अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल किंवा अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे व्रत मागून घेतलेले असेल तरच त्या त्या लोकांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते.
अनंताची पूजा होईपर्यंत गणपती विसर्जन करत नाहीत. माणूस जेव्हा त्याचे एखादे इप्सित साध्य करतो तेव्हा त्याच्या मनात त्याच्या कर्तृत्वाबद्दल अहंकाराची भावना उत्पन्न होते. असा अहंकार मनी भरलेला माणूस माणसाला ओळखू शकत नाही; परंतु जेव्हा हा अहंकार गळून पडतो तेव्हा मात्र साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याला देव मिळू लागतो. असा परमेश्वर घराघरात पाहायला शिकणे म्हणजे अनंत दर्शन होय.
अनंत पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते. यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्य शाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. या दिवशी चौदा या संख्येला महत्त्व अधिक असते. हे व्रत कोणाकडूनही घ्यायची गरज नसते. हे व्रत कोणीही सुरू करू शकतं. चौदा र्वष व्रत केल्यावर चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.
या दिवशी मध्यान्हकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला दोन पंचे गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात.
त्याप्रमाणे चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरक घेऊन त्याचीही पूजा करतात. या दो-याला अनंत असं म्हटलं जातं. तो पुरुषाने उजव्या हातात बांधावा. त्याचप्रमाणे मिळणारी अनंती पत्नीने उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा पठण करावी. रात्री मंत्रजागर करून ब्राह्मणास दक्षिणा देऊन पक्वान्नांचे वाण देतात. याप्रमाणे चौदा र्वष अनंत पूजन केलं जातं. या व्रतामुळे इच्छित हेतू सफल होतो, असं म्हणतात.
चौदाव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं. या व्रतासाठी दांपत्य भोजन देण्याची प्रथा आहे. निमंत्रित केलेल्या दाम्पत्यांना चौदा अनारशांचं वाण दिलं जातं. अनारसे देणे शक्य न झाल्यास चौदा पेढे किंवा लाडू द्यावेत. अनंताचा दोरक वास्तविक वर्षभर ठेवायचा असतो. परंतु शक्य नसल्यास एखाद्या चांदीच्या डबीत ठेवून ती डबी देव्हा-यात ठेऊन रोज तिला हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा. पुढल्या वर्षी त्या दो-याने विसर्जन करावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.प्रहार
Leave a Reply