काल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. पण लक्षात ठेवा हे भांडं करताना कुठेही गोंद वापरायचा नाही. कागदाच्या घड्या घट्ट घालायच्या आणि गोंदाऐवजी दोन पेपरक्लीप वापरायच्या.ठ असं म्हणताच मुले म्हणाली, ‘नक्की!’
पण तरीही हात उंचावत रोहन म्हणाला, “पण गोंद वापरला तर काय होईल?” या प्रश्नावर वर्गात शांतता पसरली.
“तर मग.. एखादवेळेस कागद पेट घेईल…!” माझं वाक्य पुरं होण्याआधीच भीती व आनंदाच्या मिश्र आवाजात ओरडली,’काय आग? आऽऽईऽऽ!ठ
‘होय. तशीच एक जादू आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे. थोडसं पाणी गरम करायचं आहे. म्हणूनच हवंय कागदाचं छोटं भांडंठ असं म्हणताच, मुलांची भलतीच उत्सुकता चाळवली. दुपार पर्यंत ही बातमी सगळ्या शाळेत पसरली. “काऽऽय? कागदाच्या भांड्यात पाणी गरम? हॅ! अरे कागद पेटवून पाणी गरम करणार असतील. तुमची ऐकण्यात काहीतरी चूक झालीय बरं.” हा सगळ्यांचाच चर्चेचा विषय झाला. संध्याकाळी शाळेतल्या निम्म्याहून अधिक मुलांनी कागदाची छोटी भांडी तयार केली. मुख्याध्यापक म्हणाले, “आता ही जादू सगळ्या मुलांसाठीच करुया.”
दुसऱ्या दिवशी सगळ्या मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मुले शाळेच्या व्हरांड्यात जमली. मी उभा राहात म्हणालो, आज मी काही प्रयोग बियोग करणार नाही. कागदाच्या भांड्यात पाणी बिणी पण गरम करणार नाही. सॉरी! काही मुले नाराज झाली. काहींनी सुस्कारा सोडला. काहींनी भुवया उंचावल्या. आमच्या वर्गातली मुले जाम खट्टू झाली. तरीपण हात ऊंचावत पालवीने विचारलं, “मग हा प्रयोग कोण करणार?”
मी चेहरा शक्य तेव्हढा गंभीर करत म्हणालो, “तुम्ही सर्व मुले.” मुले आनंदाने किंचाळली,“याऽऽहूऽऽठ
चार-चार मुलांचा एक गट केला. प्रत्येकाकडे काल त्यांनी तयार केलेलं जाड कागदाचं एक चौकोनी भांडं होतं. प्रत्येक गटाला एक काडेपेटी दिली. गटाने मिळून प्रयोग करायचा असल्याने नीट पध्दत ठरवली.
— आधी प्रयोग नीट पाहायचा.
— प्रयोग पूर्ण झाल्यावर सर्वांनी आपापल्या वहीत निरीक्षणं नोंदवायची.
— निरीक्षणांचे जाहीर वाचन करुन, आपल्याला महत्वाचे वाटणारे मुद्दे लिहून घ्यायचे.
— पाहिलेल्या प्रयोगा संबंधी वेगवेगळे प्रश्न विचारायचे.
— प्रयोगाला पूरक आणि समांतर प्रश्न विचारायचे.
एक मेणबत्ती पेटवून टेबलावर उभी केली. कागदाच्या भांड्यात पाणी भरलं. भांडं ज्योतीवर धरलं. ज्योत फक्त तळालाच लागेल याची काळजी घेतली. आणि थोड्याच वेळात पाणी चक्कं उकळायला लागलं. मुलांनी तर आनंदाने आरडाओरडाच केला. या क्षणी तर मुलांच्या डोळ्यातला प्रश्न वाचता येत होता,’कागद न जळता पाणी कसे काय उकळले?’ याचं उत्तर ही अगदी सोपं आहे. कागद जळत नाही कारण कागदाला जेव्हढी उष्णता मिळते, तेव्हढी पाणी गरम करण्यासाठीच खर्च होते. पाणी १०० डि. तापमानाला उकळतं हे तर आपल्याला माहितच आहे. पण कागद जळण्यासाठी/पेटण्यासाठी याहीपेक्षा खूप जास्त तापमान लागतं. म्हणूनच कागदाच्या भांड्यातलं पाणी उकळतं पण कागद जळत नाही.
मुलांनी धमाल प्रश्न विचारले. आपल्याला चहा करता येईल का? दूध तापविता येईल का? कागदाचे मोठे भांडे घेतले तर भजी तळता येतील का? गटात प्रयोग करताना तर मुलांना पाण्याच्या आधीच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मुलांनी या प्रयोगाचे नाव ‘उकळता प्रयोग’ असं ठेवलं.
मला वाटतं, मुलांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील जर तुम्ही स्वत:च उकळ्या प्रयोग केलात तर! आणि तो ही मुलांसोबत केलात तरच!!…
मी तुमच्या उकळत्या पत्रांची वाट पाहतोय.
– राजीव तांबे.
Leave a Reply