कसोटी इतिहासात आजवर फक्त एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशांकडून शतके काढण्याचा आणि १,००० धावा जमविण्याचा पराक्रम केला आहे. १४ सप्टेंबर १९५७ रोजी ब्लोमफौंटनमध्ये केप्लर वेसल्सचा जन्म झाला. त्याचे कुटुंब नंतर ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले. ऑस्ट्रेलियातर्फे खेळलेल्या पहिल्या डावातच त्याने ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्ध १६२ धावा ठोकल्या. रोमहर्षक गोष्ट म्हणजे
१९९४ मध्ये मायभू दक्षिण आफ्रिकेसाठी खेळलेल्या पहिल्या डावातच (आणि तेही इंग्लंडविरुद्धच) त्याने शतक ठोकले – लॉर्डसवर १०५. ऑस्ट्रेलियाकडून २४ कसोट्या खेळून झाल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार झाला. दोन वेगवेगळ्या देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा वेसल्स या अशा प्रकारे पहिलाच खेळाडू ठरला. ब्रिजटाऊनमध्ये १९९१-९२ मध्ये आफ्रिका पुनरागमनाचा सामना खेळली तेव्हाही केप्लरच कर्णधार होता. त्याची इतर ४ कसोटी शतके वेगवेगळ्या देशांविरुद्ध निघाली. डावखुरा सलामीवीर ही केप्लरची सघातील भूमिका होती. दक्षिण आफ्रिकेतील ऑरेंज फ्री स्टेट, वेस्टर्न प्रॉविन्स, नदर्न ट्रान्स्वाल, ईस्टर्न प्रॉविन्स आणि वेस्ट ग्रिकालालँड; ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड आणि इंग्लंडमधील ससेक्स या संघांकडून वेसल्स प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. इंप्रिलीमधील चेन्नई सुपर किंग्ज या चमूचा पहिला प्रशिक्षक केप्लर वेसल्सच होता.
वेस्ट इंडिजमध्ये जन्मून भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या रामनारायण सिंग-पुत्राचा जन्म १४ सप्टेंबर १९६३ रोजी त्रिनिदाद बेटांवर झाला. रबींद्र हे त्याचे अधिकृत वापरासाठीचे नाव पण ‘रॉबिन सिंग’ या नावानेच तो सुपरिचित आहे. कसोटी त्याला मानवली नाही. एकदिवसीय पदार्पणानंतर तब्बल ७ वर्षांनी त्याचे कसोटी पदार्पण झाले. कसोट्यांपेक्षा १३५ एकदिवसीय सामने तो अधिक खेळला. एकूण १३६ एदिसांमधून त्याला एकदाच ‘तीनाकडी’ गाठता आली. नेमक्या १०० धावा – प्रतिस्पर्धी श्रीलंकेचा डाव पावसाने गिळला त्या सामन्यात. दुसर्या दिवशी सामना नव्याने खेळविला गेला. पट्ट्यावरचे धावणे (रनिंग बिटवीन द विकेट्स) आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही बाबींमध्ये त्याच्या बहुतेक सर्व भारतीय समकालीनांपेक्षा कैक पटींनी तो सरस होता. अजय जडेजासोबतच्या
मध्यम फळीतील त्याच्या काही भागीदार्या लक्षात राहण्याजोग्या झाल्या आहेत. पुढे सरसावत कव्हर्समधून मारलेले षटकार ही त्याची खासियत होती. निवृत्तीनंतर काही काळ तो हॉंगकॉंग क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आणि मग भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक होता. आता तो मुंबई इंडियन्स चमूचा प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply