नवीन लेखन...

ईशान

 
HIV Rehabilitation centre ला जायचा माझा तो पहिलाच दिवस होता. एड्‍स हा स्पर्षानी होत नाही, डास चावण्यानी होत नाही हे सर्व माहिती असून मनाची तयारी व्हायला बरेच दिवस लागले. एका मित्राकडून माहिती मिळाली होती की इथे फ़क्त लहान मुलंच ठेवतात.

या मुलांची आई/वडिल वा दोघेही एड्‌स्‌नी दगावलेले होते व या मुलांनासुद्धा त्याची लागण झालेली होती. माझ कस स्वागत होईल ? या ठिकाणी. मला मुलांशी बोलण जमेल का ?सर्वच प्रश्न होते. जे मुल काही दिवसात मरणार आहे, त्या मुलाशी कस वागायच ? त्या मुलाची मनःस्थिति काय असेल ? काहीच कल्पना नव्हती. माझा अंदाज होता मुलं बेडवर पडुन असतील.

आधी संचालिकांशी मित्रानी ओळख करुन दिली, मी विचारल की “मुलांना ती एड्‌स्‌ची पेशंट आहेत हे माहीती आहे का ?” त्या म्हणाल्या “काहींना माहिती आहे काहिंना नाही”

आम्ही मुल होती त्या हॉलमधे गेलो. ३ वर्षापासून १४ वर्षापर्यंतची मुल इथे होती. एकमेकांशी खेळणारी व थट्टा मस्करी करणारी ती मुल पाहिल्यावर ही मुल HIV झालेली असतील अस वाटतच नव्हत. माझा मित्र इथे वरचेवर येत होता त्याची ओळाख होती. मुल लगेच त्याच्या भोवती “अंकल अंकल” करत गोळा झाली. माझी ओळख करुन दिल्या गेली व मी गोष्ट सांगणार आहे अस मित्रानी परस्पर डिक्लेअर केल. मुलं गोष्ट म्हणल्यावर माझ्या भोवती गोळा झाली.

कोणत्याही परिस्थितीत असलेली मुलं गोष्ट म्हणल्यावर कशी उत्तेजित होतात ते मी तीथे बघितल. मग बिरबल-बादशहा, पंचतंत्र वगैरे मधल्या गोष्टी सांगितल्या.हळू हळू मुलांच्या ओळखी करुन घेतल्या. ईशान ७-८ वर्षांचा, मोठा गोड मुलगा पण सर्वांना फ़ार चिडवायचा. त्याचे डोळे अचानक चमकायला लागले. ओठाच्या कोपर्‍यातुन थोड हसु यायला लागल. आणि त्यानी

मला विचारल

“काका तुम्हाला भुताच्या गोष्टी येतात का ?”

बाकी मुल खु खु करुन हसायला लागली. मला समजेच ना हासायला काय झाल. माझा मित्र म्हणाला “ईशान चुप.” ईशानचा व इतर मुलांचा चेहरा पडला.

भुताची गोष्ट सांगुन मला या मुलांना घाबरवायच नव्हतं. व नाराजपण करायच नव्हतं. मी मित्राला म्हणालो

“अरे असु दे” आणि ईशानला म्हणालो ” पण ईशान मला येत नाही रे भुताची गोष्ट. तुच सांग बर तुला येत असेल तर”

परत त्याचा चेहरा उजळला. तेच मिश्किल हसु परत ओठावर आल.

“काका, तुम्ही भुत पाहिलय ?”

आता तर बाकी मुलं जास्तच हासायला लागली. ईशाननी त्यांना गप्प केल.

“नाही रे मी नाही पाहिल भुत” “काका तुम्हाला भुत पाहायचय का ?” “मी म्हणालो हो पाहिन की” “पण तुम्ही खुप घाबराल. ते भुत खुप डेंजर दिसतय” “नाही घाबरणार दाखव”

आता तर सर्व मुल खुपच हासायला लागली. माझी उत्सुकता खुपच वाढली होती. काय बर दाखवतायत ही मुलं. काही तरी माझी फ़िरकी घेणार हे नक्कीच होत.

ईशान रेखाकडे बघुन म्हणाला. “रेखा जरा लवकर वर जा आणि भुताला तयार कर.”

रेखा जरा मोठी मुलगी, ती लगेच वरच्या मजल्यावर गेली. आणि थोड्याच वेळात ईशान मला घेऊन निघाला. सर्व मुलांचा लोंढा आमच्या मागे.

वरच्या मजल्यावर एका पडद्या समोर मला उभ केल आणि ईशान म्हणाला

“काका पडदा बाजुला करा. डेंजर भुत दिसेल तुम्हाला.”

मला थोडा अंदाज आलाच होता. त्यामुळे पडद्याला हात लावताना मला खुप भिती वाटते अस मी नाटक करत होतो. मुलांकडे बघुन घाबरलेला चेहरा करत होतो आणि मुल खदखदून हासत होती. थोड्या वेळानी मी पडदा बाजूला केला. पलिकडे एक मोठा आरसा होता व त्यात माझ प्रतिबिंब दिसत होत. माझा मस्त पोपट केला होता त्या छोट्यांनी.

एकमेकांना आनंदानी टाळ्या देत व मिठ्यामारत त्यांनी त्यांचा आनंद साजरा केला. माझी फ़िरकी घेतली म्हणुन मी खोट खोट रडुन दाखवल. आणि मोठा माणुस आपल्या चिडवण्यानी रडु शकतो म्हणुन मुलं पोट धरुन हासत होती. एका प्रसंगानी माझी व त्यांची गट्टी जमली.

मग तीथेच बसुन आम्ही खुप गप्पा मारल्य़ा. शशांक छान गाणी म्हणायचा. रवी तबला वाजवायचा. कोणत्यातरी संगीताच्या क्लासमधे ते शिकत होते. शशांकचा आवाज इतका मधुर होता व रवीची बोटं तबल्यावर इतकी सफ़ाईनी फ़िरत होती की मी तर थक्कच झालॊ. ईशान तर लहान असुन सर्व मुलांना सहज कंट्रोल करु शकत होता.

हा चालू पोरगा तर मोठा नेताच होणार याबद्दल माझी मनोमन खात्रीच पटली.

आम्ही एकमेकांशी बोलताना इतके रंगुन गेलो, मुल माझ्या मांडीवर बसली होती. काही माझ्या खांद्यावर भार देऊन माझ्याशी बोलत होती. फ़ार गोड वातावरण होतं. संगीताची मैफ़िल झाल्यावर, ईशाननी मला एक एक मुलाची ओळख करुन देत त्यांची खासियत सांगायला सुरुवात केली. मग पिंकी छान नाच करते, मोहन कोणत्याही पक्षाचा आवाज काढतो वगैरे सर्व व ती मुलं मला त्यांच वैशिष्ठ दाखवत होते. परत शशांकनी एक गाणं म्हणल.

मी सहजच त्या मुलांना विचारल की तुम्हाला कोण व्हायचय ? कोणी “वैमानीक, कोणी डॉक्टर” “कोणी नर्स”, कोणी काही कोणी काही उत्तर दिली. मी ईशान, रवी व शशांकला विचारल या तीघांनी मला काहीच उत्तर दिल नाही.

मी परत जायला निघालो. ही तीन मुल एकमेकांमधे काही तरी बोलत होती.

मी गेटपाशी आलो. मुलांचा हात हालवून निरोप घेत होतो आणि ईशाननी “काका एक मिनीट” म्हणुन मला थांबवल. ते तीघेही जवळ आले. मी खाली वाकलो. त्या तीघांनीही माझ्या गालाची पापी घेतली व निरोप दिला.

परत ईशान म्हणाला “काका एक मिनट,”

त्यानी मला बाजूला नेल व मला म्हणाला

“काका तुम्हि विचारलत की मोठेपणी तुम्ही कोण होणार ? तेव्हा आम्ही उत्तर दिल नाही.

कारण काका आम्हाला माहीती आहे की आम्ही कधीच मोठे होणार नाही.

मोठ होण्याआधीच आम्ही आमच्या आई-बाबांसारखे एड्‌स्‌नी मरुन जाणार आहोत.”

मी त्या तिघांना जवळ घेतल. त्या तिघांच्या गालाची पापी घेत मी म्हणालो

“नाही रे अस मुळीच नाही. आता बघ या रोगावर लवकरच औषध येणार आहे. आणि तुम्ही लवकरच बरे होणार आहात. मला तुम्हाला मोठ झालेलच बघायच आहे”

माझ्या बोलण्यातला फ़ोलपणा मला स्वतःला जाणवत होता.

मागे न बघता मी भराभर पायर्‍या उतरुन रस्त्यावर आलो आणि गाडित बसलो.

माझे खरे खुरे अश्रु मला त्या मुलांना दाखवायचे नव्हते

मी वरचे वर HIV Rehabilitation centre ला जात होतो. मी सर्वच मुलांशी बोलत होतो पण खर तर मला ईशान, शशांक व रवी जास्त आवडत होते. हल्ली ही तीनही मुलं वरचेवर आजारी पडत होती. कधी थंडी वाजून ताप यायचा, कधी काही, कधी काही चालू असायच. पण तोंडावरचा आनंद मात्र तसाच होता.

त्यांची तब्बेत बरी असली की मग माझ्याशी खुप गप्पा मारायचे. गाण्यांचा कार्यक्रम व्हायचा. माझा वेळ फ़ार मजेत जायचा. कधी मी त्यांना बाहेर बागेत घेऊन जायचो.

हळू हळू मुलं कोमेजत चालली होती. पारिजातकाच्या फ़ुलांच आयुष्य काही तासांचच असत, पण ते आपला सुवास दूरवर पसरवतं. कॊणालाही मोहवेल असाच तो वास असतो. जेव्हा ते फ़ुल टवटवीत असत तेव्हा पाहाणार्‍याला मोह पाडेल असच त्याच रुप असत. ही फ़ुलं हातात घ्या एक खोल श्वास घ्या मनावर असलेल टेंशन, कितीही दुःख, सर्व दूर होत. मन आनंदानी भरुन जात. ह्या गोड बाळांच्या सहवासात माझ असच व्हायच. ईशानच हासणं, माझ्या गळ्यात हात टाकुन बोलणं, माझ मन आनंदी करायच आणि रवी व शशांकच संगीत त्या शांत मनावर एक फ़ुंकर मारायच.

रवी व शशांक कोणत तरी गाण गुणगुणत असायचे व ईशान त्याचं हास्य ओठावर ठेउन फ़िरत असायचा. पण तरी त्यात हल्ली एक गंभीरपणा जाणवायचाच. मुलं हल्ली जरा जास्तच गंभीर होत होती. त्यांच्या मित्रांमधल कोणी जास्त आजारी असलं की रडवेली व्हायची. काय त्यांच्या मनात येत होत काय माहिती ? थोड डोक दुखल तर लगेच कपाळाला बाम लावून, गोळी घेऊन दोन तास झोपणारा मी, मला कस समजणार त्यांच दुःख ?

त्यांच्या मित्राच्या, सुनिलच्या निधनानी तर ही मुलं जास्तच गंभीर झाली होती. त्या दिवशी माझ्याजवळ आली, काही न बोलता नुसतीच उभी होती. मी त्यांना जवळ घेतल. मुसमुसत रडत होती. काय त्यांच मी सांत्वन करणार होतो ? माझ्याकडे शब्दच नव्हते. ईशान म्हणाला “काका सुनिल सारखा सारखा ’ माझ्या नातलगांना बोलवा ’ म्हणत होता. आमच्या जवळ खुप रडायचा. म्हणायचा की ’ नातलगांना म्हणाव की जवळ येऊ नका लांबूनच माझ्याशी बोला. पण एकदा तरी भेटायला या ’ पण काका त्याला भेटायला कोणीच आल नाही ” हे सांगताना प्रथमच त्याचा आवाज रडवेला व केविलवाणा झाला होता. तो पुढे म्हणाला “काका मला पण वाटत की …….” पुढे तो बोलुच शकला नाही. मी पण विचारल नाही पुढे. आणि परत हा विषय काढला तर तो यावर कधीच बोलला नाही.

एकदा मुलांना बागेत घेऊन गेलो होतो. इतर मुलांमधे ही मुलं खर तर सहज मिसळुन जायची. कोणाही अनोळखी मुलांशी ओळख काढुन त्यांच्याशी खेळायची या मुलांना सवय होती. आज सुद्धा अशीच ही मुल बागेत एका बाजुला क्रिकेट खेळात होती. पण त्यांच खेळात लक्ष नाही हे जाणवत होत. एका कोपर्‍यात एक जोडप बसल होतं आणि ते आपल्या मुलांचे लाड करत होते. हे तिघेही ते लाड बघत उघे होते. मी जवळ गेलो त्यांना जवळ घेतलं. काहीही न बोलता मुलं परत खेळायला लागली. मधेच खेळ सोडुन हे तिघेही एकमेकांशी बोलत उभे होते. मी जवळ गेलो तरी त्यांच लक्ष नव्हत.मी मुलांशी बोलताना गुढघ्यावर बसुन त्यांच्या उंचीच होऊन बोलतो त्यामुळे माझ्या उंचीच, मोठेपणाच, त्यांच्यावर प्रेशर येत नाही व मुलं मोकळेपणी बोलतात असा माझा अनुभव आहे. मी तसाच गुढघे टेकुन त्यांचात मिसळलो. आणि काय बोलतायत ऎकत होतो. एका गाण्यावर ते बोलत होते.

मी शशांकला म्हणालो “काय रे तुम्ही फ़क्त संगीतावरच बोलता की दूसर काही बोलता ?” शशांक म्हणाला “मला आणि रवीला संगीतच आवडत. अस वाटत की कानात सतत एक संगीत ऎकु येतय. या संगीतातच बुडुन जावस वाटत. काका देव आम्हाला न्यायला येईल तेव्हा अस संगीत वाजवतच येईल का ? तस असेल तर मग काहीच हारकत नाही. त्याच्या बरोबर आनंदात जाईन ” ईशान म्हणाला “काका, मला मात्र सतत हासत राहाव अस वाटत. मला आतुन हसु येत. मी खोट हासतच नाही. देव जर हासत हासत आला न काका तर मी पण हासतच त्याच्या गळ्यात मिठी मारीन.”

मला हे तीनही देवदुत फ़ार मोठे वाटले, त्यांची उंची आकाशा इतकी वाटली. त्या देवदुतांपुढे मी गुढघे टेकुन बसलो होतो. एक फ़ार फ़ार खुजा माणुस.

— निरंजन प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..