साहित्य:
कटाचे पाणी (पुरणपोळी बनवताना डाळ शिजवल्यानंतर डाळीमधले पाणी गाळून घ्यावे. हे पाणी म्हणजे कटाचे पाणी)
१ उभा चिरलेला मोठा कांदा
१/४ कप – किसलेले सुके खोबरे
५ मध्यम पाकळ्या लसूण
दीड इंच आले
१ टीस्पून धणेपूड
२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून जिरे
कढीपत्ता
१ तमालपत्र
चवीनुसार मीठ
गरजेनुसार तेल
कृती:
प्रथम उभा चिरलेला कांदा थोड्या तेलात तपकिरी रंग येईस्तोवर भाजून घ्यावा. तसेच सुके खोबरेही हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. जास्त जाळून नये. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा, खोबरे, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, जिरे, आले-लसणाची पेस्ट घालून थोडे पाणी घालून मिक्सरमधून बारिक करुन पेस्ट करुन घ्यावी. अशा प्रकारे कटाचा मसाला तयार होतो.
आता एका कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाले की त्यात तमालपत्र व कढीपत्ता घालावे. त्यानंतर कटाचा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत साधारण ८ ते १० मिनिटे परतून घ्यावा. यात कटाचे पाणी घालावे व मसाल्यात एकजीव करुन घ्यावे. अंदाजानुसार आणि गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालावे. मध्यम आचेवर साधारण १० ते १२ मिनिटे आमटीला उकळू द्यावे. त्यानंतर आच बंद करुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम कटाची आमटी, पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी. हवे असल्यास व आवडत असल्यास या आमटीत आपण चिंच-गुळही घालू शकतो.
— सौ.भारती मुजुमदार
Leave a Reply