शिक्षणास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि उत्पन्नात भरीव वाढ करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील रहिवासी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी घालून दिले आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. चव्हाण यांनी फळबाग आणि भाजीपाला पदविका मिळविली. पदविका घेत असतानाच ते खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राचे सदस्य झाले आणि कृषिविषयक माहिती घेऊ लागले.श्री. चव्हाण यांच्याकडे ११२ एकर शेती आहे. शेतात चार विहिरी देखील आहेत. त्यांनी कृषि विभागातील विविध योजनांची माहिती घेऊन राज्यातील व राज्याबाहेरील आयोजित शेती सहलीत सहभाग घेतला. या माध्यमातून फळबाग लागवड, भाजीपाला लागवडीची माहिती घेतली. कडवंची गावातील व महाराष्ट्रातील द्राक्ष बागांना भेटी देऊन त्यांनी माहिती घेतली. माहिती घेऊन झाल्यावर त्यांनी एक एकर क्षेत्रात द्राक्षाची लागवड केली. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, किडींचे व्यवस्थापन अशा सर्व बाबींकडे लक्ष देऊन योग्य नियोजन केले. दोन ते तीन वर्षातच द्राक्ष बागेपासून मिळणार्या उत्पन्नात वाढ झाली. बागेतून एक लाख पन्नास हजार रुपयांचा नफा मिळाला. शेतकरी सहली आणि राष्ट्रीय बागवाने मंडळ यांच्या मदतीने मिळणारा नफा यामुळे आज रोजी त्यांच्याकडे १८ एकर द्राक्ष, पाच एकर मोसंबी, बारा एकर सीताफळ, पाच एकर आंबा एवढी फळबाग आहे. सामुहिक शेततळ्यामुळे त्यांचा पाणी प्रश्न सुटला आहे. शेतामध्ये असणार्या विहिरीतील पाणी एकाच ठिकाणी शेततळ्यात आणून ठिबकव्दारे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन यांची सोय अद्ययावत करुन घेतली. तसेच गांडूळ खताचा वापर द्राक्ष बागेसाठी केला. आधुनिक पध्दतीने फळबाग लागवड, एकत्रितपणे बाजार व्यवस्थापन इत्यादी तंत्रांचा वापर केल्याने आर्थिक प्रगती करणे शक्य झाले. श्री. चव्ह
यांना त्यांच्या यशस्वीतेचे रहस्य विचारले असता ते सांगू लागले, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून मला नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत गेली. ती मी
माझ्या पत्नीस
सांगत राहिलो. त्यामुळे तीसुध्दा माझ्याबरोबर शेतीच्या कामात रस घेऊ लागली. माझ्या मते शेतीमध्ये बारकावे असतात, ते पुरुषांपेक्षा महिलांना अधिक समजतात. त्यामुळे मी तिची आवड पाहून छोटे ट्रक्टर चालविणे शिकविले. फवारणी करणे, खत व्यवस्थापन करणे, द्राक्ष बागेतील मण्याची विरळणी करणे, बागेचे पाणी व्यवस्थापन करणे इत्यादी कामे ती आता स्वत: करीत आहे. माझ्या पत्नीची मला मोलाची साथ लाभत आहे. त्यामुळे मी बाहेरगावी माहिती घेण्यासाठी गेलो असता शेतीचे कोणतेही काम थांबत नाही. सर्व कामे वेळेवर पार पडतात. श्रीमती चंद्रकला चव्हाण म्हणाल्या की, शेतीतील सर्व कामांची तांत्रिक माहिती घेऊन त्याचा अवलंब केला तर निश्चितच आपल्या शेतीत बदल घडून येतो. त्यासाठी शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.
— बातमीदार
Leave a Reply