नवीन लेखन...

कलमाडींचा होणार ललित मोदी ?

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचाराची नव्याने चर्चा सुरू झाली. त्यातच एका पक्षाचे असूनही शीला दीक्षित आणि सुरेश कलमाडी या भ्रष्टाचाराबाबत एकमेकांवर आरोप करत आहेत. अनेकांना हे प्रकरण आयपीएलसारखे बाष्पीभूत होईल का, अशी शंका भेडसावत आहे. आयपीएल प्रकरणात ललित मोदींचे कोंबडे कापून सत्तेच्या देवीला शांत करण्यात आले. राष्ट्रकुल प्रकरणात फार तर कलमाडींचा ललित मोदी होईल असे दिसते.


राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचाराबाबत पुन्हा नव्याने गदारोळ सुरू झाला आहे. त्याची दखल घेत केंद्र सरकारने संशयितांच्या घरांवर तसेच मालमत्तेवर धाडी टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. भरमसाठ रकमेची कंत्राटे मिळालेल्या कंत्राटदारांच्या मालमत्ता तसेच प्राप्तीकराची कागदपत्रे यांची तपासणी केली जात आहे. राष्ट्रकुल स्पर्धांचे ठिकाण असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा कार्यक्षमतेबद्दल गवगवा आहे. शिवाय या स्पर्धेच्या संयोजन समितीचा वन मॅन शो सादर करणारे खासदार सुरेश कलमाडी यांचाही गोतावळा त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल तसेच गतिमान व्यवस्थापनाबद्दल बोलबाला करत असतो. रालोआच्या काळात म्हणजे सात वर्षांपूर्वी निश्चित झालेल्या या राष्ट्रकुल स्पर्धेचे अंदाजपत्रक सुरूवातीस 2000 कोटींचे होते. सात वर्षात ते 70 हजार कोटींपर्यंत पोहोचले. राष्ट्रकुल स्पर्धेचा प्रत्यक्ष खर्च आणि भ्रष्टाचारी नेत्यांना पोसण्याचा खर्च एकत्र करुन तो भार सामान्य भारतीय जनतेवर टाकला जातो. करमणूक म्हणून काही नेत्रदिपक देखावे दाखवले की नेत्यांनी केलेली लूट जनतेच्या लक्षात येत नाही अशी कल्पना असते. म्हणून प्रत्येक भ्रष्टाचारी पुढारी काही ना काही मनोरंजनात्मक आणि नेत्रदिपक कार्यक्रम करुन आपला तथाकथित कार्यक्षमतेची आणि गतीमान नेतृत्त्वाची जाहिरात करुन जनतेची यथासांग फसवणूक करत असतो. खरा कार्यक्षम असतो त्याचे कार्य बालते. त्याला जाहिरातीची गरज नसते. सध्या सर्व पक्षांच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये भ्रष्टाचार हीच प्रेरणा आहे. म्हणून सगळे काही ना काही उत्सव वा कार्यक्रम करुन जनतेला दीपवत असतात. साध्या राहणीचा स्वीकार

करुन निर्मळ मनाने वागल्याशिवाय, नि:स्वार्थीपणे निर्णय घेतल्याशिवाय जगातला कुणीही कार्यक्षम वा गतीमान निर्
यक्षमतेचा गुण संपादन करू शकत नाही. राष्ट्रकुल प्रकरणात आठ हजार कोटी रूपये म्हणजे साधारणत: एकुण रकमेच्या 11 टक्क्यांपर्यंत भ्रष्टाचार झाल्याचे सरकारच अप्रत्यक्षरित्या मान्य करत आहे. वास्तवात तो आकडा जास्त असू शकेल पण कमी होणार नाही.सध्या हा भ्रष्टाचाराचा चेंडू म्हणजे फुटबॉलचा खेळ झाला आहे. कलमाडी यांच्याकडून कंत्राटे घेणारे काँग्रेसवाले आहेत तसेच बीजेपीवालेही आहेत. काँग्रेसच्या हायकमांडला पैसे दिल्याशिवाय खासदार सुरेश कलमाडी गैरगोष्टी करू शकतात यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. वरिष्ठांकडून कलमाडींवर जो राग व्यक्त केला जात आहे त्याचे कारण कलमाडींनी हायकमांडच्या योग्य त्या दलालाकडे नियमानुसार ठरलेला पैसा पोहोच केला नसावा, अशी शक्यता दिसते. भ्रष्टाचार हा मानसिक रोग आहे. स्वभावात स्वार्थ अधिक असणार्‍याला हा रोग जडतो. कलमाडींनी या प्रकरणात ठरल्यापेक्षा अधिक पैसा खाल्ला असण्याची शक्यता आहे. पण दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित या कलमाडींच्या पक्षाच्या असूनही त्या त्यांच्यावर टिकास्त्र सोडत आहेत. याचा अर्थ कलमाडींनी हायकमांडकडे भ्रष्टाचाराचा वाटा पोहोचता केला असावा असे म्हणण्यास वाव आहे. साधारणत: भ्रष्टाचारी माणूस निर्भयनसतो. तो कधीही स्पष्ट आणि सडेतोड बोलत नाही पण एक भ्रष्टाचारी व्यक्ती दुसर्‍या भ्रष्टाचारी व्यक्तीला ‘नाकाने कांदे सोलू नकोस’ असे म्हणून त्याचे तोंड गप्प करून आपला बचाव करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. सुरेश कलमाडींची अस्तित्व प्रकट करण्याची प्रेरणा जागी झाली आहे हे खरे असले तरी ते कधीच बंडखोर होणार नाहीत, याबद्दल कोणीही पुणेकर खात्री देऊ शकेल. कारण बंड करण्यासाठी निर्मल्य चारित्र्य असावे लागते. या पार्श्वभूमीवर सध्या जो खेळ सुरू आहे त्याला भ्रष्टाचाराची रंगपंचमी म्हणता येईल. जनतेने तो मूकपणे पहायच
आणि आपले मनोरंजन केले म्हणून संबंधितांना धन्यवाद द्यायचे.या सार्‍या प्रकरणावर पंतप्रधान मनमोहन सिंग चिडलेले दिसतात. अर्थात ते स्वभाविक आहे. कारण पंतप्रधानांना देशांतर्गत सुरू असलेल्या भ्रष्टाचारातून होणार्‍या बदनामीस तोंड द्यावे लागत नाही. म्हणून चूप बसणे त्यांना परवडणारे असते. पण या प्रकरणात संपूर्ण जगात भारताची बदनामी झाली तेव्हा पंतप्रधान दुखावले जाणे स्वाभाविक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या थोडे दिवस आधी त्यातील व्यवस्थेबाबत भ्रष्टाचारामुळे संबंधित यंत्रणेची फजिती झाल्याचे चित्र दिसत होते. अखेर राष्ट्रकुलच्या कामात पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला. भारतीय लष्कराला पाचारण करून त्यांच्याकडून युध्द पातळीवर काम करवून घेतले. या कार्यक्षमतेबद्दल भारतीय लष्कर नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. यात शंका नाही. निश्चय केला तर किती कमी वेळात सर्व गोष्टी ठाकठीक करता येतात हे लष्कराने दाखवून दिले आहे.राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोपाचा कार्यक्रम झाला मात्र लोकांच्या मनात कौतुकाचा भाव होता. सर्व पाहुण्यांनी त्यांच्या निवास व्यवस्थेचे तोंड भरून कौतुक केले. लष्कराचा जमले ते संयोजन समितीला जमले नसते. याचे एकच कारण आहे. लष्कर भ्रष्टाचार न करता देशाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याच्या एकाच हेतूने सामुहिक मन केंद्रीत करून अहोरात्र काम करते. म्हणून कोणाही भ्रष्टाचारी व्यक्तीला लष्करासारखे व्यवस्थापन जमलेच नसते. कारण अशा कामाचे कंत्राट देणारा आणि घेणारा यांच्यात दलाली खात्याचा व्यवहार झालेला असतो. जनतेच्या पैशाचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती भ्रष्टाचारी मनात उगम पावते. त्यांचे लक्ष्य गाळा करण्यावर असते, गाळे बांधण्यावर नसते. कमिशन देणारे कंत्राटदार कामावर आपले लक्ष केंद्रीत करत नाही. साहेबांना कमिशन दिले या नादात तो फुशारक्या मा
रत असतो.या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल प्रकरणात खासदार सुरेश कलमाडी यांची अंडीपिल्ली बाहेर येतील का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण हे पिल्लू ज्या पक्षाचे आहे त्या पक्ष्याने आधीच अंडी खाल्ली असावीत. जो राजकीय पक्ष या पक्षातील भ्रष्टाचाराला विरोध

करतो त्याचेही लोक भ्रष्टाचारात बुडले आहेत. म्हणून सुरेश कलमाडींनी जेवढी

अंडी खाल्ली असतील त्यातील एखाद दुसरे अंडे त्यांना परत करायला लावतील. नंतर ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार होईल, असे आजवरच्या प्रकरणावरुन वाटते. राज्याचा जाणता राजा हे प्रकरण जनतेच्या वतीने आपल्या हातात घेईल आणि झंझावती दौरा काढून कलमाडींच्या रूपाने बाहेर आलेल्या भ्रष्टाचाराचे स्वरूप उघडे करेल, त्यांना तुरुंगात पाठवेल, असेही काहींना वाटते. पण तो भाबड्या लोकांचा भ्रम ठरणार आहे. कोणताही ‘जाणता राजा’ खणता राजा बनतो तेव्हा तो इतरांच्या प्रखर विरोधात अपात्र ठरतो. कारण त्याच्याही पोटात बरीच अंडीपिल्ली असतात. मग हे प्रकरण आयपीएलसारखे बाष्पीभूत होईल काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आयपीएल प्रकरणात सत्तेच्या देवीला एक कोंबडे कापून तो प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ललित मोदींचे कोंबडे कापून सत्तेच्या देवीला शांत करण्यात आले. खासदार सुरश कलमाडी यांचा फार तर ललित मोदी होईल. एक मात्र नक्की की, भ्रष्टाचाराच्या पैशाच्या मूळ मालकाच्या म्हणजे भारतीय जनतेच्या तिजोरीत हा पैसा परत जाणार नाही. कदाचित या भ्रष्टाचाराच्या पैशाचे पुर्नवाटप होईल.राष्ट्रकुल प्रकरणात इतकी बदनामी झाल्यानंतर त्यातील काही जण आत्महत्या करतील काय असाही प्रश्न विचारला जात आहे. साधारणपणे बदनामीच्या भीतीने शेतकरी आत्महत्या करतात ही भारतीय परंपरा आहे. पण एखाद्या भ्रष्टाचारी नेत्याने गळफास लाव
न घेतल्याचे उदाहरण सापडत नाही. आत्महत्या करण्यापूर्वी आपण केलेल्या भ्रष्टाचाराचा तपशील लिहून ठेवला आणि मग त्याचा प्राण गेला, असेही घडले नाही. कारण जनतेला या भ्रष्टाचार्‍यांचे पैसे घेऊन मतदान करण्याची सवय आहे आणि प्रामाणिक माणसांना सार्वजनिक जीवनात बलवत्तर होऊ द्यायचे नाही, असा जनतेचा पण आहे. एकूण हे प्रकरण एखादी मनोरंजनात्मक मालिका पाहण्यासारखे आहे. अशी मालिका पाहणे ही चांगली करमणूक असते. त्यापेक्षा राष्ट्रकुल प्रकरणाची मालिका पाहणे हे वरचढ मनोरंजन होऊ शकते.

(अद्वैत फीचर्स)

— डॉ. कुमार सप्तर्षी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..