विजया मेहता

मराठी रंगभूमीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानमान्यता मिळवून देण्यात ज्या मोजक्या रंगकर्मीचा वाटा आहे, त्यांत विजय तेंडुलकर आणि विजया मेहता यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. मराठी रंगभूमीवर १९६०-७०च्या दशकात नवमन्वंतर घडवणाऱ्या ‘रंगायन’ नाटय़ चळवळीचेही हे दोघे महत्त्वाचे आधारस्तंभ होते. विजयाबाईंनी मराठी रंगभूमीवर आपले स्वतंत्र ‘स्कूल’ निर्माण केले.

स्वत: विजयाबाईंनी पीटर ब्रूक्स यांना गुरुस्थानी मानले, मात्र साहित्य संघ, अदि मर्झबान, इब्राहिम अल्काझी आणि फ्रिट्झ बेनोविट्स अशा परस्परभिन्न ‘स्कूल्स’चे प्रशिक्षण घेत-घेत स्वत:ला घडवले आणि या सर्वाचे संस्कार पचवून आपली अशी स्व-तंत्र शैली निर्माण केली.

म्हणूनच ‘संशयकल्लोळ’, ‘झुंजारराव’पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘मादी’, ‘एक शून्य बाजीराव’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘श्रीमंत’, ‘माता द्रौपदी’, ‘बॅरिस्टर’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘पुरुष’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘संध्याछाया’ असा सर्व दिशांनी होत गेला. पुढे ‘लाइफलाइन’, ‘स्मृतिचित्रे’, ‘पेस्तनजी’, ‘वाडा चिरेबंदी’ या मालिका- चित्रपटांनी त्यांना वेगळी ओळखही दिली. सर्जनशील दिग्दर्शिका आणि कष्टाळू नाटय़ प्रशिक्षक या दोन भूमिकांमध्ये तर त्यांनी आपले सर्वस्व ओतले. आपल्याला हवे ते समोरच्याकडून काढून घेण्यात बाई माहिर.

स्तानिस्लावस्कीचे नाटय़तंत्र बाईंना जवळचे वाटले, तरी ब्रेख्त वापरून ‘प्रयोग’ करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. नटाने पात्राच्या सुखदु:खाचा अभिनय न करता तो अनुभव प्रेक्षकांना द्यायला हवा, अशी त्यांची मागणी असे. पैसा, प्रसिद्धी आणि यश हे कलावंताचे शत्रू आहेत, ते त्याला संपवतात, असे आजही बाईंचे म्हणणे आहे.

दिल्लीत ‘एनएसडी’च्या अध्यक्षा आणि मुंबईत ‘एनसीपीए’च्या संचालिका म्हणून त्यांची प्रशासकीय कारकीर्द त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्थान अधोरेखित करणारी ठरली. या गरुडझेपेत मराठी रंगभूमीचा हात मात्र त्यांच्या हातून कळत-नकळत सुटला. ‘चतुरंग’च्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांच्या या झळझळीत कर्तृत्वाचा गौरव होत असताना मराठी रंगभूमीला त्यांच्या मायेची ऊब पुन्हा मिळेल अशी आशा आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*