जगाला कधीच
न पडणारी कोडी
मला पडलीच नसती …
ती कोडी सोडविण्यात
माझ्या आयुष्याची वर्षे
खर्ची पडलीच नसती…
भूत भविष्य वर्तमानाची भुते
माझ्या मानगुटीवर
कधी बसलीच नसती…
देवाच्या अस्तित्वाचा शोध
घेण्याची गरज मला
वेड्यागत भासलीच नसती…
माझी नजर फक्त सुखावर असती
तर दुःखाची धग मला
कधी लागलीच नसती …
प्रेमातील वासना आणि
वासनेतील मुक्ती शोधली नसती
तर मला खरे प्रेम शोधण्याची
गरज कधी जाणवलीच नसती….
भल्या भल्यानां न सुटणारी कोडी
मला सहज सुटलीच नसती
निरर्थक जीवनातील निरर्थकता
मला कधी पटलीचं नसती…
भविष्याच्या उदरात शिरण्याची
माझी हिंमत झालीच नसती
भविष्यातील कोडी मला
स्पष्ट दिसलीच नसती…
माझ्या सभोवताली स्वैराचार
बोकाळला असताना
माझी समाधी लागलीच नसती …
मी अज्ञानी असतो तर जगाला
उत्तरे देण्याची वेळ
माझ्यावर आलीच नसती…
माझ्या मेंदूत सारी
ज्ञानाची भंडारे नसती
तर अज्ञानात माझ्या भोवती
सुखे नांदली असती…
©कवी – निलेश बामणे
Leave a Reply