आपल्या सूर्यमालेबद्दल भारतीय संस्कृतीत कुतूहल, आकर्षण, आदर, भीती अशा संमिश्र भावना प्राचीन काळापासून कायम आहेत. सूर्याची महती गाणारे सूर्योपनिषद्, सूर्य स्तोत्रे तर आहेतच पण आपल्या व्यायामात पण सूर्यनमस्काराचे महत्त्व आहे. चंद्राच्या कला बघून आपण रोजची तिथी, महत्त्वाचे सण निश्र्चित करतो. सूर्यमालिकेतील नवग्रहांची सातत्याने कृपा रहावी म्हणून आपण नवग्रह स्तोत्राचा पाठ नेमाने करतो, निरनिराळ्या खड्यांच्या अंगठ्या धारण करतो, उपवास धरतो. आपल्या काव्यात, संगीतात चंद्र, शुक्र ही लोकप्रिय स्फूर्तिस्थाने आहेत व “चांदोबा चांदोबा भागलास का” या बालगीतापासून “शुक्रतारा, मंद वारा—” या प्रेमगीतापर्यंत असंख्य रचना आपल्या मनास भिडल्या आहेत. ह्या वर्षी आपण “चंद्रयान-1” चंद्राभोवती सोडून” सार्या जगाला आश्र्चर्यचकित केले आहे व भविष्यात मंगळावर स्वारी करण्याचा विचार करीत आहोत. सर्व पार्श्र्वभूमीवर आपली सूर्यमाला कशी आहे?, त्यातील ग्रहांचे स्वरूप कसे आहे? त्यावर मानवाचे संशोधन कसे होत गेले? ह्या सर्व पैलूंवर शास्त्रोक्त माहिती आजच्या पिढीला व्हायला हवी व ही कामगिरी डॉ. मधुकर आपटे यांनी “आपली सूर्यमाला” हे पुस्तक उत्तम रीतीने लिहून कुशलतेने पार पाडली आहे.
नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात एकूण 18 प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात आपल्या सूर्यमालेबद्दल प्रस्तावना आहे आणि त्यानंतर आपला निर्माता व रक्षणकर्ता सूर्य याबद्दल माहिती दुसर्या प्रकरणात दिली आहे. त्यानंतरच्या 10 प्रकरणात बुध,शुक्र, पृथ्वी, चंद्र मंगळ, लघुग्रह, गुरू, शनी, युरेनस, नेपच्युन या ग्रहांचे विस्ताराने वर्णन केले आहे. या प्रत्येक प्रकरणाला दिलेला मथळा पण आकर्षक व अर्थपूर्ण आहे. निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक ग्रहाबद्दल जे संशोधन केले आहे, त्याचा आढावा घेऊन लेखकाने त्या ग्रहाचे वातावरण, जडण, घडण, भूगोल, भूगर्भ इत्यादी गुणधर्माबद्दल नवीन व मौल्यवान माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे. वाचकाला केवळ ग्रहांची माहिती देऊनच डॉ. आपटे थांबले नाहीत तर ग्रहण, उल्का आणि उल्कापात, सूर्यमालेचा सीमाप्रदेश, अनंताकडे झेपावणारे वाहन, धुमकेतू, आकाशगंगा सारख्या सूर्यमालेशी निगडीत असलेल्या विषयांवर आणखी सहा प्रकरणे लिहून खगोलशास्त्राबद्दल नवीन माहिती पुढे मांडली आहे.
या पुस्तकाचा विषय जरी शास्त्रीय असला तरी लेखकाच्या रसाळ शैलीमुळे सर्व निवेदन क्लिष्ट न वाटता मनोरंजक वाटते. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी संज्ञा फार कमी व आवश्यक जागीच वापरण्यात आल्या आहेत आणि मराठी शब्दांचा वापर जास्तीत जास्त केला गेला आहे. आजच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनात खगोलशास्त्र, अवकाशयानांमागील शास्त्र व तंत्र, रॉकेट तंत्र विद्या वगैरे विषयांबद्दल उत्कट जिज्ञासा आहे. त्यांच्या दृष्टीने डॉ. आपटे याचे हे पुस्तक फार उपयोगी व ज्ञानपुरक आहे. प्रत्येक पालकाने, शिक्षकाने व शालेय विद्यार्थ्याने जवळ बाळगावे, असे हे पुस्तक आहे. असे म्हणतांना एक सूचना कराविशी वाटते. आज-कालची पिढी संगणक दिवानी झाली आहे व इन्टरनेट वरील निरनिराळ्या संकेतस्थळांना भेट देऊन ते ज्ञानाची नवी, नवी दालने उघडत असतात. सूर्यमालेचे दुर्मिळ रंगीत फोटो व इतर उपयुक्त माहिती अशा अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. या संकेतस्थळांची यादी जर या पुस्तकाच्या शेवटी दिली गेली तर पुस्तकाची उपयोगिता आणखी वाढेल व पुस्तकातील लिखीत मजकुराला दृश्य चित्रांची मदत मिळून वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर पडेल.
आपली सूर्यमाला – डॉ. मधुकर आपटे
पाने : 96 ; किंमत : रू 90/-
नचिकेत प्रकाशन
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply