दार्जीलिंग हे भारतातील थंड हवेचे लोकप्रिय पर्यटनस्थळ. पश्चिम बंगालमधील या शहराला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ मानला जातो. दार्जीलिंग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. दार्जीलिग हिमालयन रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. टॉय ट्रेन ही दार्जीलिगची आणखी एक खासियत. या शहरामध्ये हिमालय
आणि माऊंट एव्हरेस्टचे विहंगम दर्शन होते.’काट्याने काटा काढायचा’ ही म्हण आपल्याकडे चांगलीच प्रचलित आहे. पर्यटनाचे बेत आखतानाही या म्हणीचा वापर होतो. साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावं असा अलिखित नियम असतो. परंतु, थंडीच्या दिवसांमध्येही थंड हवेच्या ठिकाणी जाणार्या पर्यटकांची संख्या कमी नाही. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा पर्यटनासाठी उत्तम काळ मानला जातो. हा लग्नसराईचा हंगाम असल्याने जोडपीही मधुचंद्रासाठी थंड हवेच्या ठिकाणांचा प्राधान्याने विचार करतात. भारतातील थंड हवेच्या ठिकाणांबद्दल बोलायचं आणि दार्जीलिंगचा उल्लेख करायचा नाही हे शक्यच नाही. काश्मीरप्रमाणे दार्जीलिंगमध्येही स्वर्गाची अनुभूती मिळते असं म्हटलं जातं. तेथील निसर्गसौंदर्य आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातं. निसर्गसौंदर्याने वैभवसंपन्न असलेल्या दार्जिलिंगला भेट देणं एका मेजवानीपेक्षा कमी नाही.दार्जीलिंग हे पश्चिम बंगालमधील अत्यंत प्रसिद्ध शहर आहे. चहाचे मळे ही दार्जीलिंगची खासियत. दार्जीलिंग हिमालयन रेल्वेचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. हिमालयाचं वरदान लाभलेलं दार्जीलिंग पर्यटकांसाठी खास आकर्षणाचं केंद्र ठरतं. टायगर हिल हे दार्जीलिंगमधील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ. दार्जीलिंग शहरापासून हे स्थळ 13 किलोमीटर अंतरावर आहे. कांचनगंगेवरी स
र्योदयासाठी हा प्रदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. इथला सुर्योदय पाहणं ही स्वर्गीय अनुभूती असते. हे दृश्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं आणि आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. येथून हिमालय पर्वतराजींचही सर्वांगसुंदर दर्शन घडतं. केवळ हिमालय पर्वतरांगाच नव्हे तर जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट इथून दिसू शकतो. सुर्योदयाच्या वेळी माऊंट एव्हरेस्टच्या शिखराने सोनेरी रंग धारण केलेला असतो. जगातील सर्वात उंच शिखर पाहिल्यावर आपल्या खुजेपणाची जाणीव होते.टायगर हिलप्रमाणेच बटासिया लूप आणि वॉर मेमोरियल हीसुद्धा दार्जीलिंगमधील प्रेक्षणीय स्थळं आहेत. बटासिया लूप शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या भव्यदिव्य रेल्वे लूपमधून टॉय ट्रेन 360 अंशाचे वळण घेते. दार्जीलिंग आणि जलपैगुडी दरम्यान चालणारी टॉय ट्रेन पर्वतांची राणी आहे. कारण ही रेल्वे शिट्टी वाजवत पुढे निघते तेंव्हा सर्वजण जागच्या जागी थबकून तिला डोळ्यात साठवून घेतात. दार्जीलिंग ते न्यू जलपैगुडी हे 87 किलोमीटरचे अंतर ती 8 तासांमध्ये पार पाडते. या प्रवासादरम्यान टॉय ट्रेन 177 वेळा रस्त्याजवळून जाते. टॉय ट्रेनच्या प्रवासादरम्यान लागणारे प्रत्येक क्रॉसिंग मानवरहित आहे. टॉय ट्रेनचा आवाज आला की वाहने जागच्या जागी थांबतात. त्यामुळे छोटेखानी गाडी रस्ता ओलांडून जात असताना वाहनांनी थांबणे हा अलिखित नियमच झाला आहे !बटासिया लूपवरील टॉय ट्रेनचं वळण प्रेक्षणीय असतं. बटासिया लूपच्या मधोमध वॉर मेमोरियल तयार करण्यात आलं आहे. त्याला एका उद्यानाचं रूप देण्यात आलं आहे. टॉय ट्रेन बटासिया लूप आणि वॉर मेमोरियलला वळसा घालून जात असताना तेथील सौंदर्य आणि दृश्य कॅमेराबद्ध करण्याचा मोह आवरता येत नाही. टायगर हिल्सच्या पर्यटकांना प्रवासी बस या ठिकाणी आणून सोडते. पाच रूपयांचे तिकीट ाढून
त जाऊन यथील विहंगम दृश्य पाहण्याची पर्यटकांना घाई झालेली असते. गोरखा वेशभुषेमध्ये फोटो काढणार्या आणि टेलीस्कोपमधून कांचनगंगेचे दर्शन घेऊ इच्छिणार्या पर्यटकांची येथे जणू जत्राच भरलेली असते. बटासिया लूपनंतर टॉय ट्रेनने जाताना घू स्टेशन लागतं. शिखरावर असणारं जगातील हे सर्वात जास्त उंचीवरचं रेल्वे स्टेशन आहे. येथे दार्जीलिग हिमालयन रेल्वेच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती देणारं रेल्वे संग्रहालय आहे. टॉय ट*ेनचा या सर्व ठिकाणांवरून होणारा प्रवास एक अनोखा अनुभव असतो.दार्जीलिगमधील आणखी काही प्रेक्षणीय स्थळे म्हणजे अॅव्हा आर्ट गॅलरी, रॉक गार्डन, गंगा माया पार्क, पीस पॅगोडा, बोटॅनिकल गार्डन आणि नाईटएंगल पार्क. रॉक गार्डन आणि गंगा माया पार्क हे दार्जीलिगमधील लोकप्रिय पिकनिक स्पॉट मानले जातात. ही ठिकाणं नैसर्गिक धबधब्यांनी संपन्न आहेत. तेथे निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत बोटिंगची मजा लुटता येते. बोटॅनिकल गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रजातीच्या वनस्पती आढळतात. दार्जीलिंग-रंगीत व्हॅली पॅसेंजर केबल कार हे दार्जीलिंगचं आणखी एक वैशिष्ट्य. याला रोपवे असंही म्हटलं जातं. हा प्रवाशांना वाहून नेणारा जगातील सर्वात जुना रोपवे आहे. हा रोपवे दार्जीलिंग शहराला सिंगला बाजाराशी जोडतो.सेंचाल तलाव, धिरधाम मंदिर, हॅपी व्हॅली टी गार्डन, पद्मजा नायडू हिमालयन प्राणीसंग्रहालय, हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट, राज भवन, तिबेटन रिफ्युजी सेल्फ हेल्प सेंटर हीसुद्धा दार्जिलिंगमधील प्रेक्षणीय स्थळं आहेत. साहसी खेळांची आणि गिर्यारोहणाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी तर दार्जीलिंगची सहल ही पर्वणीच ठरते. दार्जीलिगमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग हाही नवा अनुभव आहे. तिस्ता नदीमध्ये वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवता येतो. दार्जीलिंगला भेट द्यायची अस ल तर किम
न आठ दिवसांची सुट्टी काढायला हवी. नेहमीची धावपळ बाजूला ठेवून निसर्गात मनसोक्त रमायचं असेल तर दार्जीलिंगला भेट द्यायलाच हवी.कसे जाल ? कुठे रहाल ?दार्जीलिंगला जाण्यासाठी वाहतुकीच्या बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. सिलीगुडी हे दार्जीलिगपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेले शहर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. बागडोगरा हा दार्जीलिगच्या सर्वात जवळचा विमानतळ. हा विमानतळ भारतातील प्रमुख शहरांमधील विमानतळांशी जोडला गेला आहे. बागडोगरावरून दार्जीलिंगला पोहोचायला सुमारे तीन तास लागतात. रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर न्यू जलपैगुडी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणाहून देशातील सर्व शहरांमध्ये रेल्वे सुविधा उपलब्ध आहेत. दार्जीलिंगला जाण्यासाठी सिलीगुडीवरून बस सेवा उपलब्ध आहे. मात्र, बसपेक्षा खासगी वाहनांचा शेअरिंग तत्त्वावर केला जाणारा प्रवास सोयीस्कर ठरतो. खासगी वाहनाने सिलीगुडीवरून दार्जीलिंगला
पोहोचायला माणशी 100 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. दार्जीलिंगवरून कलींगपाँगला भेट देण्यासाठी जायचे असेल तर जीप उपलब्ध आहेत. दार्जीलिंग हे जगातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने तेथे राहण्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. हॉटेलच्या दर्जाप्रमाणे आणि ठिकाणाप्रमाणे दर बदलतात. हे दर एका दिवसासाठी पाचशे रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत असू शकतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा पर्यटनाचा हंगाम असल्याने या काळात दार्जीलिंगला जायचे असेल तर आगाऊ बुकिंग करणे सोयीचे ठरते.
(अद्वैत फीचर्स)
— स्नेहल यवतीकर
Leave a Reply