नवीन लेखन...

एकांत आणि आकांत

अनुबंध म्हणू की पाश
इच्छाच त्या हताश
कच्च्याच वासनांचा
पिकल्याविना विनाश
सविता साने… कंसात नाव बदलले आहे. म्हणजे स. सा. हे खोटं नाव. स. सा. हे नाव खरं असतं आणि पुढे नाव बदललंय असं लिहिलं असतं तरीही चाललं असतं. तरीही योगायोगाने खरोखरीच सविता साने नावाचा स.सा. अस्तित्वात असेल तर त्या सशाकडे आपण सारेच डोळे उगारून बघणार. आपण म्हणजे समाज. आणि त्या सशाचा पारधी म्हणजे सुनील मोरे अर्थात सु.मो. तर सविता साने सांगत होती की, सुनील मोरेला फाशी देऊन काही होणार नाही. त्याचं लिग कापलं पाहिजे. पोलीस दारू पितात, ऑन ड्युटी पितात, हा मुद्दाच नाही. उलट पोलिसांनी दारू प्यावी. त्यामुळे त्यांच्यात लैंगिक शैथिल्य येईल. ते चांगलंच होईल.
कविता काणे (नाव बदललंय हे आता लगेच लक्षात आलं असेल नाही.) तर कविता काणे म्हणाली की, ती ‘जी‘ कोण बलात्कारित मुलगी होती ती गप्प का बसली. निर्जन ठिकाणी आडवेळी बलात्कार होणं वेगळं आणि सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी बळजोरी होणं वेगळं. तिला शक्य असतं तर तिने होऊच दिला नसता बलात्कार.
कविता ही चर्चा आता अनावश्यक आहे असं नाही वाटतं. बलात्कार आणि बळजोरी असे दोन वेगवेगळे शब्दप्रयोग वापरण्याचं काय कारण? बळजोरीत काही अंशाने संमती गृहीत धरता येते. मग ती भीतीच्या पगड्याखाली असो वा ब्लॅकमेलिगमधून आलेली असो.
त्याने काय फरक पडतो? अखेरीस अनुभव उद्ध्वस्त करणाराच असतो.
बाईच्या दृष्टीने सारंच भीषण. पण पुरुषाच्या दृष्टीने फरक पडतो. बळजोरीचा दृष्टिकोन हा अधिक हिडीस असतो. तो केवळ वखवख भागवण्यापुरता नसतो. तो त्या बाईची अप्रतिष्ठा करण्याच्या हेतूनेच असतो.
कविता प्लीज एक्स्प्लेन.
खूप सरळ आहे. सुनील मोरेने त्यासाध्याशा चौकीत त्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचं धैर्य का दाखवलं? कारण ती मुलगी फार काही आकांड-तांडव करणार नाही याचा त्याला कॉन्फिडन्स होता. हा कॉन्फिडन्स अशा इम्प्रोवाइज्ड सिच्युएशन्समधून येत नाही. याचा अर्थ सुनील मोरे अशा सिच्युएशन्सचा फायदा या आधीही घेत आलाय.

चोरटं का होईना पण सेक्सुअल प्लेजर घ्यायला मुलीही धजावताहेत, हेच सुनील मोरे प्रवृत्तीला सहन होत नाही. तो पंधरा वर्षाचा पोरगा काय तुला सुख देणार. तुला एवढी खवखव सुटलीय तर मी तुझी गरज भागवतो. त्या दगडात जाऊन मजा करायला पाहिजे का, आता त्याची सजा भोग! हा असाच अप्रोज मोरेने घेतला असणार.
मुक्तपणा, मोकळेपणा, स्वैरपणा याची किमत स्त्रीला मोजणं भाग आहे, असा यातला पुरुषी पवित्रा. मात्र त्याचं शासन देऊ पाहणारे तुम्ही कोण? सविता साने आणि कविता काणे दोघींनाही म्हणायचं होतं की, सुनील मोरेने केलेला बलात्कार हा केवळ वासना अनावर झाल्याने नव्हता, तर कोवळ्या वयातच सुखलोलुपता जपण्याच्या बाईच्या धारिष्ट्याचा तो गुन्हा होता. पुन्हा एकदा पोलिसांच्या तालिबानीकरणाकडे त्यामुळे बोट दाखवलं जाऊ शकतं. खडकात जाण्याचा गुन्हा बलात्कारित मुलगी आणि तिचा मित्र असा दोघांनीही केला होता. मात्र सजा फक्त मुलीलाच दिली गेली. बलात्कार ही सजा खूपच मोठी होती. त्यामुळेच या घटनेचा गवगवा झाला, पण दर वेळी बलात्कार जरी नाही झाला तरीही पावलोपावली तालिबानी वृत्तींकडून होणारी मानहानी काही फार कमी नसते.
त्या मुलीवर एका तासाच्या अवधीत त्या चौकीत तीन वेळा बलात्कार झाला. त्या आधी मारहाण झाली, दमदाटी केली गेली, तिच्या घरी या गोष्टीची वाच्यता करण्याची धमकीही दिली गेली होती. ती मुलगी आपल्या मित्रासह लक्ष्मणरेषा ओलांडून खाली खडकात गेली होती. खाजगी सुरक्षारक्षकांकरवी ही टीप पोलिसांना गेली. अशा जोडप्यांकडून पैसे उकळण्याची संधी पोलीस कधीच सोडत नाहीत. कायद्याच्या कक्षेत त्यांचा गुन्हा बसत नसला तरीही चोरटेपणाचा धागा पकडून त्या असहाय्य जोडप्यांवर कायद्याचा दंडुका उगारायचा आणि बार्गेनिग करायचं हा पोलिसांचा सर्रास धंदा.
पोलिसांच्या वृत्तीवर पोलिसांकडूनच विधान मिळवणं हे आता कष्टाचं काम होतं. पुन्हा खोटं नाव देण्याचे कष्ट टाळून ’एका’ पोलीस अधिकार्याचं विधान मिळवलं. ते म्हणाले, ’सुनील मोरेमुळे आमच्या अख्ख्या पोलीस दलाची मान खाली गेलीय हे खरंय. पण एका सुनील मोरेपायी तुम्ही पोलीस विभागाला विकृत ठरवू नका. पोलीस म्हणजे अडकित्त्यातल्या सुपारीसारखा आणि समाज हा दुतोंडी असतो. समाजाला जबाबदारी नको असते. फक्त आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणं लोकांना आवडतं. पण जर बाहेर पाहिलं तर मुला-मुलींची वर्तणूक अत्यंत लाजिरवाणी असते. जनाची नाही तरी मनाची लाज बाळगणं गरजेचं आहे. भरदुपारी ही जोडपी कट्ट्यावर बसलेली असतात. लहान मुलांवर आपल्या वागणुकीचा काय परिणाम होईल याची जराही फिकीर त्यांना नसते. काही बंधनं पाळायचीच नाही असं ठरवल्यावर इतरांवर त्याचा परिणाम होतो.
उघड्यावर अंगविक्षेप करणे, बीभत्स वर्तणूक करणे ११० कलमाखाली चार्ज लागू शकतो. त्याचा शंभर ते सव्वाशे रुपये दंड होऊ शकतो, त्यापुढेही ११२ शिक्षा कलम आहे. पोलिसासमक्ष बीभत्स वर्तणूक घडली तर अटकही करता येऊ शकते. मॅजिस्ट्रेटसमोरही मग दंड आकारून किंवा मग साधी वॉर्निंग देऊन सुटका होते.
मात्र लोकांना पोलिसांनी हटकणं हाच मोठा अपमान वाटतो. आपल्याला पोलिसांनी समज देणं लोकांना आवडत नाही. आम्ही श्रीमंतांच्या बिघडलेल्या मुलांनाही सोडत नाही. कारमधल्या जोडप्यांनाही आम्ही हटकतो. एकदा एका कारमध्ये मध्यरात्रीनंतर आम्हाला एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेला मुलगा आणि एक नववीतली मुलगी असे दोघे सापडले. आम्ही त्या मुलीच्या आईला फोन केला. ती एक प्रसिद्ध समाजसेवक होती.तर त्या बाईने आम्हालाच झापलं. माझी मुलगी सुजाण आहे, तिला तिची काळजी कशी घ्यावी हे उत्तमरीत्या कळतं. मला अवेळी फोन करू नका, असं सांगून तिने फोन ठेवला. हॉटेलमध्ये आम्ही धाडी टाकतो, त्यात मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुलीच दिसतात. चुकीच्या मार्गावर जाणार्‍या या मुलींना योग्य समज देऊन समाजाला विधायक वळण लावायचं काम पोलिसांनी अनेक वेळा केलेलं आहे. पण त्याचं कौतुक पोलिसांच्या वाट्याला फारसं आलं नाही. पोलीस अधिकार्याचं हे प्रतिपादन. तरीही नडून एखाद्या पोलिसाने त्रासच द्यायचा ठरवलं तर वीतभर अंतरावर बसलेल्या जोडप्यालाही ते नाडू शकतात, हेही त्यांनी कबूल केलं. पोलिसांची बाजू मान्य केली तरीही त्यामुळे सुनील मोरे प्रवृत्तीचं समर्थन करता येत नाही.

या बलात्काराच्या अनुषंगाने लोकांची मतं आजमावताना एक प्रश्न सातत्याने विचारला गेला. ती मुलगी आधीच ओरडली का नाही. एवढं सगळं होईपर्यंत ती गप्प का राहिली. अखेरीस असह्य वेदनांमुळेच ती किचाळू लागली.
आपलं छोटं प्रेमप्रकरण घरापर्यंत जाऊ नये यासाठी तिला हा अत्याचार सहन करणं श्रेयस्कर वाटलं असेल का? बलात्कारापेक्षाही घरच्यांपर्यंत संबंधांची बातमी जाणं हे तिला जास्त नामु
मुला-मुलींचं वय तर काही लपत नाही. आकर्षणातून निर्माण होणार्या समस्यांना तोंड द्यायला आपण त्यांना शिकवत नाही. नागरीकरणाच्या झपाट्यात त्यांना खूप काही गोष्टी योग्य वयाच्या आधीच कळलेल्या आहेत, कळत राहणार. तुम्ही वयात आलेल्या मुलीला बुरख्यात तर ठेवू शकणार नाही, ना तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकणार. ती टी.व्ही., व्हीसीआर, सीडी प्लेअर, कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल या सर्व गोष्टींचा आस्वाद घेणार. मात्र या माध्यमातून फक्त ज्ञान वेचून तिने या अग्राह्य गोष्टींना टाळावं अशी अपेक्षाही आपण करणार.
निसर्ग त्याचं काम करत असतो. आपण इतकं घुलंमिलं कल्चर आता बदलू शकत नाही. आपण त्यांना स्पेस नाही देऊ शकलो तर ते त्यांची स्पेस शोधून काढणारच.
आता राहता राहिला प्रश्न, आपण त्यांना अशी स्पेस द्यायची का हा! आपण ज्यांना आदिवासी म्हणतो त्या प्राचीन संस्कृतीत ‘गोटुल‘सारखी अत्याधुनिक कल्पना प्रथमपासून आहे. मात्र जोडीदार निवडण्याचा अधिकार आणि त्याच्याशी प्रणय करण्याचा अधिकार आपण आजही देऊ शकत नाही. ‘चॉईस‘ स्त्रीला देण्याबाबत आपण परंपरावादी आहोत. एकीकडे आपल्या संस्कृतीतील ‘गोटुल‘, स्वयंवर संस्कृतीचा आपण बडेजाव मिरवतो, मात्र आपल्या मुलीला चॉईस देण्याबाबत आपला नकार असतो.
त्यातूनच चोरटे, लपवून-छपवून संबंध विकसित होतात. सप्रेस्ड भावनांचा चुकीच्या पद्धतीने उद्रेक होतो. मग आपल्याला चांगल्या घरातल्या मुली, कनिष्ठ काम करणार्‍या तरुणांच्या नादी लागल्याचं चित्र दिसायला लागतं.
श्रीमंत तरुण-तरुणांना निदान पब, पार्टीजचा आधार असतो, मध्यमवर्गीयांच्या मुला-मुलींना असं सोशल वातावरण मिळत नाही. मग दांडियाच्या वेळी, गणेशोत्सवातल्या कार्यक्रमात, नाटकाच्या तालमीत, एखाद्या शिबिरात केवळ काही काळापुरत्या सहवासानेही मुलं-मुली प्रेमात पडतात किवा जे काही आकर्षण असतं त्यालाच प्रेम समजतात. त्याचा रिव्ह्यू करण्याआधीच त्या संबंधाचं पुढे लग्नात रूपांतर झालंच पाहिजे अशा सक्तीत अडकतात. अशा संबंधातून निर्माण झालेल्या लग्नगाठींमध्ये आर्थिक, वर्गीय घटक धाब्यावर बसवले गेल्यास कटुता निर्माण होते आणि मग त्या कटू अनुभवांच्या आधारावर अशा मोकळ्या वातावरणालाच विरोध करण्याची ऊर्मी विकसित होते.
तरुण पिढीला मानसिक आणि भावनिक स्पेस देण्याच्या समस्येवर आता समाजाने, विशेषतः पालकांनी परिपक्व होण्याची नितांत गरज आहे. यापुढे जाऊन सरकारलाही अशा तरुणांसाठीच पब्लिक प्लेसेसची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रमोद नवलकरांनी नाना-नानी पार्कची योजना पुढे रेटली तेव्हा जोडप्यांची पार्कही असावीत अशी कल्पनाही पुढे आली होती. पण तिला मूर्त स्वरूप मिळालं नाही. सिनेमा थिएटरमध्ये कपल सीटस्ची कल्पनाही टीकेमुळे अमलात आली नाही. पूर्वी थिएटर्समध्ये बॉक्स असायचे. तेही आता बंद झालेत. हॉटेलांमध्ये झुलत्या दारांचे फॅमिली रूम्सही दिसत नाहीत. तलाव-बागा, समुद्रकिनारे, कट्टे, जंगलं इथेही गर्दी वाढत चाललीय.
जोडप्यांची एकांताची जागा अधिक आक्रसत चाललीय आणि ते पुढच्या पिढ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य होणार नाही. सार्वजनिक ठिकाणी गुरफटून बसलेलं प्रत्येक जोडपं काही लैंगिक चाळे करत नसतं. मात्र सार्वजनिक ठिकाणावरची वरिष्ठ मंडळी बर्‍याचदा पोलीस ठाण्यांना फोन करून हे लैंगिक चाळे बंद करा, असं अतिशयोक्ती वर्णन करत दडपण आणत असतात. त्यामुळे पोलिसांचे दंडुके प्रसंगी रिलॅक्स्ड लग्न झालेल्या जोडप्यांवरही उगारले जातात.
त्यामुळे जोडपी समुद्र किनार्‍यावरच्या दुस्तर जागा शोधू लागतात. पण तिथेही आंबटशौकिन बघे त्यांचा पिच्छा सोडत नाहीत. मध्यंतरी मुंबईतल्याच एका समुद्रकिनार्‍यावर सरासरी पंधरा वयोगटाच्या दहा-बारा पोरांनी या आंबटशौकिनांविरुद्ध आघाडी उघडली होती. काठीचे रट्टे देऊन खडकांमधील असे अनेक आंबटशौकिन प्रेक्षक त्यांनी हाकलण्याचं मोठ्ठंच सोशलवर्क केलं. जोडप्यांना मात्र ते ’आरामसे बैठो’ असे सांगायला विसरले नव्हते. हेही तालिबानांचंच वेगळं रूप. या वयात त्यांना प्रणयी जोडप्यांची बाजू पटतेय म्हणून त्यांनी कायदा हाती घेतला. उद्या ते पटलं नाही तर काठीचे रट्टे जोडप्यांनाही बसू शकले असते.
शिवसेनेनेही या प्रसंगानंतर मुलींच्या कपड्यांवरच घसरत तालिबानी अॅप्रोच घेतलाय. पोलीस, भटकी मुले आणि राजकीय पक्ष सार्‍यांना सार्वजनिक नैतिकतेचा चाबूक आपल्या हाती असावासा वाटू लागलाय.
मात्र या बकाल नागरीकरणात सार्वजनिक नैतिकतेचे सगळेच निकष हळूहळू धाब्यावर बसू लागलेत. ४००-५०० चौरस फुटांच्या खुराड्यात २-३ जोडपी संसार करतात. भितीचे कान ही तर जुनी गोष्ट, इथे कानांच्याच भिंती कराव्या लागतात. स्टेशनावरचा पूल ओलांडतानाही बाईसाठी स्पर्शांची सेंच्युरी सहज होऊन जाते. डोळ्यांच्या जिभा तर लवलव करत फिरतच असतात. एकट्या बाईच्या प्रत्येक चालीत कामतुषारांची कल्पना करणारे कवी तर चौफेर असतात. मग जोडीदाराच्या हाताच्या कुंपणात विसावलेल्या जेण्टस् डब्यातल्या ‘ति‘च्यावर तर स्वैरतेच्या गुन्ह्यांचे शिक्केच शिक्के बसू लागतात. पुरुषी वृत्तीच्या एका कोंडाळ्याचं ते दोघे मग एक चुंबकीय क्षेत्रच बनतात जणू!
कवी नामदेव ढसाळ एकदा म्हणाले होते, मुंबईत जागतिक पातळीच्या तुलनेत कमी बलात्कार होतात. कारण बलात्कार करायलाही थोडासा एकांत लागतो. सुनील मोरेने या गृहितकालाही सुरुंग लावला. तरीही एकांताचा प्रश्न खाली राहतोच. एकांताच्या शोधात नॅशनल पार्कात जाणार्‍या जोडप्याला प्रसंगी चोरट्या टोळ्यांच्या अत्याचाराला बळी पडावं लागतं. प्रियकरासमोरच जंगलात प्रेयसीवर बलात्कार होतो आणि ‘ब्र‘ही न काढता तो निमूटपणे सहन करावा लागतो. फार आडबाजूला गेलं तर ही अवस्था आणि गर्दीच्या सुदूर टप्प्यात राहिलं तर लैंगिक चाळ्यांचे आरोप. एकांताचा हा आकांत कुठपर्यंत चालू राहणार?

— भालचंद्र हादगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..