नवीन लेखन...

आत्मकेंद्री व्यवहार दहशतवादाला पोषक

26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यामुळे समाजाची झोप उडाली नाही. आज समाजाचे व्यवहार प्रचंड अर्थकेंद्री बनले असल्याने आजूबाजूला घडणार्‍या दुर्दैवी घटनांची नोंद एका मर्यादेपर्यंतच घेतली जाणार असेल तर एकसंघ समाज म्हणून आपण देशापुढील समस्यांना कधी आणि कसे सामोरे जाणार याचा गांभीर्याने विचार करायला हवा.


मुंबईवरील भयावह दहशतवादी हल्ल्याला 26 नोव्हेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत असताना हल्लेखोरांना आणि त्यांना हाताळणार्‍या आंतरराष्ट्रीय व्यक्ती, देश, संघटना यांना हवे होते ते मिळवण्यात यश आलेले नाही. म्हणजे हा हल्ला दहशतवादी होता असे म्हटले गेले तरी त्याची दहशत एका आठवड्यातच ओसरलेली दिसली. कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा हेतू त्या समाजाची झोप उडवण्याचा असतो. मुंबईवरील हल्ला मात्र कुणाचीही झोप फारशी उडवू शकला नाही. याचा अर्थ भारतीय माणूस निडर आहे असे नाही तर तो सांसारिक गोष्टींमध्ये इतका गुरफटला आहे की अशा दहशतवादी हल्ल्यामुळे त्याच्या संसारात काही फरक पडलेला नाही.

या देशाचा सारा कारभार आणि भारतीय माणसाचे सारे व्यवहार अर्थकेंद्री होत चालले आहेत. अर्थकेंद्री आयुष्यामध्ये जोखीम टाकून सुरक्षिततेचा स्वीकार करण्याकडे अधिक कल असतो. त्यातून अस्थिर अर्थव्यवस्था, असुरक्षित जीवन तयार होत असते. सध्या आर्थिक मंदी, बेकारी आणि वाढते दारिद्र्य या बाबी भारतीयांना बेजार करत आहेत. या लढाया लढण्यातच त्यांचा प्रचंड वेळ जात आहे. मध्ययुगातील भारतीय माणूस शेजारच्या मैदानात लढाई सुरू असताना आपले शेत कसत होता आणि जणू काही आपला आणि लढाईचा काही संबंध नाही असे वागत होता. तशीच प्रचिती सध्या येत आहे. अशा काळात प्रत्येकाला स्वत:वरील संकटे देशावरील संकटांपेक्षा मोठी वाटतात. अशा वातावरणामध्ये प्रत्येक भारतीय माणूस स्वार्थी आणि आत्मकेंद्री होणारच आहे. भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही तासात मुंबईतील

जनजीवन सुरळीत झाले. त्यामागे धाडसाचा भाग नसून वाट्याला आले ते निमूटपणे सहन करत आयुष्य पूर्ण करण्याचाच तो एक भाग होता. म्हणूनच 26 नोव्हेंबरचा हल्ला तेवढ्यापुरताच दहशतवादी म्हणावा लागेल.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला दोन प्रकारे महत्त्वाचा होता. एक तर त्याने अमेरिकेची मानखंडना केलीच शिवाय आपल्या देशावर कोणीही हल्ला करू शकत नाही हा भ्रम असल्याचे सिद्ध केले. अमेरिका अन्य देशांमध्ये काहीही करू शकते, पण त्या देशात मात्र कुणालाही युद्ध करू देत नाही हा समज वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने पोकळ ठरवला. परिणामी, या घटनेनंतर अमेरिकन नागरिक प्रचंड दहशतीत जगू लागला. मनोविकार, आर्थिक अरिष्ट आणि जीवनशैलीतील बदल, नैसर्गिक वस्तूंकडे ओढा तसेच मनुष्या-मनुष्यातील नातेसंबंधात संशयाची वाढ अशा अनेक सामाजिक समस्या तेथे पहावयास मिळाल्या. अर्थात वर्ल्ड ट्रेड सेंटरनंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला होऊ शकला नाही याचे कारण त्या हल्ल्यामागील दहशतीचा प्रभाव योग्य काम करून गेला होता. भारतात मात्र संसदेवरील हल्ला असो वा मुंबईवरील, दोन्हीही ठिकाणी संपूर्ण देश मानसिकदृष्ट्या खचल्याचे जाणवले नाही. जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने भारतीय माणूस वागला. 2006 मध्ये मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये सहा बॉम्बस्फोट झाले. तेव्हाही अशीच अवस्था जाणवली. ताज हॉटेल आणि सीएसटी येथील हल्ले जास्त प्रसिद्धी मिळवून गेले. मात्र, ते कायमस्वरूपी दहशत उत्पन्न करू शकले नाहीत. राजकीयदृष्ट्या भारतीय व्यक्तीचे लोकशिक्षण कमी होत असल्याचा हा एक प्रकार आहे, असेही मानता येईल.

दहशत म्हणजे काय, दहशतवादी कोण, आंतरराष्ट्रीय कट म्हणजे काय, माणसे मारून फायदा काय अशा अनेक प्रश्नांची सामान्य माणसांना जाणच करून दिली जात नाही. राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांनी रा. स्व. संघाला दहशतवादी म्हणणे आणि दोन्ही संघटनांनी ते नाकारणे यातून लोकशिक्षण घडत नाही. तिसर्‍या जगामध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान वगळता अन्य कोठेही म्हणावा तसा मोठ्या प्रमाणावर दहशतवाद प्रकटलेला नाही. राज्यकर्त्यांना लोकांमध्ये रोगराईची जाणीव करून घ्यावी लागतेतशी देशापुढील दहशतवादा सारख्या विविध प्रश्नांचीही जाणीव करून द्यावी लागते. भारतीय राजकीय पक्ष मात्र आपल्या जाहिरनाम्यात आणि राजकीय कार्यक्रमांद्वारे त्या पद्धतीचे लोकशिक्षण करत नाही.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे स्मृतीदिन आपण शहीद दिवस म्हणून साजरे करतो, पण त्यातून लोकांपर्यंत दहशतवादाची जाणीव पोहोचलेली नाही. पंजाब, आसाम येथील तरुणांच्या हिंसक कारवाया नि:संशय दहशतवादी प्रकारात मोडल्या पाहिजेत. परंतु त्याची आठवणही आता भारतीयांच्या मनावर दिसत नाही. माध्यमे दहशतवाद्यांचे लक्ष्य असतात. मूठभर दहशतवादी माध्यमांना वापरूनच दररोज लोकांपर्यंत दहशत पोहोचवत असतात. भारतीय माध्यमे तेवढ्यापुरती अशी जाणीव करून देतात; परंतु त्यात सातत्य राहत नाही. ज्या वर्गासाठी ही माध्यमे कार्यरत दिसतात तो वर्ग देशात दारिद्र्य, दु:ख, शोषण, विषमता आणि अत्याचार या सार्‍या समस्या जवळपास नाहीतच असे चित्र उभे करतो. त्यामुळे अनेक व्यक्तींच्या यशकथा, श्रीमंतांची यादी, सौंदर्याची वृद्धी करणाऱ्या जाहिरातींची यादी, चित्रपटातील नट-नट्या, कि’केटपटूंचे खेळ आदी विधायक आणि आनंदी वाटतील अशा घटनांची मालिका माध्यमांमधून सादर होत रहाते. साहजिकच माध्यमांचा प्रेक्षक आणि वाचक मागचे विसरतो आणि वर्तमानात गुरफटून भविष्याविषयी बेफिकीर बनतो.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचार वाढेल तितका दहशतवादाचा धोका अधिक असतो. मनुष्य एकदा नीतिमत्ता घालवून बसला की देश, भाईबंद अथवा राष्ट्रहित हे काही बघत नाही. भ्रष्टाचाराने एक प्रकारची मानसिक उन्नता येते. भ्रष्टाचारी माणूस, कुटुंब, पक्ष आणि समाज भेकड आणि कातडीबचाव बनून जातो. आधीच अर्थकेंद्री व्यवहारांमुळे स्वार्थी झालेला माणूस भ्रष्टाचारामुळे आणखी स्वार्थी बनून जातो. स्वार्थापुढे त्याला देशावरील अथवा समाजावरील हल्ले जाणवतच नसतात. दहशतवाद माजवणारे लोक भ्रष्ट व्यक्तींना कायम गुरकत असतात. त्यांच्या मदतीवाचून दहशतवादी हल्ला पूर्ण होत नसतो.

समाज जितका भ्रष्ट

असतो तितकाच दहशतवादी हल्ल्यांना पटकन बळी पडतो. दहशतवाद आणि भ्रष्टाचार एकमेकांचे पाठीराखे असतात. त्याची अनेक उदाहरणे भारतात अगदी मुंबईतही आपण सर्वांनी पाहिली आहेत. करकरे यांना मिळालेले जॅकेट असो की, उदगीरमधील ग्लोबल इंटरनेट कॅफेला मिळालेली जागा असो या सार्‍यातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. वास्तविक अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे भ्रष्टाचार दडला आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याने जो कार्यभाग साधावयास हवा होता तो साधला नसला तरी यापुढे राज्यकर्ते आणि नागरिक भ्रष्टाचारात बरबटून जातील तितके दहशतवादी हल्ले सोपे आणि प्रभावी होत जातील.

अर्थात याचा अर्थ अमेरिका भ्रष्टाचारी नाही असा होत नाही. परंतु, एकमेकांविषयी किमान आदर आणि एकमेकांच्या कामाची काळजी घेणे याबाबी अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये दैनंदिन जीवनात पहावयास मिळतात. शिक्षणामुळे आत्मगौरव आणि सुखाची जाणीव वाढते. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे या दोन्ही जाणिवा वाढलेल्या दिसतात. त्याचबरोबर वर उल्लेख केलेले धोकेदेखील वाढत आहेत. राज्यकर्ते बेफिकीर म्हणून नागरिकही बेफिकीर असे यापुढे चालू देऊ नये. दोन समुदायांमध्ये केव्हाही दंगल घडवून आणण्याची युक्ती आणि ताकद कोणातही पहावयास मिळते. अर्थात हे प्रगल्भ देशाचे लक्षण नसते. शिक्षण आणि आर्थिक समृद्धी यामुळे देशातील सुरक्षिततेत वाढ होत असते. त्याप्रमाणे भारत प्रगतीकडे वाटचाल करत असताना शेजार्‍यांच्या डोळ्यात खुपतो तसा प्रगतीचा लाभधारक वंचितांच्या डोळ्यात खुपतो हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजेच देशांतर्गत दहशतवादी घटक आंतरराष्ट्रीय घटकांमध्ये सामील होऊ नयेत असे वाटत असेल तर सर्व बाबतीत लोकशिक्षण, जागरुकता, पारदर्शकता आणि सामाजिक न्यायाची चोख अंमलबजावणी याकडे सार्‍यांचे लक्ष असले पाहिजे. आत्ममग्न समाज की समाजवादी समाज, स्वार्थ की परार्थ, भ्रष्टाचार की नीतिमत्ता असे ढोबळ आणि प्राथमिक मुद्दे सत्तास्थापनेसाठी अग्रक्रमामध्ये रहात असतील तर राज्यकर्त्यांची आणि त्यांना निवडून देणार्‍यांची जीवनदृष्टी कमालीची गढूळ झाली आहे हे स्पष्ट जाणवते. म्हणून दहशतवादी हल्ल्यासारखा गंभीर प्रश्न अवघ्या दोन वर्षाचा होऊनही तो पुन्हा उद्भवू नये यासाठी राज्यकर्ते आणि समाज काहीही करत नाही ही फार गंभीर गोष्ट मानावी लागेल.

(अद्वैत फीचर्स)

— जयदेव डोळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..