६ सप्टेंबर १८८० हा इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटच्या आरंभाचा दिवस ठरला. डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांच्याकडून या दिवशीच शतक निघावे हा अनोखा योगायोग होता. केनिंग्टन ओवलवरील या कसोटीपूर्वी क्रिकेट जगतात केवळ तीनच कसोट्या खेळल्या गेल्या होत्या. इंग्लंडच्या डावाची सुरवात ‘डॉक’ ग्रेस आणि एडवर्ड ग्रेस यांनी केली. डॉक्टरांनी १५२ धावा काढल्या. दुसर्या दिवशी इंग्लंडचा डाव ४२० धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १४९ धावांवर संपला. इंग्लंडमधील पहिल्याच कसोटीत पाहुण्यांना फॉलोऑन मिळाला. दुसर्या डावात डॉक्टरांनी दोन गडी बाद केले. ५७ धावांच्या लक्ष्यासमोर इंग्लंडने सलामीची जोडी बदलली. आल्फ्रेड लिटलटन आणि फ्रेड ग्रेस (इंग्लंडच्या संघात तीन ग्रेस होते!) सलामीला आले. ५७ धावा गाठताना इंग्लंडला पाच गडी गमवावे लागले. डॉ. ग्रेस ९ धावांवर नाबाद राहिले.
शहाण्या पोराने बापाच्या धंद्यात उतरू नये असे कुणीतरी (म्हणजे प्रस्तुत लेखकानेच) म्हटले आहे. लेन हटन या विख्यात इंग्लिश क्रिकेटपटूच्या एका मुलाचा जन्म ६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. रिचर्ड हटन इंग्लंडकडून कसोट्य़ा खेळला पण आवर्जून नोंद घ्यावी असे काहीही त्याच्या हातून (किंवा ‘बॅटून’) झाले नाही. द क्रिकेटर नावाच्या नियतकालिकाचे संपादन त्याने काही काळ केले. रिचर्ड हटनच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवशी लेन हटन परलोकवासी झाले ही मात्र नक्कीच नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. (वाढीचा ठरलेला असा दिवस नसतो पण अर्थ समजावा म्हणून नाईलाजाने असे शब्द वापरावेच लागतात. असो ! ‘तोडी हा शब्दच्छल । निरसी रे वर्णजाल । नको तो तर्कशूळ । आंदू म्हणे’ )
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply