अमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत त्याला म्हणाला, बाळा… तू एक दिवस खूप मोठा गायक होशील..
हा चिमुरडा म्हणजेच हिंदी चित्रपट संगीताचा सर्वोत्कृष्ट आणि जगातल्या उत्तम गायकांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, असे मोहम्मद रफी… आजचा तानसेन, फरिश्ता, शापित गंधर्व अशा कितीतरी नावांनी जग रफींना ओळखतं. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी त्या काळच्या प्रत्येक मोठ्या संगीतकाराबरोबर काम केलं. शास्त्रीय असूदेत नाहीतर देशप्रेमाची गाणी नाहीतर कव्वाली, भजन असूदेत नाहीतर गझल, त्यांनी प्रत्येक मूडची गाणी म्हटली पण रफी जर सर्वात लोकप्रिय असतील तर ती प्रेम गीतं आणि युगलगीतांसाठी. त्यांनी त्या त्या काळच्या प्रत्येक मोठ्या कलाकारासाठी गाणी म्हटली आणि जॉनी वॉकरसाठी तर रफी वेगळा आवाज काढायचे. किती आणि काय लिहिणार रफींबद्दल ! जेवढं लिहू तेवढं कमीच…
त्यांच्या उदारतेचे अनेक किस्से सांगितले जातात. या रुपेरी सृष्टीत त्यांनी अनेकांना मदत केली, एवढंच नाही तर कोणीही असूदेत अगदी कोणीही त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेला कधीच रिकाम्या हाताने परत जात नसे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हातावरही काही ठेवल्याशिवाय ते पुढे जात नसत. अशा अतिशय दानी, मृदू स्वभावी, गोड गळ्याचा शापित गंधर्व, माझा देव १९८० साली आजच्याच दिवशी या इहलोकला सोडून पैगंबरवासी झाला. अनेक अनेक लोकांसाठी हा मोठा धक्का होता आणि तो ही अनपेक्षितपणे बसलेला. शेवटी त्यांना जेव्हा रुग्णालयात नेलं तेव्हा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत बघून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही हातपाय गळाले. त्यांना जेव्हा मृत घोषित करण्यासाठी डॉक्टर त्यांच्या घरच्या लोकांजवळ आले तेव्हा म्हणाले, माझे प्राण देऊनही मी रफींना वाचवू शकलो असतो तर मी ते ही केलं असतं. वैद्यकीय शास्त्र एवढंही पुढारलेलं नाही, नाहीतर मी रफीसाहेबांचा गळा जतन करून ठेवला असता. डॉक्टर रफींचे मोठे चाहते होते.
या चित्रपटसृष्टीत प्रत्येकाचा एक काळ असतो. जेव्हा एक तारा उगवतो, तेव्हा हळूहळू जुने तारे अस्ताला जात असतात. असंच थोडंफार घडलं जेव्हा किशोर कुमार या चित्रपटसृष्टीत आला. चित्रपट संगीत हळूहळू बदलत होतं. मेलडीचा काळ सरत होता, बदलत्या चित्रपटसंगीताबरोबर हळूहळू रफींबरोबर किशोर युग यायला लागलं. रफींचं एक साम्राज्य होतं आणि त्याला टक्कर देण्यासाठी किशोर सज्ज होता पण ही स्पर्धा फक्त व्यावसायिक स्तरावर होती, व्यक्तिगत जीवनात हे दोघे अतिशय चांगले मित्र होते. आपली जागा कोणीतरी घेऊ पहात आहे म्हणत रफींनी कधीही किशोरचा दुस्वास केला नाही, उलट किशोरला आपला लहान भाऊ मानलं आणि किशोरनेही आपल्याला मिळणाऱ्या यशाचा माज रफींसमोर कधीही दाखवला नाही, किशोरच्या मनातही या भावना कधीच नव्हत्या. या दोघांच्या घट्ट मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. रफी गेल्याची बातमी जेव्हा पसरली आणि ती किशोरच्या कानावर आली तेव्हा तडक किशोरने रफींचं घर गाठलं. त्या वेळी रफींच्या घरी येणारं पहिलं जर कोणी असेल तर तो होता किशोर कुमार. रफींच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कित्येक तास रडत होता, अगदी जनाजा उठेपर्यंत… ही माणसंच वेगळी होती. हे असं प्रतिस्पर्ध्यांमधलं प्रेम हल्ली बघायला नाही मिळत.
रफींच्या घराजवळ एक विधवा बाई रहायची. तिला दर महिन्याला ठराविक दिवशी एका निनावी व्यक्तीकडून मनी ऑर्डर मिळायची. दर महिन्याला अगदी न चुकता हे घडायचं. एकदा सलग दोन तीन महिने तिला ही मनी ऑर्डर मिळाली नाही. तिने डाकघरात जाऊन चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की आपल्या शेजारी राहणारे मोहम्मद रफी तिला दर महिन्याला पैसे पाठवायचे. ती बाई हे कळल्या कळल्या तिथे पोस्टातच ढसाढसा रडायला लागली.
ही अशी लोकं सारखी सारखी जन्माला येत नाहीत, फार क्वचित. कुठे एखाद्या गंधर्वाला शाप मिळतो आणि तो शाप भोगायला त्याला मृत्युलोकात यावं लागतं.
Leave a Reply