नवीन लेखन...

अध्यात्म म्हणजे काय?



परवा शेजारचे काका कौतुकाने सांगत होते, ‘आमचा सुरेश या वयात अध्यात्माकडे वळलाय. दर मंगळवारी पाच पाच तास रांगेत उभे राहून सिध्दिविनायकाचे दर्शन घेतो.’ मी जरा विचारात पडलो. सुरेश हा कॉलेजात जाणारा मुलगा. या वयात तो अध्यात्माकडे वळलाय याचे त्याच्या वडिलांना कौतुक. दुसरा भाग म्हणजे पाच तास रांगेत उभे राहिला म्हणजे अध्यात्म केले हा एक समज. रांगेत उभे राहुन दर्शन घेणे हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग. पण अध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म म्हणजे काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे आणि निवृत्त झाल्यावर ती करायची असते असा बर्‍याच लोकांचा समज (खरे म्हणजे गैरसमज) असतो. पण खरे म्हणजे तसे काही नसते. अध्यात्म हा आपल्या जगण्याचाच एक भाग आहे. ते आपल्या जीवनशैलीचाच एक भाग आहे.

सर्व संत सांगतात की आपल्या ह्रदयात भगवंत आहे त्याला पहायला शिका. म्हणजे आपला आत्मा हाच परमात्मा आहे हे समजून घेणे. त्याच्यासाठी आपला अहंकार गेला पाहिजे असे संत सांगतात. अध्यात्माला दुसरा शब्द आहे परमार्थ. परमार्थ म्हणजे परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ. थोडक्यात आपल्या जगण्यातील श्रेष्ठ अर्थ उमगणे म्हणजे परमार्थ इतके हे सोपे आहे.

आपण म्हणतो की मला अमुक गोष्टीमुळे आनंद झाला. याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये त्या क्षणी त्या गोष्टीचे महत्व अनन्यसाधारण असते. याचाच दुसरा अर्थ ती पारमार्थिक अनुभूती असते. ही आनंदाची अनुभूति जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत अनुभवू तेव्हा आपोआप जगण्यातील श्रेष्ठ अर्थ आपल्याला उमगलेला असेल. संत तरी वेगळे काय सांगतात?

सर्व संतांची शिकवण जर आपण पाहिली तर आपल्याला त्यात एक समान सूत्र दिसते. तुम्ही तुमचे कर्म करत राहा, कर्ता करवता भगवंत आहे हे विसरु नका. आपल्याकडील

संतांचे साहित्य आपण उगाचच

धार्मिक ग्रंथ ठरवून त्याच्याकडे म्हातारपणी वेळ घालवायचे साधन म्हणून पाहातो. किंवा एम. ए. ला घ्यायचा स्पेशल विषय म्हणून पाहातो. खरे म्हणजे ते व्यवहारज्ञानकोश आहेत. समर्थांचा दासबोध काय, तुकोबाचे अभंग काय किंवा गोंदवलेकर महाराजांची शिकवण काय, कुठेही कामधंदा सोडून देव देव करत बसा किंवा वनात जाऊन तपश्चर्या करणे म्हणजे अध्यात्म असे अजिबात म्हटलेले नाही. किंबहुना गोंदवलेकर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे जर देव वनात भेटत असता तर जंगलातील प्राण्यांना तो आधी भेटला असता. तपश्चर्या हे साधन प्रापंचिक लोकांसाठी नाही.

गीतेतही साक्षात श्रीकृष्णाने हेच सांगितले आहे की तू कर्म कर आणि बाकी सर्व सोडून दे. हे कर्म करताना ते मला अर्पण कर म्हणजे ते तू केले असा तुला गर्व होणार नाही. अर्जुन केवळ निमित्तमात्र आहे हे दाखविण्यासाठी भगवंताने विश्वरूपदर्शन त्याला घडवले.

आता या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. श्रीकृष्ण हे भगवंताचे रूप होते हे आपण मानतो. बालपणापासून त्याने कितीतरी चमत्कार दाखवले, पण कौरव पांडव संघर्षात त्याने ते केले नाही. मनात आणले असते तर कौरवांचे मन तो पालटू शकला असता पण त्याऐवजी त्याने सर्वांना कर्मयोगाची कास धरण्यास सांगितले. नातेवाईकांना आणि साक्षात गुरुजनांना समोर पाहून भावनेच्या आहारी गेलेल्या अर्जुनाला हर प्रकारे समजाऊन त्याला युध्दाला तयार केले. कर्म करणे हाच खरा त्याचा धर्म आहे हे त्याला पटवून दिले.

आपण एखादे काम खूप कष्ट घेऊन चांगल्या प्रकारे पूर्ण केले की आपल्याला आनंद होतो आणि मनाला समाधान मिळते हा अनुभव तर सर्वांना येतो. थोडे खोलात जाऊन पाहिले तर ते काम पूर्ण झाल्यावर मिळालेल्या एखाद्या गोष्टीपेक्षा ते काम पूर्ण झाल्याचा आनंद खूपच जास्त असतो. आणि हाच खरा परमार्थ आहे. माणूस म्हणून परीपूर्ण जीवन जगणे याचेच नांव परमार्थ.

नुकताच प्रदर्शित झालेला थ्री इडियट्स हा सिनेमा बराच लोकप्रिय झालेला आहे. मी जर म्हटले की त्यातदेखील अध्यात्म आहे तर तुम्ही म्हणाल की हाही एक इडियट दिसतोय. पण त्यातले दोन प्रसंग नीट आठवा. एका प्रसंगात आमीर खान म्हणतो की तुम्ही जे काही कराल त्यात एक्सलन्सचा ध्यास घ्या. यश, पैसा आपोआप तुमच्या मागे येईल, तुम्ही त्याच्यामागे जाऊ नका. थोडक्यात फळाची आशा न करता कर्म करा आणि ते मनापासून करा हेच तर येथेही सांगितले आहे.

दुसर्‍या प्रसंगात आमीर खानच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘आल इज वेल’. त्याचा मित्र त्याला विचारतो की नुसते असे म्हटल्याने सगळे चांगले होईल असे थोडेच आहे? त्यावर आमीर खान म्हणतो कदाचित होणारही नाही पण घडणार्‍या गोष्टी स्वीकारायची आणि त्याला तोंड देण्याची मनाची तयारी तर होईल. तुकोबाराय म्हणतात ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ति असो द्यावे समाधान’. थोडक्यात आल इज वेल माना. आपण सर्वांनीच देव करतो ते बर्‍याकरता करतो या संदर्भातील राजाची गोष्ट लहानपणी ऐकली आहे. जेव्हा आपण या भावनेने जगण्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहू तेव्हा आपोआप इतर भावना जाऊन केवळ निखळ आनंदाची अनुभूती आपल्याला होईल.

वर म्हटल्याप्रमाणे जीवनातील प्रत्येक गोष्टीत जेव्हा आपण आनंद अनुभवायला शिकू तेव्हा आपोआपच जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळू लागेल. मग मला सांगा आनंद अनुभवणं ही एका विशिष्ट वयातील किंवा आपल्या जगण्यापासून वेगळी अशी गोष्ट कशी असू शकेल?

— कालिदास वांजपे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..