या कफाला शत्रूप्रमाणे वागवावे. अजिबात दयामाया नको. जरा ढील मिळाली की, काही खरं नाही. डोक्यावर बसलाच म्हणून समजा.
याचा अत्यंत आवडता अवयव म्हणजे जीभ. खाण्याची एकही संधी अजिबात सोडणार नाही. चवीनं खाणार, पण त्याचा गाजावाजा नाही करणार. वात एवढुंस खाईल आणि आव आणेल हे एवऽढं खाल्याचा ! पण कफाचे याच्या नेमके ऊलटे. खाईल हेऽऽ एवढं, आणि सांगेल, खाणारा, तो मी नव्हेच !
म्हणून वारंवार उपवास करण्याची शिक्षा या कफाला करावी लागते. पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नको, असं निक्षून सांगावं लागतं. पण आपलं याचं चालूच, कळतंय पण वळत नाय. एकदा खायला सुरवात केली की थांबायची बात नाय, साधा भूकेचा अंदाजसुद्धा याला घेता येत नाय.
आणि म्हणून जातो फुगत, जातात पोटावर टायर वाढत !
आपण खाणार आणि डाक्टर च्या औषधाला गुण नाय म्हणून ओरडणार.
याला पथ्य युक्तीनेच सांगावे लागते. लाह्या, काॅर्नफ्लेक्स, फुलवलेले पोहे, राजगीरा, चुरमुरे. त्यावर थोडेसे जिरेपूड, काळे मीठ घालून खा, असे सांगावे लागते. दिसायला भरपूर, पण मुळात ऐवज कमी असे, भाजून फुलवलेले धान्य ! बस खात किती ते.
याच्यासाठी पाणी कमी, तेल कच्चेच चांगले, तिखट झणझणीत खाल्ले तर अधिक चांगले. पाणी गरम प्यायला आवडणार नाही, पण तेच द्यावे.
मुख्य म्हणजे याला खाल्ल्यावर झोपायला अजिबात द्यायचे नाही. नाहीतर मग आणखीनच फुगला म्हणून समजा. आधीच झोप प्रिय असलेला, खाल्याजेवल्यावर कुठेतरी टेकायला, झोपायला मिळते का, हे पहाणारा. याच क्षणाला सांभाळले की, झाले. नाहीतर मधुमेहाचा सख्खा सखा कधी होईल हे कळणार देखील नाही.
वाताचा सख्खा भाऊ असून देखील, वागणे मात्र वाताच्या अगदी ऊलटे.
पण दया नको माया नको, भरपूर घाम येईपर्यंत कामाला लावायचे, घाम आला की पंखे बंद करायचा, आंघोळ झाल्यावर तर पांघरूण घेऊन बसायचे, पोहोणे, धावणे, पळणे, कष्टाची कामे करणे, दंड, जोर बैठका, लोटांगण, सूर्यनमस्कार, जाॅगिंग हे सर्व झाल्याशिवाय तुला नाश्ता काय पाणी सुद्धा मिळणार नाही, असे काळजावर दगड ठेवून सांगावे लागते.
मुळात स्नेहाची आवड असल्याने, थोडेसे गोड बोलून, बेमालूमपणे आपले काम करून घेणार्या या उस्तादाला कुस्ती खेळून नमवावेच लागते.
याला कसली चिंता, कधीच नसते. नवीन (सकारात्मक ) चिंता निर्माण करून दिली तरच हा आटोक्यात रहातो. बरं हे सगळं तो प्राकृत असतानाच करायचे. एकदा विकृत झाला की म पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत औषधेच घ्यावी लागतात.
पण याला आयुर्वेदात उत्तरे मिळतात बरं का….
शोधलं की सगळं सापडतं…!
— डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
Leave a Reply