वसंत वासुदेव परांजपे हे भारताचे चीनमधील माजी राजदूत होते. भारत आणि चीन यांच्यात अगदी जवळीकीचे संबंध असायला हवेत, असे परांजपे यांना वाटत असे, त्यासाठी ते त्यांच्या मार्गाने प्रयत्नही करत असत. चीनमध्ये त्यांचा मित्रवर्ग आणि चाहतावर्ग मोठा होता.
चीनमध्ये ते चिनी भाषा शिकायच्या उद्देशाने गेले आणि ती शिकून होताच त्यांना परराष्ट्र सेवेत घेण्यात आले. परराष्ट्र सेवेत त्यांना आधी चीनचाच विभाग सांभाळण्यास सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच त्यांना चीनमध्ये काम करायची संधी मिळाली. त्यांची निवड पंडित नेहरूंनी केली होती. ते १९७४ ते १९७८ या काळात ते इथियोपियामध्ये राजदूत होते. १९७८ ते १९८२ या काळात दक्षिण कोरियामध्ये त्यांची राजदूतपदी नियुक्ती झाली. भारतीय परराष्ट्रसेवेतून ते १९८२ मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते कधीच स्वस्थ बसले नाहीत. त्यांचा चीनविषयीचा अभ्यास चालूच राहिला.
भारतात परतल्यावर ते गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. परांजपे हे फर्ग्यूसन महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी मॅट्रिकमध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली होती. बी.ए.ला त्यांनी भाऊ दाजी लाड शिष्यवृत्ती मिळवली. १९४७ ते १९५० या काळात चीनमधले शिक्षणही त्यांनी चिनी शिष्यवृत्तीवर केले.
परांजपे यांचे चिनी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांचा चीनविषयक गाढा अभ्यास पाहून भलेभले राजकारणी आणि परराष्ट्र सेवेतील अधिकारी थक्क होऊन जात. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या विद्वत्तेचे चाहते होते. पंडित नेहरू यांच्या चीन भेटीच्या वेळी परांजपे हे त्यांचे दुभाषा प्रतिनिधी होते. चीनचे तेव्हाचे पंतप्रधान झाऊ एन लाय यांच्याशी नेहरू यांनी केलेल्या सर्व राजकीय चर्चेचे ते नुसते साक्षीदारच नव्हते तर त्या चर्चेतले उत्कृष्ट संवादकही होते.
१९५४ मध्ये माओ झेडाँग यांच्यातल्या चर्चेचेही ते संवादक होते. १९६० मध्ये नेहरू आणि झाऊ यांच्यात यांगून, नवी दिल्ली आणि बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेत त्यांचा दुभाषा या नात्याने सहभाग होता. बांडुंगमध्ये पार पडलेल्या शिखर परिषदेला नेहरूंनी आपल्याबरोबर परांजपे यांना घेतले होते.
परांजपे यांना चिनी भाषेतही वेगळ्या नावाने ओळखले जात होते. ‘बै चुनहुई’ या नावाने ते परिचितांमध्ये ओळखले जात. पन्नासच्या दशकात जेव्हा ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या घोषणेचे दिवस होते तेव्हा चीनमध्ये काम करायला मिळणे हाही त्यांच्या दृष्टीने मोठा योग होता.
त्यांच्याविषयी ‘हिंदू’ दैनिकात लिहिताना सुजन चिनॉय यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चिनॉय हे तेव्हा भारताच्या परराष्ट्र खात्यात चिनी विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहात होते.
त्यांचा वेषही अगदी साधा असे. साधा खादीचा अध्र्या बाह्यांचा शर्ट, विजार आणि पायात स्पोर्ट्स् शूज!. ते पुणे शहरात वयोवृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या ‘अथश्री’ प्रकल्पातले पहिले रहिवासी. तिथेही ते साधेपणानेच राहायचे, असे डॉ. विश्वास मेहेंदळे सांगतात.
नेहरू काळापासून परांजपे यांचे चालू असलेले चीनविषयक प्रेम अगदी अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होईपर्यंत चालूच होते. राजीव गांधी पंतप्रधानपदी आले तेव्हा त्यांचाही बीजिंगचा दौरा निश्चित झाला. डिसेंबर १९८८ मध्ये त्यांच्याबरोबर दुभाषा म्हणून कोण जाऊ शकेल याविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा परराष्ट्र कचेरीत पुन्हा एकदा परांजपे यांचेच नाव घेतले गेले. राजीव गांधींच्या दौऱ्यातही त्यांचा समावेश झाला.
गेल्या वीस वर्षांमध्ये चीन बराच बदलला असल्याचे मत परांजपे यांनी आपल्या नोंदींमध्ये केले आहे. चीन बदलला म्हणजे त्याचे आणि भारताचे संबंधही सुधारतील, असे भाकीत त्यांनी केले होते. १९८७ ते १९९१ या काळात चीनमध्ये राजदूतपदी सी.व्ही. रंगनाथन होते. ते लिहितात की, चीनमध्ये आपले आगमन होण्यापूर्वी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी पी. एन. हक्सर आणि परांजपे यांना चीनमध्ये पाठवले होते. हक्सर हे राजीव गांधी यांचे खास दूत होते. रंगनाथन पोहोचले त्याच दिवशी त्यांना प्रा. वू शियाओफिंग यांनी मेजवानीसाठी पाचारण केले. शियाओफिंग हे बीजिंग विद्यापीठात संस्कृत शिकवायचे. ते परांजपे यांचे खास मित्र. त्या प्रसंगी त्यांनी कालिदासाचे मेघदूत आपल्याला मुखोद्गत असल्याचे दाखवून सर्वाना चकित केले होते. परांजपे यांना मात्र ते नवीन नव्हते. त्यांच्या मित्रपरिवारात ‘रामचरितमानस’चे चिनी भाषेत रूपांतर करणारे प्रा. जी. शियालिन, इंदिरा गांधी यांचे शांतिनिकेतनमधले सहाध्यायी प्रा. जिंग दिंगहान यांचाही समावेश होता. त्यांच्या चीनविषयीच्या ज्ञानाने प्रत्येकजणच भारावून गेल्याचे पाहायला मिळायचे.
८ एप्रिल २०१० रोजी त्यांचे निधन झाले.
(संदर्भ : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्यांची माहिती, लोकसत्ता मधील व्यक्तिवेध सदर.)
Leave a Reply