कालचीच गोष्ट सकाळी-सकाळी अंगणातल्या झेंडूंच्या फुलांना पाहत होतो. एक मधुमाशी चेहऱ्याजवळ घोंघावत आली चक्क मानवी आवाजात म्हणाली, ‘ए थेरड्या‘ बघतोस काय, समोरची बादली उचल आणि फुलांवर पाणी घाल. क्षणभर मी गोंधळलोच, काय करावे सुचेनासे झाले. ती पुन्हा ओरडली ‘मुकाट्याने पाणी फुलांवर टाकतो, कि दाखवू इंगा‘. बालपणीची आठवण जागी झाली. दचकून म्हणालो, घालतो बाबा, पण एक सांग फुलांवर पाणी कशाला घालायचे. मुर्खा एवढे कळत नाही, फुल पाण्यात भिजले कि त्यातले परागकण हि भिजतील. भिजलेले पराग पियुन मला ‘पातळ आणि भरपूर मधु’ बनविता येईल. स्वस्त असे पातळ मधु विकून आमचा मालक हि चांगली कमाई करेल.
काही इलाज नव्हता, मुकाट्याने फुलांवर पाणी घालू लागलो. अचानक दुसर्या दिशेने दुसरी मधुमाशी वेगाने येताना दिसली. जवळ येऊन तीही ओरडली, पांढरेकेस वाल्या, ते पाणी घालणे थांबव आधी. मला काही समजेनासे झाले, पहिल्या मधुमाशी कडे बघितले, दुसरी जोरात ओरडली, ‘कळत नाही का, फेक ती बादली. मी चुपचाप पाण्याची बादली खाली ठेवली. हिम्मत करून तिला विचरले, ती फुलांवर पाणी घालायला सांगते आणि तू पाणी घालू नको म्हणते, का? हा काय प्रकार आहे. दुसरी मधुमाशी म्हणाली, वाळक्या फुलांच्या पराग पिऊन मी चांगले घट्ट असे मध बनविते. हिच्या सारखे, मधात पाण्याची भेसळ नाही करीत. आमचा मलिक दर्जेदार घट्ट मध विकतो. मी फुलांना पाणी घालणे थांबविले आहे, हे पाहून पहिल्या मधुमाशीला राग आला, ती माझ्यावर जोरात डाफरली, फुलांच्या वर पाणी घालतो कि नाही थेरड्या कि तुला शिकवू धडा? दुसरी तेवढ्याच त्वेषाने ओरडली, तिचे ऐकू नको, माझ्या दंश तिच्यापेक्षा जालीम आहे. काय करावे मला सुचले नाही, शेवटचा मार्ग पाण्याची बादली खाली ठेऊन खोलीच्या दिशेने धूम ठोकली. कानावर फक्त ऐकू आले, पळतो आहे हरामखोर, सोडणार नाही तुला.
आई…ई, करत जोरात ओरडलो. डोळे चोळीत उठलो. सौ. पण दचकून जागी झाली. काय झाले? मी म्हणालो, बहुतेक मधुमाशी डसली वाटते. सौ.ने काही नाराजगीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, इथे बंद खोलीत कुठून मधुमाशी येणार, डास चावले असतील. काहीच्याबाही विचार करत राहतात आणि असले भुक्कड स्वप्न तुम्हाला पडतात. माझी हि झोपमोड होते. बाय द वे चावली कुठे? मी म्हणालो, चावली नाही ग. गालाचे चुंबन घेतले. सौ. पुढे काही बोलली, नाही चुपचाप अंगावर पांघरून घेऊन, पाठ फिरवून झोपून गेली. स्वत:ला मनोमन दाद दिली, बायकांची बोलती बंद करायचा चांगलाच अनुभव आहे, अस्मादिकांना.
सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. येताना ओळखीच्या किरणाच्या दुकानासमोर थांबलो. समोर रेकवर मधाच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत होत्या, चाचपत-चाचपत हळूच त्याला विचारले, हे मध पातळ वाले आहे, कि घट्टवाले? त्याने विचित्र नजरेने मजकडे पाहिले आणि तेवढ्याच हळू आवाजात विचारले, अंकल, आज सुबह सुबह ही….डोक्यावर हात मारला..च्यायला मधुमाशींच्या चक्करमध्ये येऊन मद्य.ssपी ठरलो (काका, मद्याला शिवत सुद्धा नाही, हे आता कुणाला खरे वाटेल).
डिस्क्लेमर: या कथेचा विज्ञापनांशी काही एक संबंध नाही.
— विवेक पटाईत
Leave a Reply