उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य डोक्यावर आला होता. एक वाटसरू आपल्या गांवाकडे चालला होता. दमलेल्या, थकलेल्या त्या वाटसरूची नजर एका डेरेदार आंब्याच्या झाडाकडे गेली. त्या झाडाची जमिनीवर चांगली सावली पडली होती. झाडाखाली थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून तो झाडाखाली
आडवा झाला. थोड्या वेळातच त्याला झोप लागली. त्या झाडावर एक कोकिळा रहात होती. ती परोपकारी होती. वाटसरूच्या तोंडावर ऊन यायला लागले हे पाहून त्या वाटसरूला सावली कशी मिळेल याचा ती विचार करू लागली. तिला एक कल्पना सुचली. आपले पंख पसरून तिने वाटसरूवर सावली धरली. पण एका दुष्ट कावळ्याला हे पहावलं नाही. कोकिळेला त्रास व्हावा या उद्देशाने त्याने तोंडात धरून आणलेला हाडाचा तुकडा त्या वाटसरूच्या तोंडावर टाकला आणि स्वत त्या झाडाच्या वरच्या शेंड्यावर जाऊन कोकिळेची होणारी फजिती बघत बसला. हाडाचा तुकडा तोंडावर पडताच वाटसरू जागा झाला. त्याने वर पाहिले त्याला कोकिळा दिसली. संतापून त्याने बाजूला पडलेला दगड उचलला आणि जोराने कोकिळेच्या दिशेने फेकला. दगड इतका जोरात गेला की कोकिळेवरचा नेम चुकून तो वरच्या फांदीवर बसलेल्या कावळ्याला लागला आणि तात्काळ त्याचा मृत्यू ओढवला.
— चतुर
Leave a Reply