एकदा पन्नास पैसे व रुपया या दोघांत वादविवाद चालला होता. पन्नास पैशाचे म्हणणे होते की रुपया पेक्षा पन्नास पैसे जास्त प्रवास करतात. या माणसाकडून त्या माणसाकडे पन्नास पैसे जीतक्या वेळा जातात तेवढ्यावेळा रुपया मुळीच जात नाही. म्हणून रुपयाची किंमत पन्नास पैश्यापेक्षा कमी आहे. रुपयाचे म्हणणे होते की पन्नास पैशापेक्षा रुपयाची किंमत जास्त आहे. पन्नास पैसे म्हणाले “रुपड्या अरे रुपड्या, उग्गाच भाव खावू नकोस, श्रीमंताकडे खुळखुळास म्हणून मोठा झालास का?” रुपया म्हणाला “पैश्या, उग्गाच टेंभा मिरवू नकोस.”
दोघांना एक युक्ती सुचली, वाण्याच्या दुकानातला व्यवहार लपून बघायचा असे ठरले. संध्याकाळ पर्यंत वाणी आणि गिर्हाईकामध्ये पैशाची देवाण घेवाण झाली. वाण्याने दुकान बंद करतेवेळी पैश्याचा हिशेब केला. त्या दिवशी रुपया व पन्नास पैश्याच्या नाण्याचा ढीग सारखाच होता. वाणी हिशेब करुन उठणार तोच एक भिकारी आला. वाण्याने त्याला पन्नास पैसे दिले. भिकारी निघून गेला. पन्नास पैसे व रुपया तेथून बाहेर पडले. एक वाटसरु हरवलेले पैसे हुडकत होता. त्याला त्याचा हरवलेला रुपया सापडला. वाटसरु स्वत:शीच म्हणला, “रुपया तर सापडला.” दुसरा वाटसरु त्याच वाटेने चालला होता. धुळीत पडलेल्या पैश्यावर त्याचे लक्ष गेले. त्याने “अरे वा ! लाभ झाला.” असे म्हणून पन्नास पैश्याचे नाणे खिशात टाकले.
पन्नास पैसे आणि रुपया कुठल्याही ठोस निर्णयाप्रत येत नव्हते. या रस्त्याने प्रथम जो कोणी येईल त्याला त्यांच्या निर्णयाचे मत विचारायचे ठरले. एक माकड येताना दिसले. माकडाला त्यांनी विचारले “आमच्या दोघांपैकी कोणाची किंमत जास्त आहे?” माकडाने रुपया व पन्नास पैसे उलट सुलट केले, चावले व फेकून दिले. माकड म्हणाले “तुमची किंमत शून्य.”
तुम्हाला पन्नास पैसे व रुपयाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल का ?
— स्वाती ओलतीकर
Leave a Reply