तुम्ही तुमच्या आरशातल्या प्रतिमेकडे निरखून पाहिलं आहेत का? म््हणजे पाहिलं नक्कीच असेल. पण ते आपलं सौंदर्य न्याहाळण्यासाठी त्या प्रतिमेची लक्षणं ध्यानात घेण्यासाठी पहा. तुम्ही आणि तुमची प्रतिमा यांच्यात एक फार मोठा फरक दिसेल. उजवी-डावी यांची उलटापालट झालेली आढळेल. म्हणजे तुम्ही तुमचा उजवा हात उचललात तर ती प्रतिमा आपला डावा हात उचलेल. तुम्ही उजवीकडे भांग पाडत असाल तर प्रतिमेचा भांग डावीकडे असेल. पण हे खरोखरीच खरं आहे का? का तोही एक आभासच! कारण उजवी-डावी यांची अशी उलटापालट होते, पण वर आणि खाली यांची तशीच उलटापालट का होत नाही, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो.
कारण आरशासमोर आपण नेहमीसारखे पायावरच उभे राहिलो तर प्रतिमाही आपल्या पायावरच उभी राहिलेली असते. तिचं डोकं खाली आणि पाय वर असं होत नाही. तेव्हा तशी उलटापालट का होत नाही, हा सवाल सयुक्तिकच वाटतो. पण जरा बारकाईनं पहा. खरोखरच डावी आणि उजवी यांची उलटापालट झालेली असते का? तुम्ही तुमचा डावा हात उचललात तर प्रतिमा आपला उजवा हात उचलते असं आपण म्हणतो.
पण कोणाच्या नजरेतून तो उजवा असतो? त्या प्रतिमेच्या. तिचा उजवा हात तुमच्या डाव्या बाजूलाच असतो. उजव्या नाही. याचं कारण म्हणजे खरी उलटापालट होत असते ती समोरून पाठीमागच्या बाजूला. याची प्रचिती घ्यायची असेल तर हात, कोणताही, उजवा किंवा डावा, उचलण्याऐवजी समोर करा. आरशाच्या दिशेनं. आता प्रतिमा काय करते? तिचा हात तुमच्या दिशेनं आलेला असतो. त्याची बोटं आरशाला चिकटलेली असतात आणि खांद्यापर्यंतचा बाकीचा हात तुमच्या पासून दूर गेलेला असतो. याची दुसरी प्रचिती घ्यायची असेल तर तोच आरसा जमिनीवर ठेवा आणि तिच्यावर उभे राहा. आता तुम्ही जरी खाली पाय आणि वर डोकं करून उभे असलात तरी प्रतिमा मात्र खाली डोकं आणि वर पाय करून उभी असते. खरं ना?
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply