जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी
तुजविना करमेना मज होई लाही
जयदेवी जयदेवी ……… !!
तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो
किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो
डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या
तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या
जयदेवी जयदेवी….. ।।१।।
अर्धांगी गायी ते अंगाई गीत
होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत
अखेरी वाचीत बसतो कविता
तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता
जयदेव जयदेवी…. ।।२।।
व्हिस्कीचे रिचवुनी पोटात पेले
बेरके कवडे काहीही बोले
परंतु तुजला दयेचा लेश
तुजला लाजला शिव महेश
जयदेवी जयदेवी …….।।३।।
आता मात्र बाबा कमाल झाली
निद्रेवाचून होई जीवाची लाही
घेऊन हातात कवितेचे बाड
माझेच बसलो करीत लाड
जयदेवी जयदेवी ….. ।।४।।
लागली लागली तुझी चाहूल
तुझ्याविना माझा जीव व्याकूळ
वाचीत वाचीत झोपून गेलो
दिव्याची आठवण विसरून गेलो
जयदेवी जयदेवी ….. ।।५।।
— द्वारकानाथ शं. वैद्य (जयंता)
Leave a Reply