यंदा आमच्या पिंटुला अडीच वर्षे पुर्ण झाली. ‘ आमची मुलगी अठरा वर्ष पुर्ण झाली ‘ असे म्हणताक्षणीच पुढचे वाक्य जसे ‘ आता तिच्यासाठी स्थळ बघायला हवे ‘ आपसुकच येते , तसे पिंटु अडीच वर्षाचा झाला म्हणजे शाळेत घालायच्या वयाचा झाला , असे हल्ली समजतात . मुलाच्या जन्माचे प्लॅनिंग करायच्या आधीच त्याच्या शाळेचे प्लॅनिंग आइवडील करतात , असेही हल्ली ऐकीवात आहे . आम्ही तेवढे पुढारलेले नसल्याने शाळेचे प्लॅनिंग करायच्या आतच पिंटुचा जन्म झाला , आणि बघताबघता तो अडीच वर्षाचापण झाला . पिंटु दोन वर्षाचा झाल्यापासुनच शेजारीपाजारी आणि नातेवाइकांनी ‘आता त्याला शाळेत घाला ’ , असे सल्ले द्यायला सुरुवात केली. सहाव्या वर्षी बालवाडी आणि सातव्या वर्षी पहिली या सवयीत वाढलेल्या आम्ही या सल्ल्यांकडे दुर्लक्षच केले . पण गेल्या सहा महिन्यांपासुन मात्र लोकांनी एखाद्या पस्तिशीच्या मात्र लग्न न झालेल्या बाईकडे बघावे , तशा नजरेने पिंटुकडे बघायला सुरुवात केली , आणि नाईलाजाने आम्ही त्याला शाळेत घालायचे ठरवले .
आता एकदा शाळेत घालायचे ठरवल्यावर कुठली शाळा हा प्रश्न आपसुकच आला , आणि घरात सकाळ संध्याकाळ चर्चासत्राच्या फैरी झडु लागल्या . शेजारिपाजारीपण या चर्चासत्रात सामील झाले .या शाळेत ऐडमिशन घेतल्यावर लगेच ऐबीसीडी शिकवायला चालु करतात , इथपासुन ते या शाळेत मुलांच्या कलागुणांना अधिक वाव दिला जातो , आणि आजच्या युगात तेच आवश्यक आहे , असे सर्व प्रकारचे सल्ले आम्हाला मिळाले . कुठल्याशा शाळेत तर दहावीत मेरिटमधे आणण्यासाठी पहिलीपासुनच क्लासेस चालु करतात , आणि दहावीच्या मेरिट लिस्टमधे त्यामुळे त्या शाळेतील बरीच मुले असतात , असेही कळाले . शेवटी या सर्व सल्ल्यामधुन मार्ग काढत आमच्या घराजवळ असणार्या पण चांगल्या अशा शाळेत पिंटुसाठी एडमिशन घ्यायची आम्ही ठरवले , आणि तयारीला लागलो .
दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता फॉर्म आणण्यासाठी शाळेत पोहोचलो . चौकशी केल्यावर फॉर्म संपले ,असे कळाले . तरीसुध्दा तिथे ही मोठ्ठी रांग . थोडी अजुन चौकशी केल्यावर ही रांग दुसर्या दिवशीच्या फॉर्मसाठी असल्याचे कळाले , आणि धक्काच बसला . सौ.ला फोन करुन जेवणाचा डब्बा तिथेच आणायला सांगितला , आणि मी लगेच रांगेत लागलो . माझ्यापुढे शंभरएक लोक होते. अर्ध्यातासात मागे अजुन शंभरएक जमा झाले . सर्व लोक जेवणाचे डबे सोडाच पण अंथरुणपांघरुणपण सोबत घेउन आले होते. ही शाळा अत्यंत चांगली असुन या शाळेत एडमिशन मिळाल्यास मुलगा दहावीला मेरिटमधे येतोच याची रांगेतल्या सगळ्यांनी मला खात्री दिली . माझ्या समोर असणार््या जोडप्याने तर शाळेत एडमिशन मिळवण्यासाठी देवाला नवस केल्याचेही कळाले. मीपण लगेच देवाला नवस करुन टाकला . हो , आपण उगिचच कुठल्या गोष्ठीत कमी पडायला नको. हळुहळु दिवस चढत गेला , रांग वाढत गेली , रात्र रस्त्यावरच काढली , आणि दुसर््या दिवशी सकाळी फॉर्म मिळाल्यावर ऑलिंपिकमधे सुवर्णपदक मिळाल्यासारखा आनंद झाला . त्या आनंदातच सुवर्णपदक दाखवुन दुसर्याला आनंदाचा धक्का द्यावा , त्याप्रमाणे सौ.समोर फॉर्म फडकावला .
‘ एवढे आनंदी होऊ नका. फॉर्मसोबतच पालकांचा इंटरव्यूपण आहे .फक्त शंभर जागा आहेत , आणि फॉर्ममात्र दोन हजार विकले गेलेत. ‘ इति सौ. या बायकांना गुप्तहेर म्हणुन सरकार अपॉइंटमेंट सरकार का देत नाही हा एक प्रश्नच आहे . ‘ पालकांचे कसले इंटरव्यु घेणार लेकाचे ‘ असे म्हणताच सौ.ने पुस्तक हातात ठेवले. बघतो तर काय ? ’ पालकांची मुलाखत , अपेक्षित प्रश्नसंच ! ’
‘ हं हे पाठ करा आता. दोन दिवसांनी इंटरव्यु आहे . ’ इति सौ.
दहावीनंतर अपेक्षित प्रश्नसंचाची अशाप्रकारे पुन्हा भेट होईल याची कल्पनाच नव्हती. या अपेक्षित प्रश्नसंचाने दहावीच्या परिक्षेत माझी पुष्कळच मदत केली होती . एकतर पुस्तक आकाराने छोटे. त्यामुळे खिशात ते सहज मावायचे. शिवाय प्रश्नांची उत्तरेपण सहजरित्या सापडायची . ( गैरसमज करुन घेउ नये . उत्तरे सहज सापडली तर अभ्यासाचा वेळ वाचतो. ) . त्यामुळे माझे हे अत्यंत फेवरेट पुस्तक . पुढे दोन दिवसरात्र मी अपेक्षित वाचुन काढले आणि इंटरव्युसाठी रेडी झालो.
“ तिथे धांदरटपणे वागु नका , उत्तरे नीट विचार करुन द्या , आपला अजागळपणा दाखवु नका ” इति सौ. आमची सौ म्हणजे आमची सल्लागार आहे . ( तिचा सल्ला ऐकल्यावर मी गार होतो. ) सर्व सल्ले ऐकतच लग्नातला सुट आणि टाय घालुन तयार झालो. भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने भयंकर गरमी होत होती. पण मुलाच्या ऍडमिशनचा प्रश्न होता , मग काय करणार ? आधी दोनचार लोकांचे इंटरव्यु झाले, आणि शेवटी आमचा नंबर आला ,आणि आम्ही ऑफिसमधे शिरलो.
एका मोठ्या डायसमागे आठ लोक बसलेले पाहुन मला घामच फुटला . सहा पुरुष दोन बायका. सर्वांची वये सुमारे चाळिस ते साठ वर्षे. अत्यंत धीरगंभीर चेहेरे. हातात पेन , समोर कागदे. सर्वांच्या समोर पाण्याचे ग्लास. समोर पालकांना बसायला तीन खुर्च्या. आम्ही मुकाट्याने खुर्च्यात जाउन बसलो. मी रुमालाने घाम पुसायला लागलो. सौ. पर्सशी चाळा करत बसली आणि आमचे चिरंजीव पिंटु ( वय वर्षे अडीच ) अंगठा चोखत वर फिरणार्या पंख्याकडे बघत बसले.
” अत्यंत वाईट सवय ! ” इति खुर्ची नं १ . काळा चष्मा . मी घाबरलो. ” नाही हो . खुप जास्त घाम आला म्हणुन पुसला . नाहीतर नेहमी तो मी कपाळावरच वाळू देतो. “ मी उत्तरलो. ” त्याबद्दल नाही म्हणत मी . तिकडे बघा. “ चिरंजीव पिंटु ( वय वर्षे अडीच ) अजुनही अंगठा चोखत पंख्याकडे बघत होते. “ घरात मुलाला असुरक्षित वाटत असेल तर ती अंगठा चोखतात . तुम्ही घरात दारु पिउन आरडाओरड करता ? मारामारी वगैरे ? “ मी अजुनच घाबरलो. ” नाही हो . मी फक्त बाहेरच – म्हणजे मी दारुच पित नाही . “ मी उत्तरलो. सौ. ने डोळे वटारुन माझ्याकडे बघितले. मी बाहेर पित असल्याचे अजुनही तिला माहित नव्हते. ” अंगठा चोखणे अनुवांशिकच असणार . ” इति मी . ” कारण मीपण पाचवीपर्यंत अंगठा चोखायचो. “ काळ्या चष्म्याने माझ्याकडे अशा नजरेने बघितले कि मी ओशाळलोच .
” तुमचे छंद काय आहेत ? “ इति घारे डोळे खुर्ची नं ३ . आता आली पंचाइत . अपेक्षितमधे हा प्रश्नच नव्हता . काय उत्तर द्यावे या विचारात माझ्या तोडुन निघुन गेले “ रमी खेळणे . पण मी पैसे लावुन नाही खेळत . समोरचे गोखले खेळतात. ” माझे उत्तर ऐकताच घारे डोळे काहीतरि पुटपुटले आणि वहीत काहीतरी लिहिले . मी इकडे घाम पुसुन परेशान . पिंटुचे काम आपले चालुच .
” आता शेवटचा प्रश्न “ पुन्हा खुर्ची नं १ “ याच शाळेत प्रवेश घ्यावा असे तुम्हाला का वाटले ? ”
थॅंक गॉड ! एकतरी प्रश्न अपेक्षितमधला विचारला . मी पाठांतर चांगले केले होते. मी चालु केले . “ जगात पैलु पाडलेले आणि पैलु न पाडलेले अशी दोन प्रकारची रत्ने असतात . दोन्हींचा गुणधर्म रत्नाचाच असला तरी पैलु पाडलेले रत्नच चकाकते. काचेच्या तुकड्याला जरी पैलु चांगले पाडलेले असतील तर तोही चकाकतो. तेव्हा काच असली तरी चांगल्या प्रकारे पैलु पाडलेली असेल तर ती चकाकेल , आणि रत्न असेल पण त्याला पैलु पाडलेले नसतील तर ते चकाकाणार नाही . आमच्या मुलाच्या व्यक्तिमत्वाला या शाळेत चांगले पैलु पाडले जातील ,याची आम्हाला खात्री आहे , म्हणुन आम्हाला या शाळेत प्रवेश हवा आहे. “
हुश्श ! माझा मला अभिमान वाटला . किती अवघड वाक्य , पण मी करेक्ट म्हणुन दाखवले.
“ लिस्ट परवा सकाळी लागेल “ घारे डोळे .
तीन दिवसांनी लिस्ट लागली . सर्वात शेवटचे नाव पिंटुचे बघुन मी खुश. पेढे घेउन घरी आलो. सौ. ला म्हणालो. ” बघ . मी एवढा छान बोललो , म्हणुन प्रवेश मिळाला . ” “ कपाळ माझ ! अहो , मी रेखाला फोन केला होता काल . तिचा नवरा नगरसेवक आहे , त्यांनी फोन केला काल शाळेत , आणि शेवटच्या क्षणी पिंटुचे नाव ऍड करायला लावले . जा त्यांना आधी पेढे देउन या .”
आमच्या बायकोची पण कमाल आहे. पण जाऊद्या , कसा का असेना , आमचा पिंटु एकदाचा शाळेत जाऊ लागला.
— निखिल मुदगलकर
Leave a Reply