माझा घराजवळचा एक नेहमीचा भाजीवाला आहे. मारवाडी आहे. एका किराणामालाच्या दुकाना बाहेर आपलं दुकान थाटलंय. सकाळी सात ते रात्री अकरा त्याचं दुकान चालू असतं. भाजी घेऊन पैसे देऊन झाले की पिशवीत आलं, लिंबं, कढीपत्ता काहीतरी प्रेमानं आणि आग्रहानं भरून देतो…
आज संध्याकाळी त्याला विचारलं की ‘शेटजी, सुट्ट्या नोटांचं काय करताय तुम्ही?’… तर म्हणाला की मोठ्या शेटशी (म्हणजे त्याच्या मागचा किराणामालाचा दुकानदार) टाय-अप केलंय… इथून भाजी विकत घ्या आणि त्यांच्याकडे कार्डनी पेमेंट करा…!
मी खुष झालो. भाजी घ्यायला लागलो. तेवढ्यात मोठ्या शेटनी ओरडून सांगितलं की ‘सर्वर डाऊन आहे. कार्ड पेमेंट चालत नाहीयेत’. मी थांबलो. भाजीवाल्या मारवाड्याला विचारलं ‘काय करू?’
तो म्हणाला, ‘आप जो चाहिये लेके जाओ. पैसा बाद में देना.’
तो तसं म्हणाला तरी मलाच धजवेना. मी अगदी गरजे पुरती एक दिवसाचीच भाजी घेतली. शंभराच्या आतलीच. खिशातली एकमेव शंभराची नोट काढून त्याला द्यायला लागलो तर म्हणला, ‘रहने दो सहाब ये नोट इमर्जन्सी के लिए. मुझे बाद मे देना पैसा. मै भी यहीं हूं और आप भी यहीं होगे’
मी नाईलाजानं ती नोट पुन्हा खिशात ठेवली… त्याला म्हणालो, ‘लिहून ठेव’… तर म्हणाला, ‘तुम्हीच लक्षात ठेवा आणि जमतील तेंव्हा द्या…’
कट टू
पलिकडच्याच एका वाईन शॉपमध्ये शुक्रवार संध्याकाळ निमित्त झुंबड उडली होती. तिथे कार्ड घेतात, पण ‘सर्वर डाऊन’ मुळे कार्डं घेतली जात नव्हती. खिशात नव्या किंवा सुट्या नोटा नसलेले लोक दुकानदाराशी हमरीतुमरीवर येत होते… अन दुकानदार कधी शांतपणे तर कधी मग्रूरपणे ‘कॅश टाका अन दारू घ्या’ हे गिऱ्हाईकांना ऐकवत होता…
कट टू
घरी आलो. इस्त्रीवाला आधीचे कपडे घेऊन आला होता. त्याचे दोनेकशे रुपये झाले होते. खिशात शंभराच्य दोन नोटा नव्हत्या. ‘काय करुया?’ असं त्यालाच विचारलं. ‘पाचशे झाले की चेक द्या’ असं तो म्हणाला आणि पुढचे कपडे घेऊन गेला…
******
या सगळ्या काल संध्याकाळी घडलेल्या १००% सत्य घटना…
आता यांना द्यायचाच तर काहीही Spin देता येईल
*******
पहिला Spin: भाजीवाले, इस्त्रीवाले आणि बहुसंख्य छोटे व्यावसायिक देशभक्तिपोटी आर्थिक झळ सोसत आहेत…
दुसरा Spin: भाजीवाले, इस्त्रीवाले आणि बहुसंख्य छोट्या व्यावसायिकांची भीषण ससेहोलपट होत आहे…
तिसरा Spin: काही दुकानं, विशेषतः दारूची वगैरे, इथे भीषण वादावादी, हमरी-तुमरी आणि भांडणं होत आहेत….
********
माझा Spin: अस्मानी संकटं आणि सुल्तानी संकटं सांगून येत नाहीत… पण ही संकटं आलीच तर एकमेकांना मदत करतात तीच खरी माणसं…. तीच खरी नाती….
अशी किती माणसं आपण जोडली आहेत?…. अशी किती नाती आपण रुजवली आणि फुलवली आहेत….?
*********
खिशात ‘आज’ पुरेशा नोटा नसतानाही मला जगण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी मिळू शकतात… त्या केवळ मी जोडलेल्या माणसांमुळे आणि नात्यांमुळे…
मी जगातला सर्वांत जास्त श्रीमंत माणूस आहे!!
Forwarded post
Leave a Reply