
साहित्य : हापुसच्या आंब्यांचा रस १ भांडे, पाव भांड्यापेक्षा कमी साखर, खवा, बदाम, पिठी साखर, थोडासा केशर.
कृती : हापूसचे चांगल्या क्वालिटीचे आंबे घेऊन त्याचा रस काढावा. तो रस पातेल्यात (जाड बुडाच्या पातेल्यात) ठेवावा.
आंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये फरक असतो. परंतु त्यातील रसाचे पण मोदक चांगले होतात. सीझनमध्ये हा रस आटवून ठेवला की वर्ष-दोन वर्षे सुध्दा चांगला राहतो. मग आपल्याला केव्हाही त्याचा उपयोग करुन घेता येतो. फक्त पिठीसाखर मोदक तयार करताना मिक्स करायची.
तयार रस वापरल्यास साहित्याचे प्रमाण :- १ डबा रस + १|| मूठ साखर (एवढाच फरक)
सारणाची कृती :- खवा जरा आपल्या प्रमाणाप्रमाणे जास्त घेऊन परतून घ्यावा. चांगला खरपूस भाजून झाला की त्यात (गार झाल्यावर) पीठी साखर आपल्या आवडीप्रमाणे घालावी. त्यात बदाम, पिस्त्याचे पातळ, लहान-लहान तुकडे करुन टाकावे. थोडासा केशर घालावा व मिश्रण चांगले कालवून ठेवावे.
कृती :- जाड बुडाच्या पातेल्यात किंवा ओगलेच्या भांड्यात रसामध्ये साखर घालून रस आटवावा. रसाचा गोळा झाला की गार करत ठेवावा. नंतर त्यात प्रथम १|| ते २ वाट्या पीठीसाखर घालावी व ते एकजीव करावे आणि मग हलक्या हाताने मळत, मळत आवश्यकतेप्रमाणे थोडी थोडी पिठीसाखर घालत त्याचा गोळा करावा. हळूहळू हा गोळा उकडीच्या मोदकाच्या पीठाप्रमाणे होऊ लागतो. मग वठण्याइतपत झाला की आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लहान-लहान गोळे करुन मोदक हलक्या हाताने वळावेत. आणि त्यात सारण भरुन मोदक तयार करावे.
मोदक साच्यामध्ये केले तरी चालतील. परंतु कसेही केले तरी हलक्या हाताने करावेत. ह्या मोदकाचा आंब्यामुळे रंग पण फार छान दिसतो व चव पण अप्रतिम असते. विशेष म्हणजे तो दिसतो असा की त्यामध्ये कसलेतरी पीठ असणार असे वाटते. पण तसे काहीही नसते. ह्यामध्ये फक्त आमरस व पिठीसाखर, खवा एवढेच असते. त्यामुळे ते खव्याच्या पेढ्याप्रमाणे किंवा मोदकाप्रमाणे उपवासाला सुध्दा चालतात. आमरस आटल्यावर त्याचा रंग जरा बदलतो. पण मोदक झाल्यावर (पिठीसाखर मिक्स झाल्यावर) त्याचा रंग परत आमरसा सारखाच दिसतो.
Leave a Reply