मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हा प्रामुख्याने मेंदूचा व स्पायनल कॉर्डचा तपास करण्यासाठी वापरला जातो. दमादियन आणि लॉटरवर्ग या शास्त्रज्ञांनी विद्युतचुंबकीय क्षेत्राचा वापर करुन, संगणकाच्या सहाय्याने शरीराच्या विविध भागांच्या उभ्या, आडव्या, तिरक्या अशा कोणत्याही अॅंगल्समध्ये प्रतिमा काढून प्रतिमा विच्छेदन शास्त्रच प्रगत केले (इमेजिंग सर्जरी). एवढीच नव्हे तर या शास्त्राची
प्रगती इथपर्यंत पोहोचली की इंद्रिये जशी आहेत तशीच हुबेहूब दिसू लागली; परंतु कृष्णधवलच. निदान करण्याची सूक्ष्मता सी.टी. स्कॅन पेक्षाही वाढली. यामध्ये हाडांची प्रत्यक्ष माहिती मिळवण्यासाठी मात्र सी.टी. स्कॅनच उजवा ठरला.या प्रगतीमुळे मेंदू व स्पायनल कॉर्ड व सांध्यांना होणारे सूक्ष्म रोगदेखील लवकरात लवकर समजू शकतात. याचा तपास तीन डॉयमेन्शनमध्ये होत असल्याने रुग्णांना चक्क टनेलमध्ये झोपवले जात असे व यामुळे रुग्ण घाबरत असत. याचा परिणाम म्हणजे हालचाल होऊन प्रतिमा बिघडते. परंतु आजकाल उघडी एम.आर.आय. मशिन्स उपलब्ध झाली आहेत; ज्यामध्ये बाहेर झोपवले जाते. मशिनच्या मॅग्नेटची जशी क्षमता असेल तशी प्रतिमा जास्त स्पष्ट येते. या तपासामध्ये लोहचुंबक (विद्युत चुंबक) वापरत असल्यामुळे रुग्णाने मोबाईल फोन्स, पैसे (नाणी) चाव्या, पट्टा इत्यादी धातूंचे ऐवज जवळ ठेवू नयेत.या तपासात इंद्रियांची अजून सखोल माहिती मिळवण्याकरता कॉंट्रास्ट औषध इंजेक्ट करत असले तरीही उपाशीपोटी जाण्याची जरुरी नसते. या शास्त्रात रक्तवाहिन्यांचा अभ्यास कॉंट्रास्ट इंजेक्शन न देता देखील करता येतो.रोगाचे अचूक निदान करण्यासाठी रोगाची केमिस्ट्री समजली तर हे सहज शक्य आहे. व एम.आर. स्पेक्ट्रोस्कोपी या तंत्रज्ञानामुळे रुग्णाला नक्की कोणता रोग झाला आहे व तो किती उग्र आहे हे ओळखण्यास सुरुवात झाली आह व हे शास्त्र जसजसे जास्त प्रगत होईल तसतसे ते अचूक निदानाला वरदान ठरत जाईल. यकृतामधून वाहणार्या पित्तनलिका व स्वादुग्रंथीतील नलिका यांचा विनाअंतर प्रवेश (नॉनइनव्हेजिव) अभ्यास एम.आर. सी.पी. करुन इ.आर.सी.पी. मुळे होणारे सर्व धोके संपुष्टात आणले आहेत.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply