मी खोकल्यावरील गोळ्या घेण्यासाठी एका औषधाच्या दुकानात गेलो. दुकानदाराला म्हणालो मला 2 गोळ्या दे ! त्याने मला 5 गोळ्यांच पाकीट दिल आणि पैसे सुट्टे नसल्याच कारण पुढे केलं. मी त्या गोळ्या घेणच नाकारल आणि निघून आलो. मला दोन गोळ्यांची गरज असताना मी पाच गोळ्या विकत घ्याव्याच का ? प्रत्येक वेळी पैसे सुट्टे नाहीत म्हणून ग्राहकांच्या माथी अधिक औषध मारण्याचा हा डाव नसेल कशावरून ? त्याच्याही काही दिवस अगोदर मी मला दोनच गोळ्याची गरज असताना मला गोळ्यांच अख्ख पाकीट विकत घ्याव लागलं होत. अर्ध पाकीट ही द्यायला त्याच औषध विक्रेत्याने नकार दिला होता. त्याचा आजुबाजुच्या दुकानातही तिच परीस्थिती असल्यामुळे मला गरज नसताना अख्ख पाकीट विकत घ्यायला लागलं होतं. एखादा गरीब माणूस आजारी पडला आणि त्याक्षणी त्याच्याकडे एक- दोन गोळ्या विकत घेऊ शकेल इतकेच पैसे असतील तर त्याने गोळ्यांचं अख्ख पाकीट घेण्याइतके पैसे त्याच्याजवळ येण्याची वाट पाहत बसायचं का ? बाकीच्या जीवन आवश्यक वस्तू जशा नगात मिळतात तशा औषधाच्या गोळ्या का मिळ्त नाहीत. मुळात आवशक्यता नसताना डॉक्टर इतक्या भरमसाठ गोळ्या लिहुनच का देतात ? याला काही डॉक्टर आणि औषध विक्रेते अपवाद आहेत. पण ! ते मोजकेच आहेत. औषधाच्या दुकानातून औषधाची एक गोळीही विकत घेण्याची मुभा ग्राहकाला असायला हवी ! तरच गरीबांचे जीव वाचतील नाहीतर औषधांच्या वाढत्या किंमतीच्या ओझ्याखाली चिरडून गरीबांचा जीव जाईल. एका गोळीची गरज असताना जर गोळ्यांची पाकीटं ग्राहकांच्या माथी मारली जात असतील तर दिवसाला किती लाख रूपयांची औषधं वाया जात असतील याचा आपण कधी विचार करणार आहोत का ? एखाद दिवस अन्न मिळालं नाही तर माणूस जगू शकेल पण ! औषध वेळेवर मिळालं नाही तर माणूस जगू शकेल का ? अन्न वस्त्र निवारा जशा माणसाच्या मुलभूत गरजा आहेत तशी आजच्या जगात औषध ही मुलभूत गरज होऊ पाहत आहे. कधी – कधी औषधाची एक गोळीही एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकते हे आपल्या कधी लक्षात येणार आहे ? की गरीबांना औषध घेण्याचा अधिकार नाही असं आपण ठरवूनच टाकलंय !
— निलेश बामणे
Leave a Reply