अजून एका तरुण जो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याकरिता इराककडे जाण्याच्या वाटेवर होता, त्याला आपल्या गुप्तहेर संस्थांनी हैद्राबाद विमानतळावर रोखले. कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये जाण्याकरिता पळून गेले होते. त्यामधला एक तरुणाने २६ जानेवारीला स्फ़ोटक भरलेल्या कारने भारतात अमेरिकन राष्ट्रपतींवर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली. हे सगळे ऑनलाईन जिहादला बळी पडले होते. त्यामुळे इंटरनेटवर किंवा ऑनलाईन जिहादचा प्रसार कसा केला जातो, त्याला तरुण कसे बळी पडत आहेत हे शोधणे महत्त्वाचे आहे. ताज्या अंदाजाप्रमाणे भारतात हजारो युवक आपल्या घरातून गायब झालेले आहेत. त्यामधले दोन टक्के युवक जरी जिहादी प्रचाराला बळी पडून गेले असतील तरीही हा धोका खूप आहे.
युवकांना ऑनलाईन जिहाद विषयी एवढे आकर्षण का वाटते?.
भारतीय सैन्याने केलेल्या अभ्यासाने युवक दहशतवादी का होतात याची काही कारणे शोधून काढली. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि उग्रवाद पसरवणार्या अनेक भारतीय संस्था दहशतवादी संघटनांना मनुष्य भरती करण्याकरिता मदत करतात. याकरिता अनेक युवकांचा बुद्धीभ्रंश केला जातो. एकदा बुद्धीभ्रंश झाला की त्यानंतर प्रेरणात्मक प्रशिक्षण दिले जाते. यानंतर त्यांना एका मोठ्या दहशतवादी संघटनांमध्ये ट्रेनिंगसाठी इराण, अफगाणिस्तान, सिरिया किंवा पाकिस्तानमध्ये पाठवले जाते. सुरुवातीला त्यांना दहशतवाद्यांची प्रशासकीय कामे दिली जातात. त्यानंतर जर लक्षात आले की हा युवक एक चांगला दहशतवादी बनू शकतो तरच त्याला बॉम्ब स्फोट करणे, आत्मघातकी हल्ला करणे अशी कामे दिली जातात.
दहशतवादी होण्या मागची कारणे
४० ते ४५ टक्के युवकांना बळजबरीने दहशतवादी संघटनेत पाठवले जाते.३० ते ३५ टक्के युवक आर्थिक कारणामुळे दहशतवादाचा रस्ता पकडतात. दहशतवादी संघटनेत सामील झाले की त्यांना खूप पैसे मिळतात. एखादी नोकरी केल्यासारखा त्यांना पगार दिला जातो. एखादे मोठे दहशतवादी काम केले तर त्यांना अजून जास्त पैसा मिळतो. ३० ते ३५ टक्के लोक धार्मिक कारणामुळे दहशतवादी बनतात. जर आपण युवकांना काम देवू शकलो तर अनेकांना आपण दहशतवादाकडे जाण्यापासून रोखू शकू.
ऑनलाईन/ इंटरनेटवर दुषप्रचार थांबवा
सध्या ऑनलाईन किंवा इंटरनेटवर प्रचंड प्रमाणामध्ये दुषप्रचार सुरु आहे. यात त्यांच्या धर्मावर किती अन्याय, कसा हल्ला केलेला आहे हे दाखवले जाते. म्हणून अशा प्रकारच्या होणार्या दुषप्रचाराला इंटरनेटवरच प्रत्युत्तर देण्याची गरज आहे.
अनेक वेबसाईटस्, ब्लॉग्ज् स्पॉटस्, ट्विटर अकौंटस्, ईमेल आणि एसएमएसने अशा प्रकारचा दुषप्रचार केला जातो. म्हणून अशा सगळ्या दुषप्रसार करणार्या इंटरनेटवरील साधनांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. यांना गुगल व इंटरनेट कंपन्यांची मदत घेऊन थांबवणे आवश्यक आहे. बहुतेक दहशतवाद्यांच्या मनावर तात्पुरता अतिरेकी विचाराचा प्रभाव झालेला असतो. अनेकांना आयुष्यामध्ये फारसे यश मिळालेले नसते, म्हणून बंदूकीच्या बळावर त्यांना समाजामध्ये मिळालेले स्थान त्यांना महत्त्वाचे असते. बहुतेक युवक हे २० ते ३० वयामधले असतात, लग्न झालेले नसते. काही तरी कारणावरुन त्यांच्या कुटुंबाशी असलेला संबंध हा कमी कमी होत असतो.
आपण जर अशा युवकांकडे लक्ष ठेवले, आर्थिक उपाय, मानसिक उपाय केले, त्यांच्या मनाच्या विचारसरणीमध्ये जर बदल करुन आणता आला, तर दहशतवादाकडे जाणार्या युवकांवर घात करणारे घटक आपण नक्कीच कमी करु शकतो. याकरिता गरज आहे ती आर्थिक आणि मानसिक लढाई जिंकण्याची. दहशतवादाचे स्वरुप हे कायम बदलत असते. यामुळे त्यावरिल उपाय योजना सक्षम, तत्पर आणि परिस्थिती अनुरुप पाहिजे. आपल्याला दहशतवादाचा प्रसार करणार्या यंत्रणांच्या एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे.
सरकारने उग्रवादाचा प्रतिकार कसा करावा
डिसेंबरमध्ये राज्याच्या डीजीपींची केंद्रीय गृहमंत्र्यांशी झालेल्या मीटींगमध्ये ऑनलाईन जिहादवर विचार करण्यात आला आणि दुषप्रचार थांबवण्याकरिता एक अॅक्शन प्लॅन करण्याकरिता सांगण्यात आले. इंटरनेटची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे एक संस्था त्यावर लक्ष ठेवू शकत नाही. गरज आहे की या सगळ्या संस्थांशिवाय इतर देशप्रेमी, देशभक्त नागरिकांचा सुद्धा आपण लक्ष ठेवण्याकरिता वापर केला पाहिजे. कारण आज भारतामध्येच जवळजवळ २० कोटींहून जास्त नागरिक इंटरनेटचा वापर करत आहेत. फेसबूक आणि इतर सोशल मीडियामध्ये असलेल्या युवकांची संख्या सुद्धा प्रचंड आहे. म्हणून एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करून जे अशा प्रकारे चॅटिंग इंटरनेटवर चालते त्याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज युटयूबवर भडकवण्याकरिता अनेक व्हिडीओज अपलोड केले जातात. अशा प्रकारचे व्हिडिओज, अशा प्रकारची चुकीची माहिती देणारे लेख लगेच इंटरनेटवरुन ब्लॉक करायला पाहिजे. देशद्रोही व्हिडीओज, फ़ोटो, लेख अपलोड करणार्यांना शिक्षा दिली पाहीजे.
युवकांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन चक्रव्यूह
आज अनेक संस्था ऑनलाईन रिक्रूट झालेल्या युवकांना भारताच्या आतच अतिरेकी बनवण्याचा प्रयत्न करतात. काही संस्था/ धर्म शिक्षक, अशा प्रकारचे प्रशिक्षण या युवकांना भारतामध्येच देतात. आज परदेशामधून खास तर सौदी अरेबियामधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा अतिरेकीवाद पसरवण्याकरिता भारतामध्ये येत आहे. ते थांबवले पाहिजे. भारतामधील काही धार्मिक स्थळेपण अशा प्रकारचा अतिरेकी वाद वाढण्याकरिता पैसे खर्च करतात. म्हणून प्रचंड उत्पन्न असलेल्या धार्मिक स्थानावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अनेक श्रीमंत व्यापारी आपल्या उत्पन्नातील काही पैसा अतिरेकीवाद वाढवण्याकरिता खर्च करतात. कल्याण मधल्या युवकांना इराकमध्ये पाठवण्यामध्ये तिथल्या काही व्यापार्याचा हात होता. त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवून त्यांना पकडणे महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियामध्ये ऑनलाईन चॉट करण्याकरिता अनेक वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. गरज आहे ती अशा प्रकारच्या प्रचारावर लक्ष ठेवण्याची. गृहमंत्रालयाने ‘ऑपरेशन चक्रव्यूह नावाचे एक नविन ऑपरेशन सध्या इंटरनेटवर सुरु केलेले आहे. याचा उद्देश आहे की अशा प्रकारच्या युवकांवर लक्ष ठेवणे.
इतर देशांकडून मदत घेणे जरुरी
युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या युवकांवर लक्ष ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या अनुभवाचा वापर करुन आपण पटकन पुढे जायला पाहिजे. अनेक ऊपाय या देशांकडून शिकता येतील. एखादा युवक जर ऑनलाईन जिहादामध्ये पकडला गेला तर लगेच त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येते. दुर्दैवाने त्यांची संख्या हजारोंची असल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठिण आहे. अशा वेळी गरज असते ती त्याच्या कुंटबाला, त्याच्या नातेवाईकांना त्याच्यावर नजर ठेवण्याची. कारण २४ तास कुठल्याही युवकावर गुप्तहेर संस्था ही लक्ष ठेवू शकत नाही.
कौसींलिग सेंटर उभारण्याची गरज
युरोपमध्ये याला सांस्कृतिक दहशतवाद असे म्हटले जाते. ज्यावेळी आपल्याला आपल्या धर्माविषयी जास्त प्रेम निर्माण होते, केवळ आपण आपल्याच धर्माचा प्रचार करायला लागतो आणि ज्यावेळेस आपण इतरांच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस आपले आणि इतर समाजामधल्या घटकांमधले सांस्कृतिक अंतर वाढत जाते.
अशा प्रकारे उग्रवादाकडे झुकणार्या युवकांकरता देशामध्ये कौसींलिग सेंटर तयार करायला पाहिजे. जसे आपण आफू, गांजा, चरस किंवा दारु पिणार्या युवकांकरिता तयार केलेले आहे. यामध्ये अशा युवकांना एक्सपर्टकडून त्यांच्या मनामध्ये झालेल्या अतिरेकी विचारांना थांबवण्याकरिता मदत करता येईल. जास्त महत्त्वाचे हे आहे की सगळ्याच युवकांवर हा धोका किती भयंकर आहे याविषयी ज्ञान पुढे पसरवण्याची गरज आहे. सर्वसमावेशक उपाय करुन वैचारिक दहशतवादाला रोखले पाहिजे. दहशतवाद रोखण्यासाठी सर्वसमावेशक उपायावर लवकर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. या कट्टरवादाचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाला आक्रमक आणि सक्रिय भूमिका वापरावी लागेल.
Leave a Reply