काही लोक अतिशय उत्साही असतात. उत्साहाच्या भरात ते वेगवेगळ्या वल्गना करतात. मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, त्यांचा उत्साह मावळू लागतो.
नीलेश आणि ज्ञानेश हे दोघे मित्र खूपच उत्साही होते. प्रत्येक गोष्टीत ते इतके उत्साहाने बोलत की, ऐकणार्यांवर त्यांचा खूपच प्रभाव पडत असे. उत्साहाच्या बाबतीत दोघेही एकमेकाला हार जात नव्हते.दिवाळीचे दिवस जवळ आले होते. दिवाळीचे आणि फटाक्यांचे व फराळाचे जसे अतूट नाते आहे तसेच किल्ले तयार करण्याचेही आहे. अनेक मुले आपापल्या इमारतीत किले तयार करण्यात मग्न होती.
नीलेश आणि ज्ञानेश यांनाही किल्ला तयार करण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या शेजारच्या इमारतीत तयार होत असलेला किल्ला पाहिला आणि त्यांनी उत्साहाच्या भरात आपल्याही इमारतीत तसाच किल्ला तयार करण्याचे ठरविले. दोघेही उत्साहाने त्या किल्याबाबत बोलू लागले.
आपण किल्ला असा करू तसा करू यावर दोघांची बरीच चर्चा झाली. शेवटी किल्यासाठी माती आणायचे दोघांनी ठरविले. दोन-चार टोपली माती त्यांनी आणलीही. त्यात पाणी घालून चिखलही केला. मात्र प्रत्यक्षात किल्ला करताना त्यांचा उत्साह मावळला. सुरुवात झाली. किल्ला करून आपण आपले श्रम नि वेळ वाया घालवित आहोत, असे त्यांना वाटू लागले.
अर्थातच त्यांनी आपली कल्पना सोडून दिली. तो चिखल किल्ल्याची वाट पाहून केव्हाच वाळूनही गेला. किल्ला मात्र अस्तित्वात आलाच नाही. उत्साह आणि कृती यामध्ये किती अंतर असते याचे प्रत्यंतर त्यांना आले होते.
Leave a Reply