वैभव फळणीकर मेमोरियल फौंडेशन या संस्थेतर्फे आपलं घर या नावाने पुण्यातील वारजे येथे अनाथ विद्यार्थी गृह चालवले जाते. स्व. वैभव फळणीकर या गुणी व हुशार मुलाचे २००१ साली अचानक कॅन्सरने निधन झाले.या धक्क्यातून सावरून श्री. विजय फळणीकर यांनी हा ट्रस्ट स्थापन करून एक सामाजिक आदर्श निर्माण
केला आहे. यात त्यांना सौ. फळणीकर आणि इतर काही सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
यामध्ये आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुला मुलींना जात, पात, धर्म वगैरेचा भेदभाव न करता सामावून घेतले आहे. त्यांना शिक्षणाबरोबरच राहाणे, जेवण, कपडे, औषधोपचार वगैरे सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात. या संस्थेत मुलामुलींसाठी तांत्रिक शिक्षणाचीदेखील सोय केली आहे जेणेकरून ती पुढे स्वत:च्या पायावर उभी राहू शकतील. फाईल बनवणे, शिवण काम, पेपर बॅग बनवणे, संगणक प्रशिक्षण, मुद्रण प्रशिक्षण यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षण इथे दिले जाते. पुण्यातील आयटी क्षेत्रातील काही तरुण तरुणी येथे येऊन संगणक प्रशिक्षण देतात आणि संस्थेच्या कामात आपलेही योगदान देतात.
कालांतराने संस्थेची जागा कमी पडू लागल्यावर संस्थेने सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी डोणजे येथे जागा घेतली. तिथे निराधार ज्येष्ठ स्त्री पुरुषांसाठी तसेच अनाथ मुलामुलींसाठी सर्व सोयींनी युक्त अशी आपलं घरची शाखा काढली. यामागे आजी आजोबा आणि नातवंडांना एकमेकांच्या सानिध्यात राहाता यावे अशी कल्पना आहे. सर्व सोयिंनी युक्त अशा पाच कॉटेजेसची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर मुख्य इमारतीतही मोठ्या दालनात वृध्द व अनाथ मुलांची राहाण्याची सोय केली आहे. न्याहारी, भोजन वगैरे सर्व सुविधा त्यांना दिल्या जातात. मुलांना गोळेवाडी येथील प्राथमिक शाळेत पाठवले जाते.
संस्थेची स्वत:ची अॅम्ब्युलन्सही आहे. डोणजे येथे सुबक गणेश मंदिर बांधले आहे. तसेच तिथेहि उद्योग प्रशिक्षण केंद्र व बहुउद्देशीय हॉल बांधला आहे. संस्थेची अधिक माहिती www.apalaghar.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
— कालिदास वांजपे
Leave a Reply