परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचारचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले. जे वाईट गुणधर्म जाणवले,ते देखील त्या परमेश्वरांतच असल्याचे म्हटले. म्हणून तो एक परिपूर्ण शक्तीस्वरुप असल्याचे व्यक्त झाले. अनेक विचार अनेक धर्म,पंथ,ग्रंथ इत्यादींचा विचार केला तर सर्वजण एक मतानी हेच मानतात की वरील प्रमाणे त्याचे सर्व गुणधर्म आहेत व तो फक्त एकच आहे. खरे बघतां त्याचे गुणवर्णन केंव्हांच पूर्ण होऊ शकत नाही. कारण तो जेवढा अमर्याद समजला गेला. तेवढेच आम्ही त्याचे वर्णन करणारे एकदम मर्यादीत असतो. एका मर्यादीत ज्ञानशक्तीने अमर्याद तत्वाचे वर्णन करताना आम्ही तोकडे पडतो.
त्या परमेश्वरानी कांही गुणधर्मांची उधळण ह्या जगांत, विश्वांत केलेली दिसते. उधळण ह्यासाठी म्हणतो की ते गुण बिंदू सर्वत्र पसरले गेलेले, विखूरलेले जाणवतात. त्यांत आहे प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती. ह्या सर्वांचा सांघीक, एकत्र परिणाम म्हणजे जीवसृष्टी. भिन्न दिसणारी परंतु एकाच मुळ संकल्पनेतून निर्माण झालेली. प्रत्येकाचे कार्य, उद्देश, व जीवनचक्र ह्याची रुपरेखा आसून ते चालत असते. अनेक पदार्थांची निर्मीती करताना प्रत्येकाचे आपापले मुळ गुणधर्म हे देखील निश्चीत करुन ठेवलेले आहेत. याचा अर्थ निसर्गाने त्याचे आपले नियम केलेले आहेत. त्यामध्ये केव्हांच फरक पडत नसतो. सर्व नियम निश्चीत व ठरलेले आहेत. जसे दाहकता, उष्णता हा अग्नीचा गुणधर्म. तो ज्यांच्या संपर्कांत आला त्याला जाळून टाकणारा. पाण्यांत राहणारे प्राणी यांना जलचर प्राणी म्हणतात. ते पाण्यांतच जगू शकतात. वा जमिनीवरील प्राणी, जमीनीवरच राहू शकतात. ज्यांना जे माध्यम जगण्यासाठी दिले ते त्याच माध्यमांत आपले जीवन व्यतीत करतात. वेगळ्या माध्यमांत जगणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य.
थोडक्यांत अशाच प्रकारचे अनेक अनेक नैसर्गिक नियम केले आहेत. जगाची सर्व दैनंदिन कार्ये त्याच्याच आधाराणे चालतात. उंचावरुन पडलेले फळ खालतीच येणार. परंतु पडलेले फळ आपोआप केव्हांच आकाशाकडे जाणार नाही. निसर्गाच्या नियमांमध्ये केव्हांही बदल होत नसतो. जेव्हां काहीं विपरीत घडले असे भासते, ते ही निसर्गाच्या कोणत्यातरी चौकटी नियमानुसार होत असते. कदाचित् मानवाला ते ज्ञात होत नसावे. किंवा त्याची उकल ही त्याच्या लक्षांत आली नसेल. येथेच माणसाची अवस्था संभ्रमी होते. साशंक होते. मग त्या घटनेवर अनेक तर्क वितर्क केले जातात. येथेच जन्म होतो श्रद्धा वा अंधश्रद्धा ह्या स्वभाव गुणधर्मांचा. काहींजण याला चमत्कार असे संबोधतात.
परमेश्वर जसा वर सांगीतल्या प्रमाणे अनेक गुणधर्मानी भरलेला असतो, तसाच तो १. ” प्रेम- दया- कृपा ” ह्या गुणानी व्याप्त असतो. आणि हे सर्व गुण सतत बरसत असतात. जेव्हां ही ईश्वरी कृपा वा दया म्हटली जाते, त्याचा अर्थ तो सतत कृपा वा दया यांची उधळण करीत असतो. हे सत्य आहे.
२. मात्र तो कुणावर वैयक्तीक वा प्रासंगीक उधळण केव्हांच करीत नसतो. ” ईश्वर कृपावंत आहे, दयावान आहे, वा दयाळू आहे ” असे म्हणने सत्य असते. परंतु ” ईश्वराने माझ्यावर कृपा केली वा मला दया दाखविली” हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. ईश्वर कृपावंत आहे हे म्हणणे जेवढे योग्य तेवढेच त्याने मजवर कृपा केली हे सांगणे चुकीचे. हा त्याच्या कृपेच्या सागरांत तुम्ही ती कृपा प्राप्त केली हे शक्य असेल.
पाऊस सर्वत्र पडतो. हे सत्य. तो बरसला. हा तसाच एक प्रकार. त्या पावसाची जाणीव येऊन तुम्ही घराबाहेर पडणे व पावसांत ओले होणे हे महत्वाचे असते. पाऊस तुमच्या अंगावर येऊन केव्हांच पडत नसतो. पावसाचा आनंद घेण्यासाठी त्या बरसणार्या पावसांत तुम्हास जाणे जरुरी असते. त्याचे असेच महान गुणधर्म प्रकाश, उष्णता. आर्द्रता, हवा, पाणी, तेज, पर्जन्य, विज, थंडी, वारा,आणि असेच अनेक घटक पदार्थ व उर्जाशक्ती. इत्यादी आपल्या अंगावर झेलून ते ग्रहन करावे लागते, आनंद लुटावा लागतो. घरांत राहून, बंद खोलीत राहून, दारे खिडक्या बंद करुन ते सारे तुम्हास कसे मिळणार ?
त्याच प्रमाणे ईश्वर कृपावंत आहे, दयाळू आहे हे सत्य. मात्र त्याची कृपा, त्याची दया ही तुम्हास आपल्या कर्तृत्वाने वा क्षमतेने झेलावी लागते. असे न करता जर तुम्ही ” ईश्वराची मजवर कृपा झाली ” हा शब्दप्रयोग तरीत असाल तर तुम्ही एक अर्थाने त्या ईश्वराला दोष देणारे वाक्य उच्चारता, हे लक्षांत घ्या. उदाहरणार्थ दहा व्यक्तींनी एक गोष्ट हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. एकाला ती मिळाली. त्यामुळे जेव्हां ती तुम्हाला मिळते, त्यांत अनेक कारणे असतात. जसे तुमचा प्रयत्न, इच्छा, आन्तरीक चेतना, योग्यता, धडपड, हिम्मत, आणि आणखी बरेच कांही. त्यापैकी कदाचित् ईश्वराची कृपा हेही एक त्यांत असू शकेल. परंतु तो कृपाभाग हा तर सर्वावर सारखाच बरसत असणारा असेल. जेव्हां तुम्ही ” ईश्वराची मजवर कृपा झाली ” ही उपाधी लावतां, तेव्हां त्याने इतर नऊ लोकांवर अन्याय केला असे होणार नाही कां ? तो भेदभाव करतो असे त्यातून कुणाला वाटणार नाही कां ? Partiality करण्याचा ठपका त्यावर लागणार नाही कां ? तो तर सर्वासाठी न्यायी असतो. जे तुम्हाला मिळाले त्यांत ईश्वरी कृपा असेलही परंतु ती फक्त तुम्हास मिळाली असे नव्हे. तो कृपाळू, दयाळू सर्वासाठी सारखाच असतो. परंतु तो कधीही कुणावर वैयक्तीक कृपा करीत नसतो. ही समज जाणणे जरुरी असते. तो फक्त गुणांची उधळण करतो. तुम्हाला ती वेचायची असतात. तुमची क्षमता, जीद्द, प्रयत्न, आंतरीक इच्छा असे गुणधर्म त्या कृपेला हस्तगत करु शकतात. जे महान झाले असे अनेक विषयांत, प्रांतात चमकले. कांहीतरी मिळवायचे ह्या घ्येयानी ते झपाटले गेले होते. परमेश्वरी गुणघर्म ते टिपत जातात, त्याला आदर देतात, परंतु त्याच वेळी निवडलेल्या कार्यांत पूर्णपणे झोकून देता.
* जे महान झाले ते फक्त स्वकर्तत्वाने, स्वबळाने. हिमतीने, प्रयत्न्याने.
* ते फक्त गोळा करीत गेले सारे विखुरलेले ईश्वरी सद्गुणांचे मोती
* त्यानी अमोल, अप्रतीम असा मोत्यांचा हार बनवून जगाला अर्पण केला.
* हे सारे करीत असताना त्यांचा आन्तरात्मा त्या सर्वज्ञ, सर्वव्यापी सर्वशक्तीमान ईश्वराला
सतत साक्षी ठेऊन होता.
३. हां ! परमेश्वरा विषयी प्रेम, आदर व्यक्त करताना तो कृपावंत दयाळू ही विशेषणे लावणे चांगले. परंतु त्याची माझ्यावर कृपा झाली हा फार मोठा गैरसमज असेल. त्याची कृपा होते ही भावना तुम्हास अशक्त करेल. तुमच्या प्रयत्नामध्ये बाधा अणेल. कसेही झाले तरी तो मला दया दाखवील हा बाब केंव्हांही नसावी. ईश्वरा विषयी श्रद्धा गोष्ट वेगळी. परंतु अवलंबाची भावना, मुळीच नसावी. बरेचजण देवाची व्याख्या, त्याला मानवातील वरच्या दर्जाचा असे करतात. Some treat God as SUPERHUMAN. हे अत्यंत चुकीचे आसते. त्यांत मानवी मनाच्या आवडी, भावना, ईच्छा हे विचार त्याच्यावर थोपवले जातात. मग मला जे आवडते, भावते, ते त्याला तसेच आवडणारे समजून आपण त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचे आहे.
परमेश्वराशी मैत्री अर्थात सख्य हा भाव वेगळा. तो तसा असावा. अर्जून सुद्धा श्रीकृष्णाला सखा समजत होता. परंतु ही भावना येताना त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची, जाणीव सतत असणे गरजेचे वाटते. तो कृपा करतो, दया करतो, हे गृहीत धरु नका. तो फक्त तुमच्या योग्य प्रयत्नाना साथ देतो. हे एकदम खरे. स्वतःच्या मनाचा, विचारांचा सतत चांगला विकास करीत रहा. यश निश्चित मिळते. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते याजसाठी. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे केव्हांच घडत नसते. तो अत्यंत न्यायप्रिय असतो. निसर्गाच्या नियमांना समजून घ्या. तेथे कोणतीही चुक होणार नसते. वा मेहेरनजर नसते.
करा-मिळवा- अथवा भोगा हेच एक महान तत्वज्ञान त्या ईश्वराचे.
(ललित लेख)
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply