ठेविले अनंते तैसेचि रहावे
चित्ती असो द्यावे समाधान
असे म्हणतात खरे, मात्र अनेकदा त्यामागे आळशीपणाचे समर्थन करण्याचा एक भाग असतो. हा आळस झटकून चांगले कष्ट केल्यास आपोआपच त्याचे फळ आणखी चांगले मिळू शकते.
एका झाडावर उंच ठिकाणी एका चिमणीने घरटे केले होते. त्यात चिमणीचे एक पिल्लू होते. पिल्लू हळूहळू मोठे होत गेले. त्याला पंखही फुटले, मात्र पंख फुटूनही पिल्लाला घरट्याबाहेर पडू नये असे वाटू लागले. बिचारी चिमणी दूरवर जाऊन त्याच्यासाठी भक्ष्य आणायची. चिमणीने आणलेल्या तेवढ्याच भक्ष्यावर गुजराण करण्यात त्या पिल्लाला आनंद वाटू लागला.
कधीकधी चिमणीला स्वतःलाच अन्न मिळायचे नाही. जेवढे काही मिळेल त्याच्यातलाच एक भाग ती आपल्या पिलाला द्यायची. मात्र भूक आणखी लागली असली तरी पिल्लू घरट्यातच बसून राहायचे.
एकदा सकाळी चिमणी असेच भक्ष्य शोधायला घराबाहेर पडली. अचानक सोसाट्याचा वारा आला. झाडाच्या फांद्या वेगाने हलू लागल्या. पाहता पाहता ते चिमणीचे पिल्लू घरट्याबाहेर फेकले गेले. मात्र त्या पिल्लाने हुशारीने आपले पंख पसरले व ते अलगद जमिनीवर उतरले. त्या पिल्लाने समोर पाहिले तर सूर्य नुकताच उगवला होता. बागेतील फुले फुलली होती. ते निसर्गसौंदर्य पाहून पिल्लू हरखून गेले. तेथेच ते बराच वेळ बागडले.
थोड्या वेळाने त्याला भूक लागली. कोणीतरी बागेत खास पक्ष्यासाठी ‘खाऊ’ आणून टाकला होता. चिमणीच्या पिलाला तो इतका आवडला की, बस्स! असा खाऊ त्याने प्रथमच खाला होता. त्या आनंदातच ते पिल्लू पुन्हा घरट्यात गेले.
थोड्या वेळाने चिमणी आली. पिल्लाने आनंदाने तिला सकाळची रम्य हकिकत सांगितली. त्यावर चिमणी त्याला म्हणाली, हे तर तू रोजच पाहू शकला असतास, मात्र तुला घरट्याबाहेर पडायचेच नव्हते ना!
आळशीपणा सोडून कष्ट केल्यास चांगला खाऊ मिळू शकतो, हे तुला आता तरी कळले ना? त्या दिवसापासून चिमणीचे पिल्लू रोज बाहेर पडून स्वतःचे भक्ष्य स्वतःच आणू लागले.
Leave a Reply