सामना नावाचा अत्यंत ज्वालाग्रही पेपर आहे. त्याचे संपादक संजय राउत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि पेपरहुन अधिक ज्वालाग्रही लेखक. मध्यंतरी त्यांनी बिहारी आणि उत्तरप्रदेशी लोकांबद्दल अत्यंत ज्वालाग्रही लेख लिहिला. संसदीय समितिसमोर त्याची चौकशी झाली आणि नेमक्या त्या दिवशी ” संजय राउतांची संसदिय समितिसमोर माफी ” अशी ब्रेकिंग न्युज वाहिन्यांनी फ्लैश केली. त्यावर लगेचच संजय राउत समोर आले आणि त्यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते, ” मी मा्फी मागितली नाहि. फक्त खेद व्यक्त केला. शिवसैनिक किंवा आम्ही माफी मागित नसतो. माफी आणि खेद यातिल फरक समजावुन घेतला पाहिजे. “
आम्ही ही बातमी बघितली आणि विचारात पडलो. अरे खरोखरच की ! माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक आपल्यालाही माहित नाहि. तसे आम्ही स्वतःला मराठीच समजतो. आम्ही मराठी घरात जन्मलो. आमच्याआधी आमच्या किमान दहा पिढ्या मराठी. मराठवाड्यात बालपण आजुबाजुला इतर भाषांचा संबंध नाही . इथुनतिथुन सर्व मराठीच. त्यात आमचे दहावीपर्यंत पुर्ण शिक्शण मराठी शाळेत झाले. त्यानंतर मात्र बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातुन आणि वैद्यकिय शिक्शण ( मनसेचा जन्मच तोपर्यंत झाला नसल्याने ) नाइलाजाने इंग्रजी माध्यमातुन झाले. या गोष्टीमुळे ” आम्ही पक्के मराठी ” असा आम्हाला आत्मविश्वास होता , तो मात्र ढासळायला सुरुवात झाली, आणि आम्ही ” माफी मागणे आणि खेद वाटणे “ यातील फरक शोधायच्या मागे लागलो.
बराच विचार केल्यावर आम्हाला एक आयडीया सुचली. महाराष्टातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत , आपले प्रश्न ते बरोबर सोडवतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राजकारण्यांकडेच सापडेल असा आम्हाला लगेच विश्वास बसला आणि राजकारण्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरवले. मराठीचा विषय आल्याबरोबर राजसाहेबांचे नाव लगेच आठवले आणि त्याना भेटण्यासाठी आम्ही आमचे मनसेचे नगरसेवक गंपुशेटना भेटलो. त्यांनी जे सांगितले ते ऐकुन आमची पाचावर धारण बसली. त्यांच्यामते राजसाहेबांशी बोलताना मराठीचा वापर अनिवार्य आहे. कारण राजसाहेबांकडे चाबुक आहे , आणि आपण बोललेल्या वाक्यातील प्रत्येक अमराठी शब्दासोबत तो ते चालवतात. आता आम्ही मराठीवादी असलो तरी आमच्या बोलण्यात काही अमराठी शब्द येतात. उगीचच राजसाहेब आपल्याला विचारायाचे ” कसे आलात ? ” , आपण सांगायचो , ” रेल्वेने आलो . “ आणि “ रेल्वेने ” हा शब्द उच्चरताच सप्पकन चाबकाचा आवाज यायचा , या कल्पनेनीच आम्ही राजसाहेबांना भेटायचा विचार सोडुन दिला.
महाराष्ट्रातील दुसरे अत्यंत हुशार राजकारणी म्हणजे शरदरावजी. आपले क्रुषिमंत्री . राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याने आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादीत असल्याने मराठी भाषेशी संबंधित आपला प्रश्न ते सहज सोडवु शकतील असा आम्हाला विश्वास वाटला आणि लगेचच आम्ही त्यांची भेट घेतली , आणि आमची शंका विचारली.
“ शरदरावजी , खेद वाटणे आणि माफी मागणे यात नेमका फरक काय हो ? “ शरदरावजी लगेच उत्तरले , ” बाळा , डाळींचे भाव तुला माहित आहेत काय ? साखर काय भाव आहे ? भाज्या काय भाव आहेत ? ” आम्ही सांगितले , “ नाही. कारण किराणा बायकोच आणते. आम्ही फक्त पिशव्या उचलतो. पण हल्ली ती फारच कटकट करायला लागली आहे. महिन्याला पैसे पुरत नाही म्हणते. “ शरदराव म्हणाले, “ मी कारण सांगु ? कारण डाळ शंभर रुपये किलो झाली आहे. साखर चाळिस रुपये आणि भाजी दहा रुपये पाव . मिळते . “ मी विचारले , ” पण माझ्या प्रश्नाचा आणि या उत्तराचा काय संबंध ? मला माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक हवा आहे. “ शरदराव उत्तरले , “ सांगतो. संबंध सांगतो. एवढी महागाई वाढली असताना , घरी पैसे पुरत नसताना , प्रत्येकाला दिवसा नोकरी झाल्यावर रात्री पार्टटाइम नोकरी करणे घर चालवण्यासाठी आवश्यक आहे. ती नोकरी शोधायचे सोडुन तुम्ही अशा फालतु प्रश्नात आपला वेळ फुकट का घालवता , हेच मला कळत नाही. आज प्रत्येक भारतीयाची ही गरज आहे . ”
आमचे डोळे खाडकन उघडले. असल्या फालतु प्रश्नाच्या नादी लागायला आमच्यासारख्या सामान्य माणसांना वेळ नाही. संसारपण चालला पाहिजे. पार्टटाइम नोकरी शोधायच्या आम्ही मागे लागलो. एक गोष्ट मात्र पटली , की महाराष्ट्रातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत. आपले प्रश्न ते बरोबर सोडवितात.
–निखील मुदगलकर
Leave a Reply