नवीन लेखन...

औचित्य जागतिक महिला दिनाचे !

 

|| हरी ॐ ||

८ मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे १९४३ रोजी पहिल्यांदा साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया`बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा व्हायला लागला आहे. हे ही नसे थोडके…! जागतिक महिला दिनाच्या सर्व स्त्रियांना हार्दिक शुभेच्छा..!! दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा होतो पण त्याची पार्श्वभूमी माहित नसते त्या बद्दल थोडेसे :-

अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे ज्वलंत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवादी यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे करण्यात आली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पारित झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

महिलांच्या परिस्थितीत बदल होऊ लागला आहे हे सध्या अनेक वाहिन्यांवरून सुरू असलेल्या मालिकांचे विषय बघता जाणवते. तेव्हा त्या काळातली महिलांची अवस्था आणि आजची अवस्था यातील फरक प्रकर्षाने नजरे समोर तरळतो. त्या काळात महिलांनी शिक्षण घेणे एवढेच नव्हे तर घराच्या बाहेर पडणे हे सुद्धा पाप समजले जात होते. पुरुषाचे समाजावर मोठे वर्चस्व होते. त्या अवस्थेत एखाद्या महिलेने शिक्षणाचा आग्रह धरणे आणि पुरुष करतात ती कामे करणे हे मोठे दिव्यच होते. अशा अवस्थेतही अनेक महिलांनी आणि त्यांना प्रोत्साहन देणार्याह पुरुषांनी धाडसाने स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडला. लोकांनी त्यांचा छळ केला, त्यांना वाळीत टाकले. अनेकांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा संकटासमोर न डगमगता या समाज सुधारकांनी आपले काम हिरीहीरीने पुढे चालूच ठेवले याचे चांगले फळ आपणास दिसत आहे.

विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत आणि चांगले शिक्षण घेत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर काही क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. काही शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या आणि मुलींच्या प्रगतीचा तुलनात्मक विचार केला तर मुली मुलांपेक्षा आघाडीवर असल्याचे दिसून येते. शंभर दीडशे वर्षापूर्वींची स्थिती आज राहिलेली नाही. नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. परंतु नवरा नोकरीशिवाय काहीच करत नाही. बायको मात्र नोकरीही करते आणि घरची कामेही करते. तिला स्वातंत्र्य दिल्याचा आव आणणारा तिचा नवरा आपली बायको नोकरी करत आहे, तेव्हा आपण तिच्याबरोबर स्वयपाकही केला पाहिजे असे चुकून सुद्धा म्हणत नाही. स्वयपाक तर लांबच राहिला, परंतु घरकामात मदत करणे एवढे साधे काम सुद्धा तो टाळतो. असे एखादे घरचे काम केले तर आपल्या मर्दपणाला बाधा येईल, अशी भीती त्याला वाटत असते. म्हणजे बायकोला नोकरीवर सोडणारा नवरा समानतेचा विचार करून पत्नीला स्वातंत्र्य देत नसतो, तर घरात डबल उत्पन्न यावे म्हणून देत असतो असे म्हंटले तर वावगे होणार नाही. परंतु गरजा आणि महागाई वाढल्याने डबल इंजिनची आवश्यकता आहे हे मात्र मान्य करावे लागेल.

सद्य परिस्थिती केवळ कॉमन माणसांत आहे अ्यातला भाग नाही तर उच्च अहर्ता प्राप्त घरात सुद्धा अशीच अवस्था आहे. स्त्रीला समाजात स्त्रीम्हणून एक वेगळे स्थान, मानसन्मान, आब, ज्ञाय, आदर जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत तिची अशीच परिस्थिती राहणार. ती घराबाहेर सुरक्षित नाही. तिच्या असुरक्षिततेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर तर बौद्धिक उलथापालथ झाली. देशभर या संबंधाने जागृती निर्माण झाल्याचा भास निर्माण केला गेला. परंतु पूर्ण शांतता होताच पुन्हा एकदा समाजात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढायला लागली आहेत. समाज जागृत झाला, कायदा कडक झाला, पोलीस सजग झाले पण तरी सुद्धा महिला अजून असुरक्षितच आहेत. कारण हा प्रश्न काही हीन पातळीच्या मनोवृत्तीतून निर्माण झाला आहे. जोपर्यंत मनोवृत्तीत आणि इच्छाशक्तीत सकारात्मक आणि प्रामाणिक बदल घडत नाही, तोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाहीत. स्त्रियांना समता आणि स्वातंत्र्य पाहिजे असेल तर पुरुषांच्या वर्चस्वाचा अहंगंड कमी झाला पाहिजे. परंतु तो कमी होत नाही. महिला दिन पाळला जातो, चर्चा होतात, परिसंवाद होतात आता तर महिला दिनाला कर्तबगार महिलांचा सत्कार केला जातो. परंतु भविष्यात महिलांना समानतेने वागणूक दिली जाईल का नाही ते काळच ठरवेल. परंतु महिलांनी सजग राहणे आजच्या कळतात खूप खूप गरजेचे आहे.

जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..