गेल्या काही दिवसापासून मला करोडो रुपयाची संपत्ती मिळण्याचे डोहाळे लागले आहेत, कोरड्या उलट्या सारख्या येतात. कारण?
1. मला राजस्थान वरून सतत फोन येतो, हमारे पास हमारे पूर्वज्योंका सोना मिला है, जो हमे आधे दाम में बेचना है। आप जोधपूर आकर देख लो, और पसंद आये तो डील पक्का करेंगे. राजस्थान मध्ये याला कोणी मिळत नाही का हे विकण्यासाठी, हा प्रश्न मला नेहेमी सतावत रहातो.
2 आजकाल कोणत्यातरी आफ्रिकेतील देशातील बॉब, जॉन, वगैरे माणसाचा sms दर दोन दिवसांनी येतो. 34 ट्रिलियन डॉलर्स माझ्या खात्यात जमा करण्यासाठी आतुर झाला आहे. कारण माहित नाही. माझा फोन नंबर त्याला कसा मिळाला, हे न उलगडणारे कोडे आहे.
3. युरोपियन बँकेतील मॅनेजर मला इमेल पाठवत राहतो, अभिनंदन या वाक्याने सुरुवात होते, कोणत्या तरी अनामिक माणसाचे 100 कोटी त्यांच्या बँकेत पडून आहेत, त्यातील 20 कोटी युरो, मला ते देऊ इच्छित आहेत, तरी लवकरात लवकर दिलेल्या फोन वर संपर्क साधणे.
4. लहानपणी 9 अंकांची कोडी सोडवा लाखोंची बक्षिसे मिळवा, असे पेपरमध्ये लिहून येत असे, पहिले बक्षीस कार, दुसरे 2 इन 1 रेडिओ. पहिले बक्षीस कधीच लागत नसे. नेहेमी 2इन1 रेडिओचे बक्षीस मिळत होते. 15 पैशाचे कार्ड दिल्ली, जालंधर, आग्रा, याच शहरात पाठवावे लगे. चार दिवसात दुसऱ्या नंबर चे बक्षीस मिळाल्याचे पाकीट येत असे. अभिनंदनाने सुरु होणारे पत्र, पोस्टेजसाठी रु 500 पाठवा म्हणून संपत असे. माझ्या जीवनात अभिनंदनाचा वर्षाव या पत्रापासून सुरु झाला तो आजपर्यंत सुरूच आहे.
5. या शिवाय आजकाल गोड आवाजातील मुलींचे फोन वरचेवर येतात, कोणतेच कागदपत्र न मागता, मला रु 10 लाख कर्ज ज्याला पर्सनल लोन म्हणतात, देण्यास त्या उतावीळ असतात.
6. अश्याच मुलींचे फोन आसान किस्तो पे प्लॉट, विकण्यासाठी येतात, रु 600 पर sq feet, भावाचा प्लॉट, हि बया मला रु 200 च्या भावात देण्यासाठी कासावीस झालेली असते. 2 वर्षात डबल, 3 वर्षात चारपट होणार याची खात्री देते. मला सांगा हिचा महिन्याचा पगार मिळण्याची हि खात्री देऊ शकत नाही, ती मला चारपट पैसे मिळण्याची खात्री देते.
माझा देव वरून हे सर्व पहात असतो, आणि मला करोडपती होण्यापासून वंचित ठेवतो. हे चांगले का वाईट हे संजण्याइतके आपण पण सुजाण आहात अशी मी आशा करतो.
धन्यवाद
विजय लिमये
Leave a Reply