Advt1Right
जीवनात प्रत्येकाला पदोपदी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मग त्यासाठी गरज असते गुरुची. आई-वडिल हे तर गुरूस्थानी असतातच. शिवाय शिक्षकांचं मार्गदर्शनही मोलाचं ठरतं. या सार्यांकडून झालेली जडणघडण आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करुन देते. म्हणून गुरूंची महती थोर आहे. गुरू-शिष्याचं नातं असं बंदिस्त, बांधलेलं आणि एकजीवाचं असतं. फार पूर्वीपासून आपल्याकडे गुरू-शिष्याची
परंपरा अस्तित्वात आली. आपल्या पूर्वकालीन धर्मसाधनेत गुरूचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या काळातील साहित्य गुरूंच्या गौरवांनी भारलेलं आहे. भारतीय संस्कृतीचा पायाच मुळी सद्गुरूच्या श्रेष्ठतेवर आधारित आहे. ‘आचार्य देवो भवः’ हा आपला तत्त्वमंत्र आहे. महाराष्ट्रात तर सार्या संप्रदायांमध्ये सद्गुरूचं महत्त्व मानलं गेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज नाथसंप्रदायी होते. नाथसंप्रदायाला ‘गुरूसंप्रदाय’ असंही म्हणतात. ‘निगुराम रहिबा’ ही नाथसंप्रदायाची शिकवण आहे. गुरूंच्या म्हणजे मत्स्येंद्रनाथांच्या वडा खाण्याच्या साध्या इच्छेसाठी त्यांच्या शिष्याने म्हणजेच गोरक्षनाथांनी एक डोळा काढून दिल्याची कथा सांगितली जाते. हाच आदर्श ज्ञानेश्वरांसमोर होता. नाथसंप्रदायात मत्स्येंद्र-गोरक्षनाथ ही गुरू-शिष्य जोडी श्रेष्ठ समजली जाते. त्याचप्रमाणे निवृत्ती-ज्ञानेश्वर ही गुरू-शिष्य जोडीदेखील महत्त्वाची मानली जाते. गुरूमुळे शिष्याचं श्रेष्ठत्वही वाढतं.
आपल्या जीवनात चांगला गुरू मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. आध्यात्मिक मार्गात गुरूचं महत्त्व असाधारण आहे. ‘गुरूविण कोण दाखविल वाट’ असं म्हटलं जातं. रोजच्या जीवनात, शिक्षणात किवा इतर क
षेत्रात योग्य मार्गदर्शन म्हणजेच चांगला गुरू मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. गुरू हा परमेश्वर असतो. कर्ता-करविता तोच असतो. गुरूपौर्णिमेला गुरूचं स्मरण, पूजन, कृतज्ञता व्यक्त केली जाते. चांगले शिष्य आपल्या यशाचं सारं श्रेय गुरूला देतात. आपलं कर्तृत्व, यश गुरूला अर्पण करायला प्रत्येक शिष्याला आवडतं. गुरूच्या समोर शिष्य स्वतःचं अस्तित्वं विसरून जातो. प्रणाम गुरूदेवजीको वारंवार । गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू, महेश्वर गुरू परब्रह्म अपार । एक परब्रह्म रूप चतुर्धर। लीला करत विहार । ब्रह्मरूप हो वेद प्रकट कर । रचो सकल संसार ।। विष्णूरूपहो दृष्ट रुलावत । प्रलय करे संहार । अचल राम मुमुक्षुके कारण सद्गुरू मूर्ती ले धार ।। जीवनात चांगला गुरू भेटल्यावर कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत असा विश्वास व्यक्त केला जातो. गुरू हा कामधेनूसारखा आहे. आपल्याजवळ कामधेनू असेल तर कशाचीच कमतरता भासत नाही.
जयास कामधेनू मायेतयास अप्राप्य काही आहेम्हणोनी मी प्रवर्ते लाहेइये ग्रंथी ।।हा ठावोवरी माते पुरतया सारस्वतेकेले असे श्रीमंते श्रीगुरूराये ।।
यामध्ये गुरू मला काहीच कमी पडू देणार नाही, असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. एखादी गोष्ट कमी असेल तर त्याची उणीव गुरू निश्चित भरून काढतील हा विश्वास यामागे आहे. गुरूची सेवा कशी करावी, हे ज्ञानेश्वरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. ते म्हणतात, ‘जिवंतपणी मी गुरूंची सेवा करीन; पण मरणानंतरही माझं शरीर गुरूंच्या उपयोगी आलं पाहिजे.’
इये शरीरीचिये मातीमेळवीन तिथे क्षिती
असं ते म्हणतात. लहान मूल आईचं दूध पिताना तिच्या अंगाशी झटत असतं. त्यामुळे आईला प्रेमाचं भरतं येतं. वासरू गाईला ढुशी मारतं. मग गाईला पान्हा फुटतो. त्याचप्रमाणे शिष्याच्या सततच्या सहवासाने गुरूंना पान्हा फुटेल, प्रेमाचं भरतं येईल. यामुळे गुरू-शिष्याचं नातं विश्वात्मक आणि विश्वजित बनत जातं. गुरूंना आपण अनेक उपमा देतो. तरीदेखील त्या आपल्याला कमीच वाटतात. या सर्व उपमांमध्ये काही तरी उणीव राहून गेली असं वाटतं. गुरूचा महिमाच असा अगाध आहे. गुरूचं मोठेपण, त्यांची स्तुती कमी पडते की काय, असं वाटणं यातूनच गुरूवरील प्रेम व्यक्त होत असतं.
गुरू हा परिपूर्ण पुरूषोत्तम आहे. त्यांच्या सहवासात आल्यामुळे ते आपलं हितच पाहत असतात. चंदनाच्या झाडाच्या आसपास असणार्या इतर झाडांना चंदनाचा वास लागतो. तसाच गुरूंचा सहवास आहे. त्यामुळेच जीवनात चांगला गुरू मिळणं आवश्यक आहे. गुरूपौर्णिमा हा सद्गुरूंच्या पुजनाचा दिवस आहे. गुरूंची पूजा ही व्यक्तिपूजा नाही. तर ती देहातील आत्म्याची पूजा आहे. त्याचप्रमाणे ही ब्रह्मज्ञानाची पूजा आहे. गुरूपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. वसिष्ठ मुनींचा नातू पराशर ऋषींचा मुलगा वेदव्यास यांचा जन्म झाला त्यावेळी
ते तेजःपुंज तर होतेच; पण
जन्मल्यावर त्यांना बोलताही येत होतं. आपण तपस्येसाठी वनात जात आहोत, असं त्यांनी जन्मल्यावर लगेच आईला सांगितलं. त्यावेळी त्याची आई म्हणाली, ‘तू लवकरच तपस्येसाठी जात आहेस. मग माता-पित्यांची सेवा कधी करणार ? माता-पित्यांची सेवा करणं हे मुलाचं प्रथम कर्तव्य आहे.’ त्यावेळी वेदव्यास आईला म्हणाले, ‘तुला आठवण येईल, महत्त्वाचं काम असेल त्यावेळी निश्चितच तुला भेटण्यासाठी येईन.’ त्यानंतर वेदव्यास तपस्येसाठी बद्रीकाश्रमात गेले. त्या ठिकाणी ते समाधीअवस्थेत असत. बद्रीकाश्रमात जास्त दिवस राहिल्यामुळे त्यांचं नाव बादरायण असं पडलं. व्यास ऋषींचं दुसरं नाव द्वैपायन असंही आहे. तसंच त्यांना कृष्णद्वैपायन असंही म्हणत. त्यांनी वेदांचा अभ्यास करून त्यांचा विस्तार केला. म्हणून त्यांना वेदव्यास असं म्हणतात. ज्ञानाचा अथांग सागर, भक्तीचे आचार्य, ज्ञानाची पराकाष्ठा आणि कवित्व असे गुण असलेला त्यांच्याइतका दुसरा कवी अद्यापही झालेला नाही. म्हणूनच आषाढ शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं नाव देण्यात आलं आहे. ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. कारण परमात्म्याचं ज्ञान, आशीर्वाद या पौर्णिमेला मिळतात असा समज आहे. मनुष्याला ज्ञानाच
लालसा आहे, ज्ञान मिळवण्याची आसक्ती आहे तोपर्यंत ज्ञानी गुरूंचं, ब्रह्मज्ञानी गुरूंचं पूजन होतच राहणार.
Advt2Right
व्यासमुनींनी वेदांचे वेगवेगळे भाग केले आहेत. ब्रह्मसूत्र व्यासांनीच लिहिले. पाचवा वेद म्हणून त्यांनी महाभारत रचलं. भक्तीग्रंथ भागवतपुराण त्यांनीच रचलं. या विश्वात असलेल्या धार्मिक ग्रंथातील सात्त्विक आणि मानवी जीवनाचं कल्याण करणार्या गोष्टी व्यासांच्या शास्त्रावरच लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळेच ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ असं म्हटलं जातं. व्यासांनी आयुष्याच्या खर्या कल्याणाची वाट दाखवून पूर्ण मानवजातीचंच कल्याण केलं आहे. व्यासांच्या शास्त्रांचा अभ्यास, पठण, मनन केल्याशिवाय कोणी आध्यात्मिक उपदेश करू शकत नाही. व्यास पौर्णिमेच्या काळात केलेलं पूजन, अर्चन, गुरूवंदन, गुरूपूजा हे वर्षभरातील इतर पौर्णिमेपेक्षा अधिक प्रभावी आणि फलदायी ठरतं. ही पौर्णिमा पुण्याचं फळ देते, आपल्याला नवी दिशा दाखवते, नवे संकेत आणि कृतज्ञता हे सद्गुण देऊन जाते. कठोर परिश्रम, मेहनत करून आपल्यासाठी ज्ञानाचं भांडार खुलं केलेल्या गुरूजनांना, ज्ञानी महापुरुषांना स्मरण्याचा हा दिवस.
श्रीरामांनीसुद्धा गुरूगृही शिकावयास जाताना आई-वडिलांबरोबर गुरूचरणांवर डोकं टेकवलं होतं. तप, व्रत आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. संयम, सहजता, शांती, माधुर्य आणि जीवनाला योग्य दिशा दाखवणारी ही पौर्णिमा आहे. ईश्वराची प्राप्ती, ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी, गुरूंचं स्मरण करायला लावणारी, श्रद्धेचा मार्ग दाखवणारी अशी ही व्यास पौर्णिमा आहे. म्हणूनच तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
— वैजयंती कुलकर्णी
this information is veri useful and vast. i will use this info in my tommorows speach. thanks to the publisher.