ज्ञानेशांचा मागोवा तसा अनेक वर्षे घेत होतो. आसपासच्या माणसांच्या वागण्याचा अर्थ लावता लावता बासनात गुंडाळलेले ज्ञानेश कधी जीविचा जीव झाले कळलेच नाही. पण हे सहज घडले नाही. अनेक मोठे मोठे धोंडे या गुरुवतीच्या ग्रंथात व माझ्यामध्ये अनेक वर्षे थटून राहिले होते. या धोंड्यांना एक-एक करून बाजूला सारले तर उघड झाला तो आनंदाचा ठेवा. जीवनाचे विश्वरूप दिसले. जाणवले की ज्ञानेशाने जे सांगितले ते पूर्ण आचरणात आणले तर जीवन आनंदाचा सागर बनून जाईल. पण एव्हढी मेहनत कोण करील? आपल्या नाही तर आपल्या जवळच्यांच्या आनंदासाठी एव्हढेही नाही करता आले तर एक तरी ओवी अनुभवावी, त्या आनंद सागरातील ओंजळभर आनंद तरी पदरात पाडून घ्यावा व इतरांना द्यावा.
पूजनीय ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी आचरणात तर सोडाच पण वाचनातही येत नाही . कारण लोकांनी या ग्रंथाविषयी ऐकलेल्या व स्वत: बनवलेल्या धारणा. त्या धरणांमुळे हा ग्रंथ सहज हाती धरता येणे कठीण झाले. या ग्रंथाचे पावित्र्य जपावे म्हणून त्याला बासनात गुंडाळला गेला. हे पवित्र बासन उलगडून त्यात लपलेले जीवनज्ञान वाचणे फारच अवघड होऊन बसले. हा ज्ञान ग्रंथ दगडाच्या जड देवासारखा जड देव बनला. त्याला वाचण्याचा एक विधी बनला. सुस्नात होऊन स्वच्छ व शांत स्थळी पूजा मांडल्यासारखे वातावरण तयार करून हा ग्रंथ अगदी सात्विक मनाने वाचायचा असतो. असे वातावरण तयार करण्यास पुरेसा निवांत वेळ नसल्याकारणे बहुसंख्यांनी हा ग्रंथ वाचण्याचा विचारसुद्धा केला नाही. अतीव श्रद्धेन त्यांनी ग्रंथ विकत घेतला. आठवणीने बासन घेतले. देव्हारा नसेल तर देव्हारा घातला व त्यात या बासनात बांधलेल्या ग्रंथदेवाची स्थापना केली आणि दररोज पूजेतल्या टाकांबरोबर यालाही पुजायाला सुरुवात केली. आयुष्य कडेला सरले पण हा ज्ञाननिधी बासनातून बाहेर ओसंडलाच नाही. जगाला प्रकाश दाखवण्याची पैज मारणारा हा ग्रंथराज त्याच्याच आर्त भक्ताने बासनाच्या अंधारात श्रद्धापुर्वक कोंडला. मोक्षाची अभिलाषा धरणा-या काही साधकांनी पारायण सोहळ्यात शर्यत लावल्यासारखे मिनिटात एक ओवी असे त्याचे पठणही केले. परंतु या शर्यतीत मागे पडण्याच्या भीतीने, वाचल्या जाणा-या शब्दांच्या अर्थापेक्षा दमसासाकडेच यांचे अधिक लक्ष राहिले. न जाणो अर्थ समजून वाचण्याच्या भरात श्वास घ्यायचाच राहिला तर वाचता वाचताच अकाली मोक्ष मिळायचा! संक्षेपात काय तर या ज्ञानराजाने जे ज्ञान उघड करण्यासाठी हि नसती उठाठेव केली ते ज्ञान बहुसंख्यांनी स्वत:च्या डोक्यात शीरूच दिले नाही. “सुख जवापाडे” असा मंत्र जपत या आनंदसागराच्या काठावर आपण आनंदासाठी व्याकुळ होऊन बसून राहिलो. फ्त हातांची ओंजळ बुडवण्याचा अवकाश आहे. जगण्यातला आनंद दशांगुळेच काय त्याहीपेक्षा सहजप्राप्य आहे. पण……….
ज्ञानेश्वरीचे प्रयोजन
जीवनाच्या सर्व भोगांचा त्यात अपेष्टांचा अधिकच, अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला. “व्यासोच्छिष्टं जगत्रय।” प्रमाणे व्यास व पुर्वसुरींचा मागोवा घेत त्यांच्या ज्ञानेश्वरीत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केला. वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने आणि नंतर भाष्यग्रंथ या क्रमाने विकसित होत गेलेले ज्ञान त्यांनी अनुभवाच्या रवीने मथले व वर आलेले लोणी ज्ञानेश्वरीरूपाने सामाजपुरुषाच्या हाती दिले. त्याकाळच्या समाजात जे अज्ञान घडत होते , ज्याने समाजात “ दु:ख पर्वताएव्हढे” हा समज रूढ झाला त्याचे निरसन व्हावे, चराचरात असलेला सच्चिदानंद सा-या मानवजातीला लाभावा, या उदात्त हेतूंनी हा ग्रंथ सिद्ध झाला. संस्कृतात कोंडलेले ज्ञान त्यांनी प्राकृतात आणले. का? तर सामान्य जनांना ते सहज समजावे म्हणून. त्या अनुभवसिद्ध ज्ञानाच्या आधारे वर्तन करून सकलांनी सुख मिळवावे हे पसायदान होते. हे सुख चिरंतन होते, अक्षर होते. दु:ख ही सापेक्ष जाणीवच त्यांना मान्य नव्हती. दु:खावर अधिकार तो अज्ञानी माणसांचा. ज्यांना जीवन जगावे कसे हे समजले त्यांना दु:ख नसते. चांगले मिळवण्याचा प्रयत्न करायचा, हे करताना थकायचे नाही, हारायचे नाही, रसरसून आनंद उपभोगत प्रयत्न करायचे. यश मिळाले तर आनंद न मिळाले तर पुन्हा प्रयत्न. दु:ख करायचे नाही. प्रयत्नांना नाव ठेवायचे नाही. देवाकडे मागायचे नाही. परमेश्वराने दिलेल्या भोगांना नाक मुरडायचे नाही. देव मूर्तीत नाही, स्थळात नाही, काळात नाही. तो चराचरात असतो. त्या तुमच्या आमच्या चित्तात असलेल्या देवाला त्यांनी पसयादान मागितले. आम्ही कृपण. तेही आजपर्यंत त्यांना दिले नाही.
ज्ञानेश्वरी वाचनातील अडथळे
ज्ञानेश्वरी वाचनात न येण्याची अनेक कारणे आहेत. ज्ञानेश्वरी माहित नसलेला मराठी माणूस सापडत नाही. पण ज्ञानेश्वरी वाचनाराही सहज सापडत नाही. कारण ज्ञानेश्वरांनी जुन्या प्राकृतात लिहिलेला ग्रंथ समजत नाही. सार्थ प्रतीत पाने जास्त असतात, त्यामुळे वाचण्याचा कंटाळा येतो. ज्ञानेश्वरी देव असल्यामुळे अनेक सश्रद्धांना तिचा अपमान होण्याची भीती वाटते. देवाचा अपमान झाल्यास आयुष्यात संकटे येतील अशी धारणा असते. यापेक्षा ज्ञानेश्वरी न वाचलेलीच परवडते. एखादा ज्ञानेश्वरी वाचताना आढळल्यास त्याला इतर हसतात. तो ‘करून करून भागला व देवपूजेला लागला’ असे टोमणे मारतात. काही जणांना तर वाचण्यासाठी वेळच नसतो. जो निवांत वेळ भेटतो तो इतर कामांसाठी राखून ठेवावा लागतो. काही जणांचा समाज असतो की अध्यात्माची पुस्तके उतारवयातच वाचावीत. आणि उतारवय झाले की वाचनासाठी बैठक मारणे जमत नाही. ही बैठकही साग्रसंगीत लागते. पूजेसाठी आवश्यक असे वातावरण तयार करावे लागते. हेही अनेकाना जमत नाही. इतर कामे करता करता वेळ मिळेल तशी ज्ञानेश्वरी वाचावी हे मत तर कुणालाच पटणार नाही. कारण ज्ञानेश्वरी हा वर सांगितल्याप्रमाणे पूजनीय धर्मग्रंथ आहे. या करणे त्याचे वाचन करू करू म्हणता होतच नाही. अडथळ्यांची ही उतरंड पार करणे शक्य न झाल्यामुळे बहुसंख्यांनी ज्ञानेश्वरी वाचलीच नाही.
ज्ञानेश्वरी आचरणात न येण्याची कारणे
ज्ञानेश्वरीचा जुन्या मराठीतील अर्थ न कळाल्याने व सार्थ प्रतीतील अर्थ वाचताना दमछाक होत असल्याने, तसेच अर्थ सांगणा-याचा योग्य अर्थ सांगण्याचा अधिकार नसल्याने , लिहिलेला वा वाचलेला अर्थ पटतोच असे नाही. अर्थ न समजल्याने वा न पटल्याने वाचनातील रस निघून जातो व ग्रंथ आपसूक बासनात जाऊन बसतो. याउप्परही कुणी ग्रंथ वाचलाच व अर्थही उमगला तरी त्यातील मते त्यांच्यावर झालेल्या संस्कारांना जुळत नसल्याने पटत नाहीत. मते पटली तरी ती आचरणात कशी आणावी हे उमजत नाही. अनेकांनी वाचन म्हणजे फक्त पारायणे केली. पण अर्थ उमजून घेण्याची इच्छाही नव्हती व पारायणाची मुदत पाळायची असल्याने पुरेसा वेळ नव्हता. या सगळ्या कारणांमुळे ज्ञानेश्वरी समजलीच नाही, अनेकांना अथक परीश्रमामुळे समजली पण उमजलीच नाही, व ज्यांना उमजली त्यांना स्वत:च्या धारणा दूर करता न आल्याने ती आचरणात आणता आली नाही. जो आनंद ख-या ज्ञानाने वा ख-या भक्तीने मिळावयास हवा होता तो मिळालाच नाही. व ग्रंथ जीवनात न उतरता बासनातच राहिला.
ज्ञानेश्वरी वाचनाची पूर्व तयारी
ज्ञानेश्वरी वाचन्याची पूर्वतयारी म्हणजे अगोदर ती वाचनास घेतल्यास तिचा अपमान होईल हा समज दूर सारणे. ज्ञानेश्वरी समजणार नाही हाही समज दूर करावा लागेल. मी स्नान केले नाही, मी मांस भक्षण करतो वगैरे सबबी दूर करा. मनाची पाटी कोरी करा. संकल्प करा की जे-जे ज्ञानेश्वर सांगतील ते ते समजून घेण्याचा प्रयत्न करीन, ज्याचा अर्थ लागणार नाही ते शब्द लिहून ठेवीन व त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीन. ओव्यांचा वाच्यार्थ लागताच त्यांवर मनन करून मी ज्ञानेश्वरांच्या लेखी असलेला अर्थ जाणून घेईन व त्याचा माझ्या जीवनाशी काय संबंध हा प्रश्न विचारीन. उदाहरणार्थ
जैसा भ्रमर भेदी कोडें| भलतैसें काष्ठ कोरडें| परि कळिकेमाजी सांपडे| कोंवळिये ||१-२०१||
आपल्या जीवनात अनेक प्रसंगी इच्छा असूनही मन दुखावणा-या जवळच्यांना आपण दुखवू शकत नाहीत. हीच प्रेमाची कोवळीक. हे ज्ञानेश्वरांनी किती सुंदर शब्दांत सांगितले आहे. अशा अनेक ओव्या आहेत ज्या सरळ आपल्या आयुष्याला भिडतात. मनात घर करतात. त्यांचा आपल्या जगण्याशी असलेला संबंध एकदा लक्षात आला की ज्ञानेश जीवैचे जिवलग बनतात. मग त्यांचा प्रत्येक शब्द मनात उतरू लागतो. आचारणात येतो.
ज्ञानेश्वरी वाचण्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणजे दृढ झालेले पूर्वग्रह दूर सारणे. जर मंदिरात वा देवळात देव नाही असे ज्ञानेश्वर म्हणत असतील तर आपल्या मनात दृढ झालेल्या मूर्ती-पूजेच्या श्रद्धाभावना दूर करता यायला हव्यात. जे जे विवेकसंमत असेल ते मान्य करण्याची तयारी हवी.
आणखी एक संकल्प करावयास हवा की जेंव्हा माझ्या मनात येईल तेंव्हा मी ज्ञानेश्वरी वाचेन. ती बासनात न बांधता सहज हाती लागेल अशा ठिकाणी ठेवेन. हाती लागताच ती उघडेन. जर क्रमाने वाचता आले तर उत्तमच पण वेळ कमी असेल तर जे दिसेल ते वाचेल.
एकदा वरीलप्रमाणे मनाची मशागत केलीत की ज्ञानेश्वरी वाचनास सुरुवात करा. पेन पेन्सिल हाती धरून अधोरेखित करण्यास वा समासामध्ये , ओळीच्या वरच्या वा खालच्या बाजूस अर्थ लिहिण्यासही कचरू नका. ज्ञानेशांची खरी पूजा आता तुम्ही सुरु केली आहे असे समजा.
ओवी-अनुभव
हा ज्ञानेश्वरी वाचनाचा प्रसादच आहे. जरी ज्ञानेश म्हणत असतील की फलाची अपेक्षा धरू नका तरी, ओवी वाचल्यानंतर तीचा अनुभव मिळेल याची अपेक्षा बाळगणे गैर नाही. जसे
एकां फळाभिलाषा न ठके| ते कर्मांते म्हणती बंधकें| जैसें आपण नग्न भांडकें| जगातें म्हणे ||१८-१३५||
ज्ञानेश्वरी वाचनाचा महाप्रसाद
ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे वागणे हीच खरी भक्ती. आपले दु:खी कष्टी, नतद्रष्ट, करंटे विचार ज्ञानेशांच्या विचारप्रवाहात धुवून आनंदी बनवता येतात. जग दु:खी नाहीये याचा साक्षात्कार होतो. आपल्याच विचारांमुळे आपण दु:खी आहोत हे जाणवते. मग हे विचार चपळाईने उलटे वळून आनंदाकडे धावतात. हाच तो ज्ञानेश्वरी वाचनाचा महाप्रसाद. तो आपणही चांखा व इतरांनाही द्या.
— श्री.राजेंद्र गंगाधर चौरे
अगदी मोजक्या शब्दांत सूचक पद्धतीने आपण केलेल्या मंडणीमुळे या ग्रंथाच्या वाचनास येणारे किंवा येवू घातलेले बरेच अडथळे आपण विषद करून त्यावर सोप्या भाषेत कळेल असे मार्ग सुचविल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
अगदी बरोबर सर!ज्ञानेश्वरीतील अमृतमय रसाळ भाषेचा आस्वाद व ज्ञान घेण्यापेक्षा तथाकथित भाविकांनी या ग्रंथाला कर्मकांडात अडकवले आहे! धन्यवाद आपण केलेल्या मार्गदर्शना बद्दल! आपण सांगितल्याप्रमाणे मी या ग्रंथाचे वाचन सुरु केले असून माउलींच्या या अमृतवाणीचा लाभ घेत आहे. पुनश्चः मनःपूर्वक धन्यवाद व प्रणाम!!