत खाडे म्हणजे बाळूंची खासियत ही की ते थोडे गव्हाळ वर्णाचे होते व गप्पीष्ट होते. रंगमंच वगळता कोठेही बोलावे लागले, तर बाळूच बोलायचे.
श्रीकांत खाडे (बाळू) यांना २०१३ या वर्षाचा राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने तसेच वाई येथील लालासाहेब खुडे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन सन्मानित करण्यात आले होते.
लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही दोघांनी लोककलेची निष्ठेने सेवा केली, आणि मुख्य म्हणजे पैशाचा विचार कधीच केला नाही. अनेक सामाजिक संस्था, शाळा , महाविद्यालयांच्या मदतीसाठीही त्यांच्या तमाशाचे शेकडो प्रयोग झाले होते. तमाशात हजरजबाबी असलेल्या काळू-बाळूंनी आर्थिक विपन्नावस्था आल्यावरही कधी, कुणाकडे मदतीचा हात पसरला नाही. पन्नास वर्षे लोकनाट्य-रंगमंचाची सेवा केल्यावर त्यांनी तमाशाचा निरोप घेतला आणि कवलापूरच्या चंद्रमौळी घरात राहून शेतीवर उदरनिर्वाह केला होता.
१७ एप्रिल २०१४ या दिवशी बाळू यांना ताप आल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली आणि २६ एप्रिल २०१४ या दिवशी बाळू उर्फ श्रीकांत खाडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तमाशा क्षेत्रातील अखेरचा सोंगाड्या हरपल्याची भावना रसिकांच्या मनात आहे.लोकनाटय़ातील या काळू-बाळू या दोन्ही कलाकारांच्या आयुष्यावर सोपान खुडे लिखीत “विनोदसम्राट काळू-बाळू” हे चरित्रपर पुस्तक प्रसिद्ध आहे.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
बाळू यांचे नाव अंकुश खाडे असे आहे ,
विनोदवीर बाळू यांचे नाव अंकुश संभाजी खाडे आहे, श्रीकांत खाडे नव्हे .