झुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी..हे गाणं म्हणजे रेल्वे नामक एका भव्य युगाशी आपली बालपणीच झालेली ओळख. आमच्या पिढीने तर जन्मापासूनच या झुकझुक गाडीचा प्रवासमय आस्वाद घेतला. परंतू, हजारो प्रवाशांना एकत्र घेऊन जाणारी ही रेलगाडी भारतात पहिल्यांदा कधी धावली आणि या रेल्वे नामक एका ‘चाक्या म्हसोबा’ चा चमत्कार बघून लोकांनी तिचं स्वागत कसं केलं हे ऐकून आजच्या आणि येणार्या अनेक पिढ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
जगात पहिली रेल्वे धावली ती इंग्लंडमध्ये १८२५ च्या सुमारास. इ.स. १८४४ मध्ये महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक अशा जगन्नाथ शंकरशेठ यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरु करावी, असा प्रस्ताव ब्रिटिशांकडे मांडला. त्यांच्या याच प्रस्तावाला मान्यता देऊन ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे पहिली कुदळ मारुन रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. कोणतेही मोठे काम हाती घेतले की वाद हा होणारच. असे वाद त्या काळीही होतेच. हिंदुस्थानात धावणारी ही रेल्वे मीटर गेज रेल्वे असावी की ब्रॉड गेज यावर तो वाद उद्भवला होता. अनेक अडथळ्यांना पार करत ही रेल्वे हिंदुस्थानात दाखल झाली. १६ एप्रिल १८५३ चा दिवस उजाडला आणि हिंदुस्थानातली पहिली रेल्वे मुंबईत धावली.
१६ एप्रिल १८५३ हा दिवस म्हणजे त्यावेळच्या समस्त भारतीयांसाठी एक चमत्कारच होता. आपणही त्या काळी असतो तर रेल्वे नावाची अजब गजब जादू बघून आपणही गोंधळलो नसतो तर नवलच ! तर असा हा दिवस. या दिवशी साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. कोठल्याच बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा एतद्देशीय नेटिवांना चमत्कारासारखाच वाटत होता. ही त्यावेळच्या तमाम भारतीयांसाठी एक जादूच होती. मोठमोठे साहेब, नेटिव्ह आणि अनेक मंडळी या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी जमले होते. १८ डबे आणि तीन महाकाय इंजिन जोडलेल्या या हिंदुस्थानातल्या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद त्यावेळी तब्बल ५०० लोकांनी लुटला. नामदार यार्डली, जज्ज चार्लस् जॅकसन् तसेच जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती. त्यावेळी गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांनी या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. पण मजेची गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नी मात्र या समारंभाला आवर्जून उपस्थित होत्या.
दुपारचे ३.३० वाजले आणि एका ऐतिहासिक घटनेला प्रारंभ झाला. एक इतिहास घडला. हिंदुस्थानातला पहिला वहिला रेल्वेप्रवास सुरु होण्याआधी तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या महाकाय आणि त्याकाळी कोणालाही वाटेल अशा राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ जणू काही काळ्या ढगांप्रमाणे भासत होते. काळे पोषाख घातलेले इंजिनाच्या पोटात बसलेले खलाशी, फावडयाने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन महाकाय राक्षसी इंजिनांनी खरोखर एक चमत्कारच घडवला. ती गाडी चक्क चालू लागली होती. लोकांमधल्या चर्चेला उधाण आले. सगळीकडे एकच चर्चा होती, आपण पुराणकाळातील अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रजांचा राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून देवाचाच अवतार असावा, अशी लोकांची समजूत झाली. ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून अक्षरश: लोटांगण घातले. कधी न पाहिलेला तो गाडीचा वेग, ते महाकाय इंजिन, शिट्टयांचा आवाज यामुळे लोक भयचकित नक्किच झाले होते. एवढंच काय, गायी, बैल भेदरले आणि कुत्रेही पिसाळल्यासारखे भुंकू लागले. या सगळ्याबरोबर लष्करी बॅंडही निनादत होताच. मुंबई ते ठाणे हे अंतर कापायला गाडीने तब्बल ५७ मिनिटे घेतली. गावागावात लोक या नव्या आणि जादूगार गाडीच्या स्वागताला तयार होतेच. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा भलीमोठी गर्दी तिच्या स्वागतासाठी सज्ज होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर, डोंगरावर, जागा मिळेल तिथे उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते. मुंबईहून तिने प्रस्थान केले , तेव्हा तिला उत्सुक लोकांनी दंडवत घातला व नारळ फोडले.अखेर ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनवर पोचली, तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. उपस्थित सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे आटोपून ६.३० वाजता ठाणे सो़डून बरोबर ५५ मिनिटांनी हि महाकाय आगगाडी बोरीबंदर स्टेशनावर पोचली. तर असा होता भारतातल्या पहिल्या आगगाडीचा प्रवास. लेखाच्या सुरुवातीलाच या आगगाडीचा ‘चाक्या म्हसोबा’ असा उल्लेख केला आहे. याचे कारण म्हणजे, कोणत्याही चमत्काराला दैवत्व बहाल करणार्या भारतीयांनी त्याचवेळेला या महाकाय आगगाडीचे नामकरण केले होते, ‘चाक्या म्हसोबा’ असे.
हीच रेल्वे पुढे क्रांतीचे प्रभावी हत्यार ठरली. इंग्रजांनी रेल्वे आणली ती त्यांच्या फायद्यासाठी. १८५७ चा उठाव दडपण्यासाठी रेल्वे ही त्यांच्याकडची फार मोठी शक्ती होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची रेल्वे आशिया खंडात सर्वात मोठी तर जगात आज दुसर्या क्रमांकावर आहे. २००३ च्या सुमारास भारतात रेल्वेयुग अवतरून १५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने १५० वर्षापूर्वीच्या इंजिनाला डबे जोडून तशाच प्रकारचा दिमाखदार सोहळा केला , तो पाहायलाही हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. आजकालच्या वाढत चालेल्या आधुनिकिकरणाकडे बघून पुलंचे एक वाक्य आठवते ” जुनी संस्कृती नदीच्या काठाने वसली होती, नवी संस्कृती रुळांच्या काठाने वसते आहे “.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply