सध्या अचानक महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत. सगळीकडे सुबत्ता आली आहे. विजेचा प्रश्न मिटलेला आहे. महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त झाला आहे. शेतकर्यांना पाहिजे तितके पाणी उपलब्ध आहे. तीन तीन पिके वर्षभरात घेतली जातायत. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्यात , त्यांच्या घरात एसीपासुन मायक्रोवेवपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. कुपोषणाचा प्रश्न सुटलाय , सगळी लहान मुले एकजात निरोगी दिसतायत . सरकारी नोकरांचे पगार वाढलेत , महागाई कमी झालीये , सर्व वस्तु अत्यंत स्वस्त किमतींना उपलब्ध आहेत. सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार थांबलाय , सरकारी कार्यालयातली कामे कशी पटापटा आटोपतायत . सकाळी जा , एक तासात कुठलेही काम करुन परत या . जिकडेतिकडे मुबलक धान्य आहे , सगळीकडील झोपडपट्टया अचानक नाहीशा झाल्यायत , त्याजागी पक्की घरे आहेत , सर्वांना हाताला काम आहे, खायला धान्य आहे , आणि झोपायला निवारा आहे . खुन ,दरोडे , बलात्कार पुर्णपणे बंद झालेत , पोलिसमंडळींना काम उरले नाहिये .सगळीकडे एवढा आनंदीआनंद ,सुखसंपदा नांदत असताना संपुर्ण महाराष्ट्रापुढील एकच प्रश्न मात्र अजुनही सुटला नाहिये , तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री अमिताभसोबत साहित्य संमेलनात एकत्र जाणार का ?
आता सगळीकडे एवढा आनंदी आनंद असताना केवळ एकच प्रश्न न सुटलेला असणे यात मोठेसे ते काय ? पण हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही . आता महाराष्ट्रात हे सर्व प्रश्न असले असते तर त्या प्रश्नांपुढे हा प्रश्न खुपच क्षुल्लक वाटला असता . पण परिस्थिती तशी नाही . हे सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळे हल्ली “ मुख्यमंत्री आणि अमिताभ “ हा एकच प्रश्न आम्हाला मोठा दिसतो. जिकडेतिकडे चॅनलवर एकच चर्चा. वर्तमानपत्रात त्याच बातम्या. पण चॅनलवाल्यांचे काय चुकले ? सगळे प्रश्न सुटल्यामुळे वागळेसाहेब आणि खांडेकरसाहेब यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहीलाय. आपण चॅनलवर काय दाखवायचे ? शेवटी त्यांना हा प्रश्न मिळालाय आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.
आता वागळेसाहेबांचा प्रश्न जरी सुटला असला तरी सामान्य जनता ही विभागली गेली आहे. कुणाला वाटते , हो जायला पाहिजे .कुणाला वाटते नको जायला . चॅनलवर ओपिनियन पोल्स सुध्दा चालु झालेत. ज्यांना मुख्यमंत्र्यांनी जावे वाटते त्यांनी Y टाइप करुन पाठवावे .ज्यांना नाही जावे वाटत त्यांनी N टाईप करुन पाठवावे. ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जावे असे वाटते. तर उरलेल्यांना नाही जावे असे वाटते. पुन्हा चर्चा चालु. गेले तर काय होणार , नाही गेले तर काय होणार , यावर वेगवेगळ्या तज्ञांची खलबते चालु आहेत. ऊभा महाराष्ट्र आपापली कामे सोडुन चॅनलवर बघतोय. ( सगळीकडे सुबत्ता असल्यामुळे कामे सोडली तरी दुसरे काम लगेच मिळते ) अर्ध्या तासानी पुन्हा ओपिनियन पोल आला. मुख्यमंत्र्यांनी जावे की न जावे ? पुन्हा एसेमेस पाठवा . ( ते पण फ्री . कारण सुबत्ता ) .बघा बघा आता ओपिनियन पोल बदलला . आता ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जाउ नये असे वाटते. हा आमच्या चर्चेचा परिणाम . खरोखरच आहे , एवढी परिणामकारक चर्चा जनतेनी कधीही ऐकली नाहीये .
मुख्यमंत्र्याच्या जाण्याचा दिवस अखेर उजाडला. आमचे वार्ताहर मुख्यमंत्र्याच्या मागावरच आहेत. चढले चढले ते बघा मुख्यमंत्री विमानात चढले .आता विमान कुठल्या दिशेला जातेय याच्याकडे आपण लक्ष ठेवु या .पुण्याकडे जाणार की दिल्लीकडे ? पुण्याकडे गेले तर आपल्याला एक विषय मिळेल . मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार ? ते दिल्लीकडे गेले तरीही एक विषय मिळेल . हायकमांडचा दबाव की अजुन काय ? त्यामुळे एकाच विषयातुन आपल्याला अनेक विषय मिळतील . चर्चा होतील , तज्ञ मंडळी आपली मते मांडतील , आपण अजुन ओपिनियन पोल्स ठेवु.
गुलाबपाकळ्यांनी सजवलेल्या गालिचावरुन चालत असताना अचानक चुकुन राहिलेला काटा पायाला बोचावा ,त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला बोचणारा एकमेव प्रश्न समोर आणल्याबद्दल जनता आपणाला अत्यंत धन्यवाद देते आहे.
— निखिल मुदगलकर
Leave a Reply