एकीकडे दाट धुके तर दुसरीकडे डोंगरमाथ्यावरून जमिनीवर बरसणारे धबधबे… प्रत्येक धबधब्याचे वेगळे सौंदर्य… त्याच्या जोडीला झाडांवर आढळणाऱ्या शेवाळाचा गालिचा… हे सर्व बघताक्षणी आकर्षिक करते. डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या जलधारांना प्रत्येक पर्यटक आपल्या कॅमेरात बंद करू पाहतो. मात्र हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवण्यातच एक मोठा आनंद आहे. प्रत्येक धबधब्याखाली चिंब भिजण्याचा मोह आंबोलीत आल्यानंतर आवरता येत नाही. या धबधब्याच्या अनोख्या सौंदर्यामुळे लाखो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे पावसाळी पर्यटन म्हणून आंबोलीची एक ओळख कायम राहिली आहे.
श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरपिसारा
मंगेश पाडगावकरांची या कवितेची अनुभूती आंबोली घाटात आल्यावर प्रत्येक क्षणी येते. निसर्गाच्या या अद्भूत सौंदर्याची किमया जलधारांच्या स्वरूपात मानवी मनाला मोहून जाते. दाट धुक्यांमध्ये डोंगरावरून वाहणाऱ्या या जलधारा एका क्षणी आपले चित्त हरवून टाकतात. दररोजची कामाची धावपळ, चिंता, ताणतणाव या अद्भूत निसर्गाच्या सानिध्यात एका क्षणात विसरून जातात.
सदाहरित निसर्गाचे कोंदण लाभलेली आंबोली हे जिल्ह्यातील एकमेव गिरीस्थान (हिल स्टेशन) आहे. आंबोली ही तत्कालीन सावंतवाडी संस्थानची उन्हाळी राजधानी होती. सावंतवाडी-बेळगाव रस्त्यावर सावंतवाडीपासून फक्त 30 कि.मी. वर हे रम्य गाव समुद्रसपाटीपासून 2378 फुट उंचीवर वसले आहे. सभोवताली दाट जंगले, हिरव्यागार दऱ्या, प्रसन्न शांतता यामुळे पर्यटकांसाठी हे नंदनवनच झाले आहे. कोल्हापूर, बेळगाव, गोवा या सर्व ठिकाणांपासून जवळ असलेली आणि सर्व ऋतूमध्ये सदाबहार आल्हाददायक असलेली आंबोली वर्षभर गजबजलेली असते.
पावसाळ्यात कड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे आणि घनदाट धुक्यांमुळे आंबोलीचे सौंदर्य आणखीनच खुलते. आंबोली परिसरात निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक पाँईट आहेत. महादेवगड, नारायणगड, कावळेसाद, सूर्यास्त दर्शन, पूर्वीचा वस देवस्थान, शिरगावकर, पीरक्षित, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान या सर्व पाँईटवरून होणारे निसर्गाचे दर्शन अत्यंत विलोभनीय आहे. आंबोली घाटात आंबोलीपासून तीन कि.मी. वर असलेला मुख्य धबधबा हे पावसाळी हंगामातील सर्वात मोठे आकर्षण आहे. लक्षावधी पर्यटन या धबधब्याला भेट देऊन स्नानाचा आनंद लुटतात. त्यामुळे पावसाळ्यातील सुट्टीच्या दिवशी या आंबोली घाटात एकदा तरी फिरुन हा स्वर्गीय आनंद घ्यायला काय हरकत आहे.
– संध्या गरवारे, जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग
महान्यूज मधून साभार
— संध्या गरवारे
Leave a Reply