एकदाचि एकट्याचे । भरविले संमेलन ।
कोटी रूपये खर्च । म्याचि केले ॥१॥
कष्ट उप्सूनिया । शोधले मतदार यार ।
त्यांच्या जोरावर । अध्यक्ष मी ॥२॥
इतभर मतदार । वीतभर बुद्धी ।
बाकी मंदबुद्धी । शहाणे ते ॥३॥
वाचणारा नाही । छापणारा
नाही ।
मतदार कुठे नाही । दिसतची ॥४॥
नको माणिक । नको चंदाचा छंद ।
नको अशोक । बोलबच्चन ॥५॥
स्वागताशी उभा । ठाण्यावरी मीच ।
कशाला कवतिक । आणिकांचे ॥६॥
शाळेतील मुले । स्पर्धा त्यांची झाली ।
जिंकले ते बैसले । मंचावरी ॥७॥
माझिया अभिभाषणा । श्रोता असे मीच ।
टाळियांमधुनीसुद्धा । वाजलो मी ॥८॥
आठवणी जुनेयांच्या । अशा मी काढिल्या ।
धों धों वाहिले पाणी । वीज गेली ॥९॥
पोट ‘भरूनि’ वाचल्या । माझ्याच कविता ।
झडलो परिसंवादी । भांडलो मी ॥१०॥
म्हणालो आपण । चाललो कोठे ।
साहित्याचे बैल । झोपी गेले ॥११॥
अजुनही तुम्हां कळेना । ‘संध्याकाळची कविता’ ।
रोज सकाळी धरितां । एक्सप्रेस ॥१२॥
तोच तोच सूर्य । तीच तीच लाट ।
निळ्याची निळाई । संपून गेली ॥१३॥
समीक्षेचा रेडा । बोली जडजंबाळ काही ।
नेम असलेले तिथे । फारच थोडे ॥१४॥
बहुप्रसवता अबलांची । आताशा आटली ।
बाबांचीही जागा । रिकामीच ॥१५॥
आटल्या सकळही । साहित्याच्या सरिता ।
प्रवाह आता मोठा । वृत्तपत्रांचा ॥१६॥
पुस्तक प्रदर्शनी । प्रकाशकांचा उजेड ।
तंडती सांड-भांड । जागेसाठी ॥१७॥
दिवसा
घोंगडी । रात्रीची कांबळी ।
नको कीर-किर । चोराचिलटाची ॥१८॥
झोपेतच पास केले । ठराव-बिराव काही ।
डरांव डरांव सुद्धा । म्हणालो मी ॥१९॥
‘झालाच पाहिजे’ । ‘व्हायला हवा’ ।
‘समिती बसवू’ । दादा बोले ॥२०॥
मराठी स्वभाव । मुळीच उदार ।
कशाला अडगळ । हिशेबाची ॥२१॥
तोंडी आदेश । कोरे धनादेश ।
हिशेबाचे अवशेष । जाळिले मी ॥२२॥
[थोरले टिकोजीराव]
— थोरले टिकोजीराव
Leave a Reply