समोरचें आणि बाजूचें दृश्य मोठे सुदर्शन होते. हजारो पणत्या आणि दिवे पेटले होते. त्यांची प्रतिबिबे गंगाजळामध्ये चमचमत होती. मधूनच मासे वर उड्या मारीत. त्यामुळे जो खळखळाट होई, त्यामुळे ती प्रतिबिबे फुटत. शतधा होत. गंगेच्या प्रवाहात किती दिवेपणत्या वाहात जात होत्या. नावांमध्ये बसून कितीक यात्रिक गंगादर्शनाचा आनंद लुटीत होते. काठावरचे दृश्य पाहून आनंदाने गदगदत होते. ‘जय गंगे भागीरथी !’ ‘जय विश्वनाथ’ अशा गर्जना करीत होते. एवढा थोरला तो गंगाप्रवाह या संपूर्ण दृश्यामुळे चित्रमय झाला होता.
– गो. नी. दाण्डेकर (दास डोंगरी राहातो)