ही समस्या बहुधा सर्वांनांच कधी ना कधी जाणवते. घरात एखादी जड वस्तू उचलल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उभे राहिल्यास, कमरेस हिसका बसल्यास कमरेवर ताण पडून लचक भरण्याची शक्यता असते. यामध्ये कंबरेमध्ये प्रचंड वेदना होतात. कंबर लचकणे हे दोन-तीन वेगळ्या प्रकारचे असू शकते. काही वेळा कंबरेभोवतीचे स्नायू थोडेसे फाकतात किंवा लिगामेंट दुखावून फाटू शकतात. तर काही वेळा कंबरेच्या चकतीची हालचाल होऊन तिला सूज येण्याची शक्यता असते. यामुळे होणार्यान वेदना हे व्यक्तीचे वय, तिचे वजन, तिने कोणत्या प्रकारचे वजन उचलले आहे, त्या व्यक्तीला आधीपासूनच काही कंबरेचा त्रास आहे का इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. कुठल्याही प्रकारे कंबरेमध्ये लचक भरल्यास सर्वप्रथम झोपावे आणि मांडीखाली उशी घ्यावी. यामुळे थोडासा आराम मिळतो. तसेच मज्जारज्जूवरील ताण कमी होतो. कुशीवर झोपायचे असल्यास दोन्ही गुडघ्यांमध्ये उशी ठेवावी. त्यामुळेसुद्धा मज्जारज्जूंवरील ताण कमी होतो. आपल्याला चालते आणि सहज मिळते, असे एखादे वेदनाशामक औषध घ्यावे. अर्थात औषध अधिक प्रमाणात घेऊ नये. कंबर लचकल्यानंतर पायात मुंग्या येत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही योग्य ठरते. या मुंग्या पायाच्या पुढच्या आणि बाहेरच्या बाजूस पावलांपर्यंत येत असतील किंवा पायातील ताकद कमी झाल्यासारखे वाटत असेल, पायाचा अंगठा उचलता येत नसेल तर मात्र तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संजय गायकवाड
Leave a Reply