विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म २० मे, १८५० रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात चित्पावन कुटुंबात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवी अभ्यासक्रम पुरा केला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी १८७२-१८७७ सालांदरम्यान पुण्यात, तर १८७८-१८७९ सालांदरम्यान रत्नागिरीत शाळांमधून अध्यापनाचे काम केले. १८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी १८७८ साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. १८७५ साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्याच्या उद्दिष्टातून, १८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्थापली. १८८१ सालाच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठीभाषिक व मराठा हे इंग्लिशभाषिक वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. चिपळूणकरांनी खालील संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला : चित्रशाळा, पुणे किताबखाना, पुणे आर्यभूषण छापखाना न्यू इंग्लिश स्कूल फर्गुसन महाविद्यालय.
निबंधकार, मराठी साहित्याला आणि भाषेला आधुनिक आणि दर्जेदार असे वळण देणारा महापुरुष म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर हे सर्वांना परिचित आहे. विष्णुशास्त्रींचा जन्म २० मे १८५० रोजी पुणे येथे झाला. त्यांचं सर्व बालपण आजी-आजोबांकडे झाले. सुरुवातीचे शिक्षण घरीच घेतल्यावर १८६१ मध्ये पुना हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात ते दाखल झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मॅट्रिक झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण पुना कॉलेजमध्ये झाले. याच काळात वाचनाच्या जबरदस्त आवडीतून त्यांनी इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषांतील ग्रंथांचे वाचन केले. कोणतेही पुस्तक नवीन बाजारात आले की ते खरेदी करून वाचून काढायचे हा त्यांचा छंद होता. १८७२ साली बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर पुना हायस्कूल या शाळेत ते अध्यापन करू लागले. त्यांचे वडीलही बुद्धिमान, कर्तृत्ववान, चरित्रकार आणि लेखक होते. त्यांच्या वडिलांनी म्हणजे कृष्णशास्त्रींनी प्रारंभ केलेल्या ‘रासेलस’ या कादंबरीचे विष्णुशास्त्रींनी लेखन पूर्ण केले. पाठोपाठ ‘संस्कृतकवी पंचक’ ही त्यांची लेखमालाही प्रसिद्ध झाली. विष्णुशास्त्रींच्या प्रसिद्ध निबंधमालेचे लेखन त्यावेळी सुरूच होते. परंतु त्यातील बोचक आणि खोचक लेखनामुळे सरकारी शाळेत शिक्षक असलेल्या विष्णुशास्त्रींची रत्नागिरीस बदली केली गेली. त्याच काळात
अनेकांच्या सहकार्याने ‘काव्येतिहास संग्रह’ सुरू केला होता. १८८० मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन ते पुण्याला परत आले आणि लेखन हेच आयुष्याचे ध्येय ठरवले. १८८० मध्ये टिळक, आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. केसरी व मराठामध्ये वाङ्मयविषयक लेखनही सुरू होतेच. चित्रशाळा छापखाना आणि न्यू किताबखाना हे पुस्तक विक्रीचे दुकान सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. ते लिहित असलेल्या निबंधमालेमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यांची निबंधमाला सात वर्षे चालू होती. त्याचा शेवटचा अंक एप्रिल १८८३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे दुखणे बरेच वाढले आणि १७ मार्च १८८२ रोजी त्यांचे निधन झाले. अशा कर्तृत्ववान व्यक्तिला केवळ ३२ वर्षांचेच आयुष्य मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची निश्चितच हानी झाली. त्यांना अजून आयुष्य मिळाले असते तर बर्याच सुधारणा झाल्या असत्या.
Leave a Reply