16 जानेवारी 1926 !
लाहोरमधील एका कसब्यात मदन गोपाल नय्यर यांच्या घरात एक पुत्र जन्माला आला. परंतु बाळाचा जन्म झाल्यावर काही क्षणातच घरातले पेट्रोमॅक्सचे तिन्ही दिवे अचानक विझले . सर्वांना हा मोठा अपशकून वाटला . बाळाच्या वडीलांनी तडक एका ज्योतिषाला गाठलं . पण ज्योतिषी म्हणाला की पत्रिका तर चांगली वाटते , दोष असा काही नाही . आणि त्याचं भविष्य खोटं ठरलं नाही . ज्याच्या जन्माच्या वेळेस घरात अंधार झाला त्यानं मोठेपणी आपल्या प्रतिभेच्या ‘तेजानं’ हिंदी चित्रपट संगीताचा चेहरा ‘उजळून’ टाकला . असंख्य गाण्यांना आपल्या सृजनशीलतेनं प्रकाशमान करणारा हा संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर !
योगायोग हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता . 19 मे 1951. ओपी आपल्या नववधू – सरोज मोहिनी बरोबर सप्तपदीचे फेरे घेत होता – अमृतसरमधे ! आणि त्यावेळी त्याला कल्पना देखील नव्हती की त्याचा एक मित्र S N Bhatia हा दलसुख पंचोली बरोबर वाटाघाटी करत होता – ओपीला पहिला पिक्चर मिळवून देण्यासाठी ! लग्न लागलं . जेमतेम जेवणं झाली . तेवढ्यात तार आली .
Start immediately for Delhi, Pancholi offers film – SN Bhatia.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ओपी थेट दिल्लीत ! स्टेशन वरुन पंचोली च्या ऑफिसमध्ये ! तिथे पंचोलीने ओपीला करारबध्द केलं – आसमान च्या संगीतासाठी!
ओपीचा पहिला पिक्चर !
लागोपाठच्या 3 सुपरफ्लाॅप पिक्चर नंतर मुंबईतून गाशा गुंडाळून ओपी अमृतसरमधे परतणार होता पण आधीच्या पिक्चरचे 3000 रुपये गुरुदत्त कडून यायचे होते . ओपी पैसे मागायला गुरुदत्तकडे गेला तर ‘ माझं आत्ताच लग्न झालयं, माझ्याकडे पैसे नाहीत ‘ असं सांगून गुरुदत्तनं त्याला दारातूनच परत पाठवलं. ओपी जाम भडकला . यावेळी त्याच्या मदतीला आला – K K Kapoor – जुना मित्र आणि एक मोठा चित्रपट वितरक! तो गुरुकडे गेला . तेव्हा गुरु म्हणाला की मीच कर्जबाजारी आहे . कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्ज घेऊन नवीन पिक्चर काढणार आहे . त्याचं संगीत देतो ओपीला . कपूरनं जागच्या जागी या नाव सुद्धा न ठरलेल्या पिक्चर चे हक्क विकत घेतले त्यापोटी गुरूला 3000 रुपये दिले . त्यातले 1500 गुरुने ओपीला दिले . चित्रपट होता आरपार ! सर्व गाणी सुपरहिट झाली ! ज्या दिवशी ‘ बाबूजी धीरे चलना ‘ या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं त्याच दिवशी ओपीला दुसरी मुलगी झाली . या पिक्चरनं ओपीचा पोटापाण्याचा – उदरभरणाचा प्रश्न कायमचाच सोडवला म्हणून त्यानं या मुलीचं नाव अन्नपूर्णा ठेवलं .
— संकलन : धनंजय कुरणे
9325290079
Leave a Reply