गणेशोत्सव जल्लोषात सुरू असताना त्यातून उभे राहणारे मोठे अर्थकारण स्पष्टपणे जाणवत आहे. लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेला हा उत्सव राजकारणात जाणार्यांसाठी महामार्ग ठरतो आहे. त्यात अर्थकारण आल्याबद्दल आक्षेप नाही. परंतु, गणेशोत्सवाचे ‘मार्केटिंग’ होत असताना ‘सेल्स’लाच प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सवावर जाणवत असलेला अर्थकारणाचा हा प्रभाव नेमके काय सांगतो ?
महाराष्ट्रीय माणसाच्या मनात गणपती आणि गणेशोत्सवाला महत्त्वाचे स्थान आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठे प्रस्थ निर्माण झाले असले तरी राज्यात घरोघरी गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज हा पारंपरिक उत्सव किवा सण राहिला नसून एक सार्वत्रिक इव्हेंट बनला आहे. कोणत्याही संकल्पनेच्या सार्वत्रिकीकरणामुळे लोक एकत्र येतात आणि लोक आल्यानंतर त्यात अर्थकारणाचा शिरकाव होतो. पूर्वी गणेशोत्सव हा वैयक्तिक किंवा कौटुंबिक उत्सव होता. तो सार्वजनिक नसला तरी आपले सण आणि परंपरा टिकल्या. एवढेच नव्हे तर, गेल्या ७०० वर्षांमध्ये शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिदवी स्वराज्य आणि त्यानंतर पेशव्यांचा काही काळ सोडला तर आपल्यावर इतरांचीच सत्ता होती. परकीय सत्ता असतानाही आपल्या परंपरा आणि सण विसरले गेले नाहीत. त्यावेळी घराघरात सण साजरे केले जात.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. समाजाला ब्रिटिशांविरुद्ध एकत्र आणणे हा त्या मागचा मूळ हेतू होता. त्यावेळी गणेशोत्सवात अर्थकारण नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही काळाने या हेतूला हरताळ फासला जाऊन त्यात अर्थकारणाचा शिरकाव झाला. हळूहळू माणसांचे रूपांतर ग्राहकांमध्ये झाले आणि सणाचे इव्हेंटमध्ये. सण इव्हेंट बनल्यानंतर विविध माध्यमे त्याकडे आकर्षित झाली. इव्हेंट साजरा करण्यासाठी प्रायोजकांची गरज भासू लागली. प्रायोजकही प्रायोजकत्व देताना गोष्टी विकत घेऊ लागले. आज गणेशोत्सव मंडळे भव्य देखावे उभारताना किवा विविधलागुणदर्शनाच्या स्पर्धा आयोजित करताना प्रायोजकांचे सहकार्य घेतात. यात
केवळ सहकार्याची भूमिका नसून अर्थकारणही असते.
त्यामुळे आजच्या गणेशोत्सवामध्ये धर्म, श्रद्धा, उत्सव किवा सण यापैकी काहीही उरले नसल्याची माझी ठाम भावना आहे. तो इव्हेंट बनला, त्यात अर्थकारण आले तरी यावर माझा आक्षेप नाही. परंतु, गणेशोत्सवातून राजकीय नेतृत्व निर्माण झाले. उत्सवप्रियतेत धन्यता मानणारा सर्वसामान्यांचा एक गट आणि स्वत:चे नेतृत्व उभे करण्यासाठी त्यांच्या श्रद्धेचा फायदा उठवणारा राजकारण्यांचा गट असे या उत्सवाचे दोन आधारस्तंभ बनले. त्यामुळे पाहता पाहता गणेशोत्सवासारखे उत्सव राजकारणात येण्यासाठी राजमार्ग बनले. समाजोपयोगी कामे करायची सोडून मंडळांद्वारे राजकीय शक्ती वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले. कालांतराने अशी मंडळे न चालवणारी व्यक्ती नेता असूच शकत नाही, अशीच समजूत रुढ झाली. परिणामी, असे उत्सव सामाजिक ‘मॉर्फिन’ बनले आहेत. सामाजिक ‘मॉर्फिन’ बनले आहेत. अशा सणांमुळे समाजावर एक प्रकारची झिग चढते. झिग चढल्यामुळे समाजाचे खरेखुरे प्रश्न समोर येऊच दिले जात नाहीत. यात राजकारण्यांचे
भले असते. त्यामुळे हे केवळ मार्केटिंग आहे. लहान मुलांना खेळणी देणार्या सांताक्लॉजचे प्रस्थही मार्केटिंग कंपन्यांनीच वाढवले. या गोष्टींचा आपल्या धर्माशी आणि श्रद्धेशी काय संबंध आहे, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. गणेशोत्सव इव्हेंट बनून राजकारण्यांचे लाँचिग पॅड होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत.
गणरायाचे असेही मार्केटिंग |
कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने गर्दी जमा झाली की प्रसिद्धी मिळते. प्रसिध्दी मिळाली की तिथे वेगवेगळी माध्यमे जमा होतात माध्यमांमुळे प्रायोजक आकृष्ट होतात आणि एकदा प्रायोजक आले की उत्सवावर ‘मार्केटिंग फोर्सेस’चे नियंत्रण प्रस्थापित होते. पूर्वी प्रत्येक घरासमोर शेवग्याच्या शेंगांचे झाड असे. शेवग्याच्या शेंगामध्ये ‘क’ जीवनसत्वाचे प्रमाण विपुल असते. पूर्वीच्या लोकांची जीवनशैली आजच्यासारखी नव्हती. त्यांना कष्टाची कामे करावी लागत. त्यामुळे त्यांच्या शरीराला क जीवनसत्वाची अधिक गरज भासे. क जीवनसत्व सहज आणि मुबलक प्रमाणावर उपलब्ध व्हावे म्हणून शेवग्याचे झाड दारासम
र असे. त्यावेळी त्यांचा बाजार झाला नाही. त्याचे बाजारीकरण होऊ नये म्हणूनच कदाचित ‘शेवग्याची शेती करू नये’ अशी आ’यायिका निर्माण झाली असावी. बाजारीकरण न झाल्यामुळेच शेवग्याच्या शेंगा सर्वत्र आणि मुबलक प्रमाणावर उपलब्ध होत्या. आज सगळीकडेच बाजारीकरण झाले आहे. बाजार म्हटले की नफेखोरी आली आणि स्पर्धाही आली. गणेशोत्सवातही या स्पर्धेने चांगलेच मूळ धरले आहे. माझ्या गणपतीची आरास चांगली की तुझ्या, माझ्याकडे अधिक चांगले कार्यक’म की तुझ्याकडे तसेच माझ्याकडे अधिक प्रायोजक की तुझ्याकडे अशी ही स्पर्धा प्रत्येक ठिकाणी वाढत गेली. असे असूनही लोक मंडळांच्या गणपतीपुढे नतमस्तक होतात यालाही कारण आहे. आजच्या काळात प्रत्येकाच्या मनात असुरक्षितता आहे. मनात असलेल्या भीतीने ग्रासलेला माणूस देवाचा आधार घेतो. नमस्कार केल्याने गणपती आपली मदत करणार
नाही, हे त्यालाही माहित असते. परंतु देवासमोर डोळे बंद करून हात
जोडल्याने शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते आणि लढण्याची जिद्द मिळते.
विश्वसाहित्य संमेलनाच्या वेळी ग्रंथदिंडी काढण्यासाठी आयोजकांनी अमेरिकेतील बे एरियातील स्थानिक प्रशासनाकडे परवानगी मागितली. त्यावेळी दिडीत किती लोक सामील होणार आहेत, असा प्रश्न विचारला गेला. साधारणत: 300 लोक एकाच वेळी पदपथावरून चालणार असल्याचे समजल्यावर सकाळी कामाला जाणाऱ्या लोकांना त्याची सवय नाही आणि त्यामुळे गोंधळ होईल, असे कारण देऊन प्रशासनाने परवानगी नाकारली. हे खरे प्रशासन. गणपती विसर्जनासाठी अर्ज करताना तेथील मंडळांना मुर्तीमध्ये धोकादायक रसायने नसल्याचा दाखला सादर करावा लागतो आपल्याकडे पर्यावरणाचा ऱ्हास हा विषय महत्वाचा का मानला जात नाही, हे कळत नाही. सध्याचा गणेशोत्सव हिडीस राजकारणाचा बाजारी प्रयोग असल्याचे मला वाटते. याला राजकीय नेत्यांप्रमाणेच सर्वसामान्य लोकही जबाबदार आहेत. हे सर्व थांबवून गणेशोत्सवाचे खरे मार्केटिंग व्हायला हवे.
(अद्वैत फीचर्स)
— उदय निरगुडकर
Leave a Reply