रस्ता ओलांडून बीचवरील वाळूवर पाय टाकला आणि जस जसे पुढे पुढे जायला लागलो, तस तसे जाणवू लागले की आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी बरेच चालावे लागणार आहे. पाणी तर दिसतच नव्हते. वाटले आणखी किती पुढे जायला लागणार आहे कोणास ठाऊक? परंतु आणखी थोडे अंतर चालून गेल्यावर पाणी दिसायला लागले आणि हुश्श वाटले. थोडेफार इकडे तिकडे भटकंती केली, फोटो काढलेत आणि परत परतीच्या मार्गाला लागलो, तेव्हा कळले की येथील पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री रामचंद्रन ह्यांच्या स्मरणार्थ एक स्थळ बाजूलाच उभारण्यात आलेले आहे, त्यामुळे तेथेही फेरफटका मारून शेवटी घरी परत जाण्यासाठी बाहेर पडलो. पुन्हा एकदा अडचण आली ती म्हणजे कोणती बस पकडायची? यावर उपाय म्हणून शेवटील तेथें उपस्थित पोलिसांनाच गाठले आणि त्यांच्याकडून बसची माहिती करून घेतली. त्याप्रमाणे बसमध्ये बसलो व परतीच्या प्रवासास सुरुवात केली. बस स्टोप सोडून बस पुढे सरकू लागली आणि थोड्याचवेळाने उजवीकडे वळली आणि पुन्हा एकदा आठवण झाली ती विल्सन कोलेजजवळील सिग्नलची. वाटले आपण गिरगाव चौपाटीजवळच असून विल्सन कोलेजला वळसा घालून चाललो आहोत.
प्रवासास सुरुवात केल्याकेल्या एक गोष्ट जाणवली ती म्हणजे येथील बोलीभाषा. या अगोदरच म्हटल्याप्रमाणे मुंबईहून येताना मनामध्ये जी सल होती ती म्हणजे येथे संवाद कसा साधावयाचा. असे ऐकून होतो की हे लोक (तमिळ) हिंदी येत असली तरी बोलत नाहीत आणि तमिळला पर्याय म्हणून फक्त कधी कधी इंग्रजी बोलतात. त्यामुळे यांच्याशी संवाद साधने कठीण होणार हे अगोदरच गृहीत धरले होते.
पण या माझ्या चेन्नई सफरीमुळे एक गोष्ट मला शिकता आली ती म्हणजे आपणाला ज्या मुलुखामध्ये जावयाचे आहे तेथील संपूर्ण भाषा आली नाही तरी चालेल, परंतु रोजच्या व्यवहारातले काही त्यांच्या बोलीभाषेतील शब्द येणे गरजेचे आहे. उदाहरणच द्यावयाचे म्हणजे, येथे प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे कोणालाही जर हाक मारावयाची असेल किंवा त्या व्यक्तीशी संवाद साधावयाचा असेल तर त्याला “अण्णा” म्हणून पुकारायचे. त्यामुळे झाले काय की त्या स्थानिक माणसाला असे वाटायचे की कोणीतरी त्यांचाच माणूस त्याला हाक मारतोय आणि त्यामुळे तो आपल्या हाकेला लगेच प्रतिसाद द्यायचा व दोन अनभिज्ञ माणसांमधील जो न दिसणारा असा आडपडदा होता तो आपोआप गळून पडायचा. संवादाला सुरुवात व्हायची. या गोष्टीचा परिणाम असा झाला की पुढील संपूर्ण प्रवासात आम्हाला भाषेमुळे होणारा त्रास तसा फारसा कोठेच झाला नाही. तसेच दुसरे एक पथ्य मी पाळले ते म्हणजे जर कोणाला काही विचारायचेच झाल्यास रस्त्यावरील ह्याला त्याला न विचारत बसता पोलीस गाठायचो आणि त्याला अगोदरच म्हटल्याप्रमाणे “अण्णा” म्हणून पुढील जें काही विचारायचे आहे ते इंग्रजीत विचारायचो. याचाच परिणाम असा झाला की प्रत्येक वेळेला मी जी जी काही विचारणा केली ती फलद्रूप झाली. एखाद दूसरा प्रसंग सोडला तर मला कोठेच नकाराची घंटा ऐकायला मिळाली नाही. इतकेच नव्हे तर प्रवासात बसमध्येही काही प्रवाशांनी मला उत्तम प्रतिसाद दिला. बसस्टॅापची कल्पना दिली, कोठे उतरायचे ते सांगितले. एकंदरीत काय, मला अगोदरच गृहीत धरल्याप्रमाणे, कोठेही भाषेची अडचण जाणवली नाही. उलट असे वाटले की मी मुंबईतच फिरतो आहे.
दुसरी गोष्ट अशी जाणवली ती म्हणजे हा जो भाषेचा बागुलबोवा कित्येकांनी त्यांच्या बाबतीत उभा केलेला आहे, तो मुळी योग्य नाही असे माझे मत या दरम्यान झाले. त्याला कारण असे की ह्या अगोदरच म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा परमुलुखात जातो तेव्हा आपण नेहमीच अपेक्षा करतो की त्यांनी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यावे आणि त्यांनी तसे ते द्यावे यात काहीही वावगे नाही. परंतु आपण हे साफ विसरतो की जेवढी म्हणून आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो, तेवढीच आपलीही जबाबदारी असते की आपणही त्यांच्यासमोर उभे ठाकल्यानंतर त्यांच्याही काही अपेक्षा आपणाकडून असतात, जशा त्यांना समजेल अशा बोलीभाषेत आपण त्यांच्याशी संवाद साधणे.
माझे हे उदारीकरणाचे गणित चुकतही असेल, परंतु माझे असे मत झाले की चेन्नई सारख्या शहरात थोडी शिकलेली, इंग्रजी शिकलेली माणसे भेटतीलही त्यामुळे माझ्या फॉरम्युलानुसार मला उत्तरे मिळालीत, संवाद साधता आला. परंतु जर का मी अगदी आतील गावाकडील भागामध्ये गेलो तर तेथें ती मला भेटतीलच असे नाही. तेथील स्थानिक कदाचित शिकलेले नसतीलही, त्यामुळे त्यांना त्यांच्या तमिळ भाषेव्यतिरिक्त इतर भाषा येत नसतील. मग अशावेळेस जर मी त्यांच्याकडून अपेक्षा केली की त्यांनी इंग्रजी बोलावे, तर ते साफ चुकीचे ठरेल. याचे उदाहरणच द्यावयाचे झाल्यास आपल्या महाराष्ट्र देशामध्येसुद्धा जर का आपण एखाद्या गावात गेलो, तर तेथील गावातील गावकरी माणसांना इंग्रजी कोठे येते? हिंदी कोठे येते? अशावेळी मी जर त्यांच्याशी संवाद इंग्रजी किंवा हिंदीमधून साधू लागलो, तर मला काय किंवा इतरांना काय उत्तरे मिळूच शकणार नाहीत. मग मी असे म्हणावे काय की मराठी माणसे जाणून-बुजून हिंदी किंवा इंग्रजी बोलत नाहीत. तर ते तसे नाही आहे. हा सगळा प्रश्न शिक्षणाचा आहे. हे जरी खरे असले तरी, मी जर का अगोदरच ज्या मुलुखात जाणार आहे त्या मुलुखाची तेथील बोलीभाषा अवगत करून गेलो तर मला वाटते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. जास्त नाही तरी पोटापुरता का होईना मी संवाद साधू शकेन. परंतु त्यासाठी मला तेथील बोलीभाषेमध्ये कशाप्रकारे एकाद्याला बोलाविले जाते याची कल्पना असावयास हवी. जसे, तमिळ भाषेमध्ये “अण्णा” म्हटल्यावर काम होते, तसे मराठी भाषेमध्ये “भाऊ” म्हटल्याने काम होते, तर गुजराती भाषेमध्ये “भाय” म्हणून काम करून घेता येते, तर इंग्रजी भाषेमध्ये “ब्रदर” म्हणून हाक मारता येते. अशाप्रकारे कामचलाऊ भाषा जर मी का थोडीशी शिकून घेतली, तर मला वाटते भाषेची अडचण टाळून मला पोटापुरता संवाद साधता येऊन माझे कार्य सुकर होईल आणि एकाद्या भाषेबद्दल आणि ती बोलणा-या माणसांबद्दल असे टोकाचे मत व्यक्त करण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकू.
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply