रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्या. त्यातील तरुण बकरय़ा त्यांच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्यांत व्यस्त दिसल्या. जीवन चक्रामधले जवळ जवळ सर्व उपक्रम त्या तन्मयतेने पूर्ण करीत असल्याचे जाणवले. त्याच बरोबर त्या मेंढपाळामुळे सर्वजण सुरक्षित असल्याची भावना देखील बाळगुन होते.
कोणता उद्देश असतो जीवन चक्राचा. काय योजना आहे त्या ईश्वराची वा निसर्गाची ? खरय़ा अर्थाने त्याची उकल आज पर्यंत निश्चीत व सर्वमान्य झालेली नाही. मानवाला बुद्धी, प्रगल्भता मिळालेली आहे. आपल्या विद्वतेच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या शिखरावर जाऊन तो अनेक तर्क-वितर्क, प्रमेये, प्रस्थापीत करतो. तो श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या मागे लागला आहे. त्याचा संघर्ष, अविश्वास, आणि नैसर्गिक चक्रामधला विरोध हा शेवटी त्याचेच जीवन अशांत होण्यातच घडत आहे. खाण्याची चिंता, पिण्याची चिंता, विश्रांतीची चिंता, सुरक्षिततेची चिंता, थोडक्यांत म्हणजे जगण्याचीच चिंता त्याने निर्माण केलेल्या आहेत. निसर्गाला हवे असते ते एक जीवन चक्र. जन्म, वाढ, पुनर्निमिती आणि मृत्युच्या छायेत जीवनाला निरोप. पुन्हा चालत राहते ते तसेच जीवन चक्र.
9004079850
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply